कुंर्झे ग्रामसेवकाचा मनमानी कारभार, २७ दिवसांपासून ग्रामपंचायतला दांडी

पवन शेलार    28-Jun-2020
Total Views |

- संतप्त ग्रामस्थांची पदाधिकाऱ्यांसमोर तक्रार

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे ग्रामपंचायत मध्ये असलेले ग्रामसेवक मनमानी कारभार करीत असून याबाबत गावात पाणी प्रश्नासाठी जमलेल्या लोकांनी उपस्थित गटविकास अधिकारी , जिल्हा परिषद सदस्य व सभापती यांना आपले गाऱ्हाणे सांगून याबाबत सखोल चौकशी करून ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तालुक्यात कुंर्झे ही मोठी व नामांकित ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत अंतर्गत अनेक पाडे येतात मात्र वर्षानुवर्षे गावातील काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई असून याप्रश्नाला वाचा फोडण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
 
Kurjhe_1  H x W
 
पाणीटंचाई बाबत काही ग्रामस्थ मंगळवारी गावात एकत्र जमले असताना यावेळी गटविकास आधिकारी राजेंद्र खताल साहेब , पंचायत समिती सभापती रुचिता कोरडा तसेच जि. प. सदस्य ज्ञानेश्वर ( शिवा ) सांबरे हे उपस्थित होते. मात्र यावेळी ग्रामसेवक उपस्थित नसल्याने याबाबत विचारणा केली असता ग्रामसेवक 1 जून पासून ग्रामपंचायत मध्ये उपस्थित नसल्याने समजताच विक्रमगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र खताल ह्यांनी ग्रामसेवक विजय पाटील ह्यांना फोन केला मात्र विजय पाटील ह्यांनी खताल साहेबांच्या फोन ला प्रतिसाद दिला नाही.
 
ग्रामपंचायत व पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी गैरहजर संदर्भात ग्रामसेवकाने कोणतीही सूचना दिली नसल्याचे व याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे तसेच पाणी टंचाईबाबत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगत या सगळ्या घटनेचा शेरा ग्रामपंचायत दप्तरी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे तसेच अधिकाऱ्यांनी लिहून ठेवला आहे.
 
राज्यात कोरोनाचे संकट गंभीर रूप धारण करीत असतांना जवळपास 27 दिवसांपासून ग्रामसेवक गैरहजर असणे ही गंभीर बाब असून यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत, ग्रामपंचायत मध्ये एखाद्या कामासाठी ग्रामस्थ गेले की नेहमीच ग्रामसेवकाकडून नेहमी अरेरावीची भाषा ऐकायला मिळते शिवाय योजना व्यवस्थित न सांगणे , गावाच्या विकासाची कामे परस्पर करणे, गावात पाण्याची सोय , दिवाबत्ती नसतांनाही पाणी व दिवाबत्ती कर वसूल करणे असे अनेक आक्षेप ग्रामस्थानी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना बोलून दाखवले. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी ग्रामसेवक विजय पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.