विधानपरिषदेच्या जागेसाठी विद्याताई वेखंडे यांच्या नावाला ठाणे जिल्हा राष्ट्रवादीकडून दुजोरा

जनदूत टिम    27-Jun-2020
Total Views |
शहापूर : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी राष्ट्रवादीतील दिग्गजांनी आपल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून ठाणे जिल्हा ग्रामीण महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई वेखंडे यांचे नाव शहापुरातून पुढे येत आहे.विद्याताई वेखंडे यांचे वडील कैलावासी विठ्ठलराव खाडे यांचे ठाणे व पालघर जिल्ह्यातील सामाजिक व राजकिय क्षेत्रात बहुमूल्य योगदान असून विद्याताई या देखील त्यांचा वारसा अखंड चालवित राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
 
Wekhande_1  H x
त्यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीविषयी सांगायचे झाल्यास कलमगाव ग्रामपंचायत वर चार वेळा बिनविरोध सदस्य पदी निवड,आय काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा,तालुका खरेदी विक्री संघावर पाच वर्षे बिनविरोध निवड,टीडीसी बँकेवर भरघोस मतांनी निवडून येऊन उपाध्यक्ष पदाचा पदभार,चार वेळा ठाणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा होण्याचा मान तसेच विठ्ठलदादा खाडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अविरत सक्रिय.असा एकंदरीत त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा आलेख आहे.त्यालाच अनुसरून वेखंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे विधानपरिषदेच्या जागेसाठी पक्षाकडून आपला विचार करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.दरम्यान २०१४ साली शरद पवार हे शहापुर येथे प्रचारादरम्यान आले असता विद्याताई वेखंडे यांच्या आईंनी शरद पवारांकडे त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी योग्य वेळ पाहून आपला पक्ष सत्तेत असल्यास विद्याताई यांचा पक्ष नक्कीच विचार करेल असे आश्वस्त केले होते.त्यामुळे विद्याताई वेखंडे यांच्या नावाला दुजोरा देऊन शरद पवार शब्दाला जागतात की नाही.?याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
 
अग्रवाल फार्महाऊस येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दौलत दरोडा,ठाणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दशरथ तिवरे,तालुकाध्यक्ष मनोज विशे आदी पदाधिकारी उपस्थित होते. याआधी विद्याताई वेखंडे यांच्यासोबत दशरथ तिवरेंच्या नावाचीही जोरदार चर्चा होती परंतु शहापुर तालुका राष्ट्रवादी ही एकसंघ असून पक्षाकडून केवळ एकच नाव पुढे केले जाईल व महिला उमेदवारासाठी जागा घोषित झाल्यास आमचा पाठिंबा हा विद्याताई वेखंडे यांना असेल असे मत तिवरे यांनी व्यक्त केल्याने अप्रत्यक्षपणे विद्याताई वेखंडे यांच्या नावावर ठाणे जिल्हा राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब केल्याचे संकेत मिळाले आहेत.परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठी तीन पिढ्यांच्या पक्षनिष्ठेला अनुसरून कोणता निर्णय घेतात याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.