काँग्रेसमध्ये अनलॉकिंग की आघाडीचे विलगीकरण?

जनदूत टिम    25-Jun-2020
Total Views |
जोन महिन्यांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. राज्यातले आघाडी सरकार हे आपले सरकार नाही, असे ते त्या कार्यकर्त्याला सांगताना त्या क्लिपमध्ये ऐकू येते. त्यानंतर राहुल गांधी यांनीही महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णयप्रक्रियेत सामील करून घेतले जात नसल्याचे विधान केले होते.
 
prithviraj-chavan_1 
 
गांधी असोत वा चव्हाण या दोघांनीही केलेली विधाने राज्यातल्या सरकारमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसची मानसिकताच दाखवते आहे. त्यानंतर काँग्रेसचे नेते नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मंत्र्यांचे फोनही मुख्यमंत्री घेत नाहीत, भेटतही नाहीत. पालकमंत्र्यांना विश्वासात घेतले जात नाही, असे खासगीत काँग्रेसचेच नव्हे, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही काही मंत्री सांगत आहेत. त्यापैकी काँग्रेसमधील नाराजी अपेक्षेप्रमाणेचलवकर चव्हाट्यावर आली. राहुल गांधींच्या विधानाचीच री मंत्री नितीन राऊत यांनी ओढली. राऊत यांच्यासह विधानसभाध्यक्ष नाना पटोले, सुनील केदार हे तर नागपुरातून थेट मुंबईत येऊन थडकले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा आग्रह धरला होता. अखेर मोठ्या मुश्कीलीने उद्धव ठाकरे यांचे सल्लागार मिलिंद नार्वेकर यांनी बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावर जाऊन या नाराजांशी चर्चा केली होती. मुख्य सचिव अजॉय मेहता हे कुणालाच जुमानत नाहीत आणि चारपाच अधिकाऱ्यांच्याच हातात त्यांनी राज्यकारभार सोपवला आहे.
 
अशीही चर्चा काँग्रेस गोटातून केली जात आहे. काँग्रेस नाराज आहे, आमचे काही विषय आहेत, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून 'कुरकुरणाऱ्या खाटा' अशा शब्दात टीका झाली. त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोरात आणि अन्य मंत्र्यांची भेट घेतली. भेटीनंतर महसूलमंत्री थोरात यांनी सरकार स्थिर असल्याची ग्वाही देऊन टाकली. एकीकडे शरद पवारांना भेटण्यासाठी वारंवार दादरच्या बाळासाहेब ठाकरे स्मारकात फेऱ्या मारणाऱ्या उद्धव ठाकरेंची भेट मिळावी म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना, ते देखील मंत्री असलेल्या, दोन दिवस वाट पाहावी लागते यावरून ही तीनचाकी रिक्षा कशी चालली आहे हे समजेल.
 
भाजपविरोध आणि सत्तेच्या लोण्याच्या गोळ्यातला वाटा यामुळे सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. मात्र मंत्रिपदे, खात्यांचे वाटप अशा अनेक मुद्द्यांवर ही नाराजी दिसत होती. दुर्दैवाने सत्तेवर आल्यानंतर तीनच महिन्यांत कोरोनाचे संकट चालून आले. उद्धव ठाकरे यांना सरकार चालवण्याचा काहीही अनुभव नव्हता, अशी आपत्कालीन परिस्थिती तर कधीच अनुभवली नव्हती. मातोश्रीवरून आदेश सोडणे वेगळे आणि प्रत्यक्ष प्रशासन चालवणे वेगळे, हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येऊ लागले असेलच. या संकटात शरद पवार व मुख्यमंत्री एकमेकांना भेटत असताना काँग्रेसला मात्र यापासून दूरच ठेवले जात असल्याचे सत्य पुढे आले. तरीही फक्त सत्ता हातची जाऊ द्यायची नसल्याने सरकार स्थिर आहे, असे काँग्रेसकडून सांगितले गेले आहे. मात्र, ते सांगताना शिवसेनेने काँग्रेसच्या कारभाराबद्दल काय कल्पना आहेत हे समजून घेतले पाहिजे, असे विधान बाळासाहेब थोरात यांनी केले. विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांवरून काँग्रेसने समसमान वाटप हवे असे सांगत पुन्हा एकदा कुरबुर केली आहे. आमदारांच्या संख्येनुसार जागांचे वाटप व्हावे, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.
 
वरिष्ठ पातळीवर अजून यावर चर्चाच सुरू असताना एकमत झालेले नाही, मग प्रत्यक्ष नावे जाहीर झाल्यावर काय धमाल उडेल, याची कल्पनाच केलेली बरी! पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, पाँडेचरी याठिकाणी काँग्रेसचे सरकार आहे. मात्र, महाराष्ट्रात काँग्रेस डिसिजन मेकर नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले, त्याचबरोबर सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असेही ते म्हणाले होते. दुसऱ्या टोकाची राजकीय विचारसरणी असलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कितीकाळ सत्तेचा हा अधिकार नसलेला सारीपाट खेळायचा, आणि त्यामुळे हक्काचा मतदार गोवण्याचा धोका पत्करायचा, हे काँग्रेसच्या श्रेष्ठींना ठरवावे लागणार आहे; अन्यथा सत्तेचे बाळकडू घेऊन राष्ट्रवादी आणि शिवसेना गुटगुटीत होतील; पण महत्त्वाची खाती न मिळाल्याने काँग्रेसची मात्र उपासमारी होत राहील. हे सरकार आपले नाही या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानातला नेमका अर्थ काय ते शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याला नेमका उमगला असेलच. त्यांच्याही पक्षात अशी भावना निर्माण होण्याआधीच मतभेद न मिटवल्यास सरकारच्या स्थापनेचा मूळ हेतूच निरर्थक ठरू शकतो. आता कुठे राज्यात अनलॉक पर्व सुरू झाले आहे. काँग्रेसमध्येही तसे ते सुरू झाले, तर ही तीनचाकांची रिक्षा चालणे अवघड होत जाईल.