आदिवासी वनाधिकाराच्या दाव्या संदर्भात विधानसभेत जोरदार आवाज उठवणार – आ. विनोद निकोले

जनदूत टिम    25-Jun-2020
Total Views |

- पाणीसाठे असलेल्या धरण बाधित शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्याचे पाणी मिळवून देणार
- माकप व किसान सभेतर्फे विजय दिनाची प्रभावी सभेनिमित्त प्रतिपादन

शहापूर : आदिवासी वनाधिकाराच्या दावे व पाणीसाठे असलेल्या धरण बाधित शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्याचे पाणी मिळण्यासंदर्भात विधानसभेत जोरदार आवाज उठवणार असल्याचे प्रतिपादन डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी शहापूर तालुक्याच्या तानसा परिसरात माकप व किसान सभेतर्फे विजय दिनी प्रभावी सभेत केले आहे.
 
CpiM Shahapur & MLA Vinod
 
२८ वर्षांपूर्वी २४ जून १९९२ रोजी फॉरेस्ट अधिकारी आणि पोलिसांनी येथील जमिनी कसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांवर दहशत बसवून त्यांना हाकलून देण्यासाठी अमानुष गोळीबार केला होता. त्यात कॉ. रघुनाथ भुरभुरा यांच्या छातीतून आरपार गोळी गेली, पण त्यांना पक्षाने लगेच मुंबईच्या जे. जे. इस्पितळात नेऊन त्यांचे प्राण वाचवले. इतरही अनेक जण या गोळीबारात जखमी झाले. पण आदिवासी शेतकऱ्यांनी तरीही मागे न हटता जोरदार प्रतिकार केला आणि जुलमी पोलीस व फॉरेस्ट अधिकाऱ्यांना पळवून लावले. आज २८ वर्षांनंतरही येथील ०८ गावांच्या जमिनी टिकवून शेकडों आदिवासी शेती करत आहेत, आणि ते कसत असलेल्या जमिनींच्या मालकीहक्कासाठी वनाधिकार कायद्याखाली त्यांनी दावे केले आहेत. या लढ्याचा विजय दिवस या भागात दरवर्षी २४ जूनला वेगवेगळ्या गावांत सभा घेऊन साजरा केला जातो. सर्व वक्त्यांनी सन १९९२ च्या झुंझार लढ्याचा गौरव करून " जंगलतोड आम्ही करणार नाही, फॉरेस्ट प्लॉट आम्ही सोडणार नाही " हा त्या लढ्याचा वारसा आजच्या परिस्थितीत वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुढे नेण्याची हाक दिली.
 
नुकतेच झालेल्या या सभेत प्रथम भारत-चीन सीमेवरील चकमकीत शहीद झालेल्या २० भारतीय सैनिकांना, तसेच कोरोना काळात आजार, भूक व अपघातांत मृत्यू पावलेल्या सर्वांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली. गेल्या वर्षीच्या शहापूर विधानसभा निवडणुकीत माकपची मते तिप्पट वाढून ती १०,५०० पर्यंत नेल्याबद्दल शहापूर आणि वाडा तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले, आणि असलेले बालेकिल्ले जास्त मजबूत करून नवीन गावांत विस्तार करण्यासाठी सर्व जनसंघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अनेकपट जास्त सामर्थ्यशाली करण्याचा निर्धार करण्यात आला. क्रांतिकारी घोषणांनी या सभेची सांगता झाली.
 
शहापूर तालुक्यात तानसा, वैतरणा, भातसा, मोडकसागर असे महाराष्ट्रातील सर्वात प्रचंड पाणीसाठे आहेत, पण ह्याच तालुक्यातील असंख्य गावांना शेतीचे सोडाच, पण पिण्याचेही पाणी मिळत नाही, हा प्रश्न अग्रक्रमाने घेण्याचे आवाहन करण्यात आले. नुकतेच २४ जूनला ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात तानसा तलाव परिसराच्या पेंढरी या गावी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शारीरिक अंतर पाळून प्रभावी विजय सभा झाली. या सभेला तालुक्यातील २००० हून अधिक स्त्री-पुरुष उपस्थित होते. यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. शहापूर तालुका कमिटीने आणि पेंढरी युनिटने सभेची उत्तम तयारी केली होती. कोरोनाच्या काळात भाजपच्या मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि हृदयशून्य धोरणांवर घणाघाती टीका करून कामगार-शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर लढे तीव्र व व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
सन १९९२ च्या लढ्यात अग्रभागी असलेले, आता ७० वर्षांचे असलेले कॉ. रघुनाथ भुरभुरा, ९२ वर्षांचे कॉ. गोविंद कान्हात आणि ६५ वर्षांचे कॉ. काशिनाथ काकरा यांचा लाल झेंडा व लाल स्कार्फ देऊन सत्कार अनुक्रमे कॉ. डॉ. अशोक ढवळे, कॉ. किसन गुजर व कॉ. बारक्या मांगात यांच्या हस्ते करण्यात आला. डहाणूचे माकपचे आमदार कॉ. विनोद निकोले व शहापूरचे माकपचे विधानसभा उमेदवार व या सभेचे अध्यक्ष कॉ. कृष्णा भवर यांचाही सत्कार करण्यात आला. सभेस पक्ष व जनसंघटनांचे नेते कॉ. डॉ. अशोक ढवळे, कॉ. किसन गुजर, कॉ. बारक्या मांगात, आमदार कॉ. विनोद निकोले, कॉ. सुनीता शिंगडा, कॉ. प्रकाश चौधरी, कॉ. विजय विशे, कॉ. भरत वळंबा, कॉ. सुनील करपट, कॉ. नितीन काकरा यांनी संबोधित केले. कॉ. रमेश बोचल यांनी प्रास्ताविक, कॉ. राजेंद्र भवर यांनी आभारप्रदर्शन आणि कॉ. भास्कर म्हसे यांनी सूत्रसंचालन केले.