रावसाहेब दानवे यांच्या मंत्रालयाची महाराष्ट्राला झटपट परवानगी

जनदूत टिम    25-Jun-2020
Total Views |
मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील मका खरेदी उद्दीष्टानुसार पूर्ण झाल्यानंतर अजूनही मका शिल्लक असल्याने जास्तीची खरेदी करण्यास परवानगी मागितली आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मंत्रालयाने ताबडतोब दोन दिवसात परवानगी दिली.
 
danve-raosaheb-dadarao-34
 
राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने केंद्र सरकारला अधिक मका खरेदीसाठी परवानगी मिळावी आणि त्यासाठी मुदतही वाढवून मिळावी अशी विनंती करणारे पत्र २२ जून रोजी पाठविले होते. केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने ताबडतोब या पत्राला प्रतिसाद देत आज दि. २४ जून रोजी परवानगीचे पत्र राज्य सरकारला पाठविले. या खरेदीचा संपूर्ण आर्थिक भार केंद्र सरकार सोसते. २०१९ – २० च्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले होते. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या ५ मे रोजीच्या पत्रानुसार यापूर्वी २५,००० टन मका खरेदीला परवानगी दिली होती व त्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत दिली होती.
 
मुदतीपूर्वीच ही खरेदी पूर्ण झाली. शेतकऱ्यांनी मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे आणि राज्यात अधिक खरेदी झाली पाहिजे, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे केली होती. त्यामुळे राज्य सरकारकडून २२ जून रोजी वाढीव खरेदीसाठी परवानगीचे विनंतीचे पत्र आल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन ताबडतोब परवानगी देण्यास सांगितले.
 
केंद्र सरकारने आता महाराष्ट्र सरकारला मका खरेदीसाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि मका खरेदीची मर्यादा ९०,००० मेट्रिक टनांपर्यत वाढविली आहे. त्यामुळे राज्याला ६५,००० मेट्रिक टन जास्ती मका शेतकऱ्यांकडून खरेदी करता येईल.