पतंजलीच्या औषधाला महाराष्ट्रात परवानगी नाही!!

जनदूत टिम    25-Jun-2020
Total Views |
मुंबई : राजस्थान सरकारपाठोपाठ पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रातही झटका लागला आहे. पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सनं क्लिनिकल ट्रायल घेतली का याची माहिती घेण्यात येईल असं सांगतानाच देशमुख यांनी नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

Patanjali_1  H
 
करोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी औषध शोधल्याचा दावा केला होता. पंतजली योगपीठानं हे औषध तयार केलं असून मंगळवारी ते लाँच करण्यात आलं.
मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारनं या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता. बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती, अशी धक्कादायक माहिती त्यानंतर समोर आली होती.
हे औषध सगळ्यांसमोर आल्यानंतर काही तासांतच केंद्रीय आयुष मंत्रालयानं त्याच्या जाहिराती बंद करण्याचे आदेश जारी केले होते. "या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी, असं सांगत केंद्र सरकारनं पतंजलीला करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते. सध्या केंद्र सरकार या औषधाची चाचणी करत असतानाच पतंजलीला आणखी एक धक्का बसला होता. पतंजलीनं दिलेल्या अर्जानुसार त्यांना लायसन्स देण्यात आलं. पण, त्यांनी लायसन्सच्या अर्जात कुठेही करोना व्हायरसचा उल्लेख केलेला नव्हता. विभागानं केवळ रोग प्रतिकारक शक्ती, खोकला व ताप यावर औषध बनवण्याचीच परवानगी दिली होती. करोनावर औषध तयार करण्याची परवानगी कशी मिळाली, याबद्दल पतंजलीला नोटीस पाठवून उत्तर मागणार आहे," असं परवाना अधिकाऱ्यांनं सांगितलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्रातही या औषधाच्या विक्रीला परवानगी मिळणार नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.