ऑनलाइन शिक्षण अन...

जनदूत टिम    24-Jun-2020
Total Views |
रोनानंतरच्या काळात शाळा कशा असतील, याची चर्चा आता विविध व्यासपीठांवरून घडत आहे. त्यात प्रामुख्याने ऑनलाइन शिक्षण या मुद्द्यावर भर आहे. पण त्यापाठोपाठ असेही प्रश्न उपस्थित होत आहेत की, या चर्चेची एवढी घाई कशाला? अशा व्यवस्थेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत का? प्रत्यक्ष वर्गात बसून घेतले जाणारे शिक्षण ते ऑनलाइन शिक्षण हा एवढा मोठा बदल स्वीकारण्याची मानसिकता आणि क्षमता आपल्याकडच्या पालकांकडे आहे का? कोरोनानंतरच्या काळात शैक्षणिक सत्र सुरळीत सुरू करण्याबरोबरच मुलांनाही सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात असल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे.
 
online_1  H x W
 
त्यामुळे आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे, अशा आशयाच्या चर्चा सुरू आहेत. घरामध्ये मुलांचे लक्ष अभ्यासाकडे गुंतवणे ही महाकठीण गोष्ट लॉकडाऊनमुळे तमाम पालकांच्या लक्षात आली आहे. निदान शाळेत मित्र, शिक्षक, शाळेचे वातावरण या कारणांमुळे तरी मुले काही प्रमाणात का होईना अभ्यासाकडे लक्ष देतात. घरात मात्र या सर्व वातावरणाचा अभाव असल्याने घरातून शिक्षण (लर्न फ्रॉम होम) या संकल्पनेचं काय होईल, ती यशस्वी ठरेल का, अशा शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
 
लहान मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून जेवढे तुम्ही रोखाल तेवढे ते आणखी हट्टाने तीच कृती करतात. यासाठी मोबाइलचेच उदाहरण समर्पक ठरेल. मोबाईल घेऊ नको, असं कितीही बजावून सांगितले तरी ते या ना त्या कारणाने मोबाईल डोळ्यांसमोर धरतातच. याला सध्याच्या परिभाषेत स्क्रीन टाईम असे म्हटले जाते. टाळेबंदीमुळे घरात अडकून पडलेल्या चिल्लर पार्टीला या स्क्रीन टाईमपासून बाजूला करणं शक्य आहे का? काही आधुनिक विचारांच्या आणि सुशिक्षित पालकांच्या मते घरच्या घरी शाळा हा पारंपरिक शाळांना उत्तम पर्याय आहे. याउलट अनेकांना आता या संकट काळात हा पर्याय योग्य वाटत नाही. घरातील शाळांचे अनेक फायदे असल्याचे तथाकथित कितीही सांगत असले तरी वास्तवात ती किती फायदेशीर ठरते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्ञान आणि कौशल्यांबरोबरच काही पालकांच्या दिमतीला हल्ली ऑनलाइन साहित्यही आहे. परंतु असे असले तरी प्रत्येकाच्या बाबतीत या घरातील शाळा हा उपक्रम यशस्वी ठरेल का? अनेक पालकांना या पद्धतीसाठी आवश्यक असे ऑनलाइन साहित्य मिळविणेही दुरापास्त होईल आणि त्याचा अंतिम परिणाम विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर होईल. त्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या तसेच डिजिटली गरीब असलेल्या कुटुंबांतील मुले मागे पडतील.
 
उपकरणांच्या किमतींमुळे तसेच परवडू न शकणाऱ्या डेटा प्लॅन्समुळेही ही मुले ऑनलाइन अभ्यासात मागे राहतील. साहजिकच ऑनलाइन अभ्यासाच्या शर्यतीमधून अशा प्रकारचे विद्यार्थी आपोआपच आऊट होतील. दुसऱ्या बाजूला मागणी तसा पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार ऑनलाइन वर्गांची मागणी जशी वाढत जाईल, तसा ऑनलाइन शिकवणीच्या व्यवसायात गुंतलेल्यांचे प्रस्थ वाढू लागेल. आणि काही कालावधीनंतर असा एक टप्पा येईल की, सुरुवातीला मोफत ऑनलाइन शिक्षण देणारे त्यांच्या सेवांसाठी चांगले दाम वाजवून घेतील. सामान्यतः ऑनलाइन शिक्षणासाठी संगणक आणि इंटरनेट जोडणी या दोन मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते. मात्र राकट, कणखर आणि दगडांचा देश असलेल्या भारतात आज अशी कोट्यवधी कुटुंबे आहेत की, ज्यांना इंटरनेट जोडणीच परवडत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी गाव, वाड्या-वस्त्या घर-दारं सोडून शहराकडे आलेले स्थलांतरित मजूर तर त्यांच्या मुलांना गावीच सोडून येतात. या मुलांना ऑनलाइन शिक्षण कसे मिळणार? उलट कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर पैशाच्या चणचणीमुळे अशा मुलांना मजुरीच्या कामांना जुंपले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
 
मोठमोठ्या शहरांमधील झोपडपट्टयांसह गावगाड्यात राहणाऱ्या शालेय मुलांना डिजिटल शिक्षण शक्य आहे का? जी मुलं शाळेत येऊ शकत नाही, ज्यांना शिक्षणाची व्यवस्थाच माहीत नाही, पोटाचाच संघर्ष ज्यांचा चालू आहे, त्या मुलांपर्यंत आपण कसे पोहोचणार? ज्या मुलांना अद्याप शाळेचा रस्ताच माहीत नाही ती मुले तर ऑनलाइन शिक्षणापासून लाखो किलोमीटर दूर आहेत. ग्रामीण किंवा निमशहरांमध्ये जशी स्थिती आहे, तशीच स्थिती मोठ्या शहरांमध्ये आहे. मुंबई-ठाण्यासारख्या शहरांमधील झोपडपट्टीत किंवा इतर ठिकाणी शाळाबाह्य मुलांना सिग्नल शाळा या नव्या संकल्पनेनुसार शिकवण्याचं काम केलं जातं. या सिग्नल शाळांनाही डिजिटल शाळांचा प्रयोग कसा राबवायचा, हा प्रश्न सतावतोय. या आणि इतर सर्व बाबींचा सर्वकश विचार करून ऑनलाइन शिक्षण देण्याच्या निर्णयाबाबत धोरण ठरवताना सर्जनशीलता, शैक्षणिक स्वातंत्र्य, सर्वसमावेशकता आणि ना-नफा किंवा राजकीय प्रभावापासून कसे दूर राहता येईल आदी घटकांवर विचारमंथन करायला हवे. नाहीतर गाजराची पुंगी....वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, अशी अवस्था ऑनलाइन शिक्षण या संकल्पनेची होईल.