कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पूर्वतयारीला लागा

जनदूत टिम    24-Jun-2020
Total Views |

- प्रभाग रचनांचे प्रारूप अनलॉक नियमांनुसार करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीसह कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मुदत येत्या नोव्हेंबरमध्ये संपत आहे. आयोगाच्या विहित वेळापत्रकानुसार प्रभाग रचना कार्यक्रम एप्रिल ते मे या कालावधीत होणे आवश्यक होते. तथापी परंतु कोरोना महामारीमुळे येणाऱ्या सर्व निवडणुकांचे टप्पे स्थगित करण्यात आले. मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागण्याचे आदेश राज्य निवडणक आयोगाने दिले आहेत. या संदर्भात आयोगाने दोन्ही महानगरपालिकांना कोव्हीड - १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मिशन बीगीन अगेन (अनलॉक १) नुसार लागू केलेल्या विविध अटी व शर्तीचे पालन करून कामकाज करण्याचे या आदेशात म्हटले आहे.
 
kdmc_1  H x W:
 
लॉकडाऊनच्या काळात सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु, आता अनलॉक १ मध्ये अटी शिथिल करण्यात आल्या आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक ठरलेल्या वेळेनुसारच होणार असल्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महानगरपालिकेची मुदत नोव्हेंबर २०२० मध्ये संपत असून आयोगाच्या विहित वेळापत्रकानुसार प्रभाग रचना कार्यक्रम एप्रिल ते मे या कालावधीत होणे आवश्यक होते. परंतु कोव्हीड -१९ संसर्गामुळे सर्व येणाऱ्या निवडणूकांचे टप्पे स्थगित करण्यात आले. आता शासनाने मिशन बीगीन अगेन (अनलॉक १) सुरू केले असून त्यानुसार विविध अटी व शर्तीचे पालन करूनशासकीय कार्यालय,खासगी कार्यालय, दुकाने/व्यवसाय, शाळा इत्यादी सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे कार्यालयात बसून होऊ शकणाऱ्या व जनता/मतदारांचा संपर्क नसणाऱ्या अशा निवडणूकांच्या टप्प्यातील विविध कामकाज करता येऊ शकेल, असे आयोगाचे मत आहे. म्हणून कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर अशा दोन्ही महापालिकांचा प्रभाग रचना तयार करण्यासाठी करावी लागणारी पूर्वतयारी व कच्चे प्रारूप (अशी सर्व कामे जी कार्यालयात राहून करता येतील) ती करण्यास मंजूरी देण्यात येत आहे.
 
त्या १८ गावांचे काय होणार?
राज्य निवडणूक आयोगाने दोन्ही महानगरपालिकांच्या आयुक्तांना तसे पत्र धाडले आहे. या पत्रात आगामी निवडणुका या ठरलेल्या वेळेत घेतल्या जातील, असे स्पष्ट केले असले तरीही कल्याण-डोंबिवलीतील १८ गावांच्या वेगळ्या नगरपालिका होणार का? हा प्रश्न कायम आहे. अलीकडे राज्य सरकारने कल्याणडोंबिवलीतील २७ गावांचा प्रश्न मार्गी लावला होता. यातील ९ गावे ही केडीएमसीमध्येच ठेवण्यात आली होती. तर इतर १८ गावांची नगरपालिका स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
 
निवडणुका एक सदस्यीय पध्दतीच्या
राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका एक सदस्यीय पध्दतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून हिवाळी अधिवेशनात घेण्यात आला आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करणारे विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आले. त्यानुसार कोल्हापूरसह कल्याण-डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक एक सदस्यीय पद्धतीने होणार आहेत. निवडणूक आयोगाने दोन्ही महापालिकांना निवडणुकीकरता एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केल्यानुसार सदस्य संख्या, आरक्षणाची माहिती, हद्दीतील लोकसंख्येची सुधारीत आकडेवारी, कच्चा आरखडा पाठवण्याचे आदेशही दिले आहेत.
 
सदर कामकाज करताना शासनाने शासनाने ३१ डिसेंबर रोजी प्रसिध्द केलेला सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.३६ अन्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २०१९ प्रसिध्द केले असून त्यानुसार महानगरपालिकांच्या निवडणुकांकरिता एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली आहे. एक सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग रचनेचे प्रस्ताव तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ३ व १४ जानेवारी रोजी तसे आदेश पत्रांद्वारे निर्गमित केले आहेत.
या संदर्भात कच्चा आराखडा तयार होताच आयोगास कळविण्यात यावे, असे राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार उप सचिव अविनाश सणस यांनी कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महानगरपालिकांच्या आयुक्तांसह कोकण व पुणे विभागीय आयुक्त आणि ठाणे व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.