दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रती एकरी रु. ५,००० मदत द्दयावी - आ. राणाजगजितसिंह पाटील

जनदूत टिम    24-Jun-2020
Total Views |
उस्मानाबाद : सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून खरीपामध्ये सोयाबीनचा सर्वाधिक पेरा केला जातो. गतवर्षी सोयाबीन पीक काढणीला आले असता अवकाळी पावसाने भिजून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यावेळी पेरणीसाठी सोयाबीनसह इतर पिकांच्या बियाण्यांची जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण होऊ शकते व शेतकऱ्यांनी कशीबशी शेतातील पूर्व मशागतीची कामे संपविली असली तरी पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खते इत्यादी कोठून आणायचे हा मोठा प्रश्न आज त्यांच्यासमोर उभा राहील.
 
Ranadada_1  H x
 
या अनुषंगाने वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटाला सामोरे जाऊन कसाबसा उभारण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यास कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आर्थिक आणीबाणीच्या छायेत खरीप हंगामासाठी बांधावर मोफत बी-बियाणे व खते पेरणीपूर्वी मे महिन्यात उपलब्ध करून देणेबाबत शासन स्तरावर सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा याबाबत मे महिन्यामध्ये शासनाकडे विनंती केली होती. शासनाकडुन या मागणीचा विचार झाला नाही. शेवटी नाईलाजास्तव शेतकऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे बियाणे वापरुन पेरणी केली. परंतु मुळात बियाणेच सदोष असल्याने उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. त्यामुळे निसर्गाच्या दुष्ट चक्राचा कायम सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी राज्य सरकारने प्रती एकरी रु.५,००० द्दयावेत अशी आग्रही मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
 
अनेक वर्षांनंतर जून मध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरुवात झाली होती. ओल चांगली असून देखील पेरणी केलेले सोयाबीन उगवून न आल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता वाढली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात हीच परिस्थिति आहे. पुनः एकदा शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या अनुषंगाने खालील महत्वाच्या बाबी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्राद्वारे निदर्शनास आणुन दिल्या आहेत.
 
१. खरीप हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा करण्यात आला. गेल्या कांही दिवसात बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत.
 
२. प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे.
 
३. कृषी विद्यापीठाकडे चाचणीसाठी दिलेल्या बियाण्यांपैकी ५०% पेक्षा जास्त बियाणे उगवण क्षमतेबाबत समाधानकारक नाहीत असे निदर्शनास आल्याचे समजते.
 
४. सदोष बियाण्यांचे कारण हे प्रामुख्याने गतवर्षी काढणीच्या वेळेस झालेला अवकाळी पाऊस हे असल्याचे तज्ञांचे मत आहे. असे असल्यास दुबार पेरणी नंतर अशा बियाणांची उगवण व वाढ कशी होणार असा प्रश्न उपस्थीत होतो.
 
५. उपरोक्त बाबींचा विचार करून कृषी विभागाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते, तसे केल्याचे दिसत नाही.
 
६. उगवण नसलेल्या क्षेत्राचे पंचनामे करून ग्राहक संरक्षण मंचात नुकसान भरपाईची मागणी केली तरी प्रत्यक्षात भरपाई मिळेल किंवा किती कालावधीने मिळेल याची शाश्वती नसते.
 
मागील खरीप हंगामामध्ये प्रमुख नगदी पिक असलेल्या सोयाबीनचे झालेले नुकसान व लॉकडाऊनमुळे शेतमालाला न मिळालेला योग्य भाव यामुळे शेतकरी प्रचंड आर्थीक अडचणीत आहे. त्यातच सोयाबीन बियाणे मोठ्या प्रमाणात निकृष्ट असल्यामुळे उगवण क्षमतेत झालेल्या घटीच्या पार्श्वभूमीवर दुबार पेरणीच्या अधिकच्या होणाऱ्या खर्चाबरोबरच सदोष बियाण्यांमुळे सोयाबीन पिकाची या हंगामात उगवण, वाढ व उत्पादन काय होणार याबाबत शेतकरी चिंतेत आहे. या सर्व गंभीर बाबींचा विचार करून दुबार पेरणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना (घरगुती बियाणे वापरणाऱ्यासह) प्रती एकरी रु.५,००० मदत द्दयावी, बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत असलेल्या व्यापक सांशकतेचा विचार करता कृषी विद्दयापीठाच्या बीज परिक्षण चाचणीतुन मिळालेली माहिती जनतेसमोर मांडावी तसेच या खरीप हंगामात सोयाबीन पिकाबाबत सर्व बाबींचा सांकल्याने विचार करून शासनाने धोरण जाहीर करावे अशी आग्रही मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्याकडे
केली आहे.