गरज धडा शिकवण्याची!

जनदूत टिम    18-Jun-2020
Total Views |
१९६२ च्या युद्धानंतर भारत आणि चीन यांच्यामध्ये पहिल्यांदाच मोठा संघर्ष घडून आला आहे. चीनकडून करण्यात येणारी कोणतीही कारवाई ही अचानकपणाने कधीही केली जात नाही. त्यांचा दूरगामी दृष्टिकोन असतो. पालवान नदीच्या खोऱ्यात चीनने सुनियोजितपणाने केलेला भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी आणि तितकाच चिंताजनकही आहे.
 
Chaina_1  H x W
 
गेल्या ३० वर्षांमध्ये चीन लडाखच्या क्षेत्रात सातत्याने अतिक्रमण करीत आहे. दोन किलोमीटरपर्यंत घुसखोरी करतात, अर्धा किलोमीटर मागे जातात, असे सत्र सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते गलवान, पँगाँग, फिंगर एरिया आदी भागात घुसखोरी करीत आहेत. वास्तविक, चीनचा डोळा हा दौलतबेग ओल्डी आणि कारकोरम खिंडीवर आहे. तेथे कब्जा मिळवण्यासाठीची ही धडपड आहे. चीनला दौलतबेग ओल्डीपर्यंत (डीबीओ) पोहोचायचे आहे. तेथे भारताची जगातील सर्वाधिक उंचीवरील धावपट्टी (रनवे) आहे. कारकोरमवर ताबा मिळवला की, चीनला सियाचीन हिमनदीपर्यंत आणि कारगिलपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. तसे झाल्यास चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर चीनचे पूर्ण अधिपत्य प्रस्थापित होईल. अरुणाचल प्रदेशातील भूभागाची मागणी भारत कधीच मान्य करणार नाही. उत्तराखंडमध्ये चीनला आपण रोखण्यात यश मिळवले आहे. लडाख हा सामरिकदृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून चीनसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग झाला आहे. या क्षेत्राचा वापर करून भारत तिबेटमध्ये आपल्याविरुद्ध एक मोहीम तयार करू शकतो, अशी चीनला भीती आहे. तसेच, शिनशियाँग प्रांतातील उघूर समाजाच्या लोकांकडून स्वतंत्र प्रांताची मागणी होत आहे, त्याला भारत बळकटी देईल, असेही चीनला वाटते.
 
चीनने लडाख क्षेत्रात येण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. दुर्दैवाने गेल्या ३०-४० वर्षांत राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याकडे कानाडोळा करण्यात आला. मागील पाच-सहा वर्षांपासून या परिस्थितीत बदल झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत चीनच्या दबावापुढे झुकायचे नाही, अशी भूमिका आता विद्यमान शासनाने घेतली आहे. १९६२ च्या युद्धानंतर पाच वर्षांनी १९६७ मध्ये सिक्कीम क्षेत्रामध्ये नाथु ला क्षेत्रात भारतीय सैन्याने चिनी सैन्याला चांगला धडा शिकवला होता. त्यानंतर चिनी सैन्य तिथे कधी आले नाही. कारगिल युद्धाच्या काळात मी स्वतः सेवेत होतो. भारत पाकिस्तानशी लढत असल्याची वेळ साधून चीनने त्यावेळी अरुणाचल प्रदेशात गडबड करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही आम्ही त्यांना चांगला धडा शिकवला होता. त्यानंतर आजपर्यंत चिनी सैन्य पुन्हा त्या क्षेत्रात आले नाही. याचा अर्थ एकच आहे की, जर आपण चीनला घाबरून राहिलो तर तो डोक्यावर बसतो. ही स्थिती न येऊ देण्यासाठीच आपण मागे हटता कामा नये! एक इंचही जमीन शत्रूला द्यायची नाही, अशी भारताची राष्ट्रीय मानसिकता आहे. त्यामुळेच भारतावर चीन सामरिक, आर्थिक, आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यासाठी धडपड करीत असतो.
 
युद्धशास्त्राच्या नियमानुसार, तुम्ही जर युद्ध न करता आपल्या शत्रूला दबावाखाली राखण्यात यशस्वी झालात तर ते तुमच्या बुद्धिमत्तेचे निदर्शक असेल. चीनला भारताबरोबर युद्ध करायचे नाहीये. कारण १९६२ चा भारत आणि २०२० चा भारत यामध्ये जमीन-अस्मानचे अंतर आहे, हे चीन ओळखून आहे. आज भारताबरोबर जवळपास १५३ राष्ट्र उभी आहेत. परंतु, युद्धशास्त्राचा आणखी एक सिद्धांत आहे, शत्रूची युद्धक्षमता कमी करण्यासाठी त्याला गुंतवून ठेवा; जेणेकरून त्याला युद्धक्षमता विकसित करण्यासाठी फुरसतच मिळणार नाही. त्यासाठी चीन या कारवाया करीत आहे. 'कीप इंडिया एंगेज' हे चीनचे भारताविरुद्धचे सूत्र आहे. भारताला अंतर्गत समस्यांमध्ये, पाकिस्तानशी संघर्षामध्ये, माओवाद्यांशी लढण्यामध्ये गुंतवून ठेवा; जेणेकरून भारत प्रगती करू शकणार नाही, अशी चीनची रणनीती आहे. या पार्श्वभूमीवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धशास्त्र पाहिले, चाणक्यनीती अभ्यासली तर या सर्वांमध्ये हेच सांगितले आहे की, जर तुम्हाला युद्ध टाळायचे असेल तर तुम्ही युद्धासाठी तय्यार राहा. तत्पर राहू नका; पण सामरिकदृष्ट्या सज्ज राहा. तुम्ही जर युद्धासाठी सक्षम, योग्य किंवा तयार नसाल तर युद्ध तुमच्यावर थोपवले जाईल आणि ते अशा जागी, अशा वेळी, अशा स्थितीत थोपवण्यात येईल ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसेल! लडाखमध्ये नेमके हेच घडले आहे. भारताने जराही मागे हटण्याची गरज नाही.
 
मी दहा वर्षे चीनबरोबर वाटाघाटी केलेल्या आहेत. १९९३ च्या भारत-चीन शांती समझोत्याचे ड्राफ्टिंग मी केलेले आहे. या अनुभवावरून मी सांगतो की, चीन केवळ लडाखपुरता मर्यादित राहणार नाही. म्हणूनच येणाऱ्या काळात भारताने आपली क्षमता वाढवण्याची गरज आहे. क्षमता वाढली की योग्यता वाढते. क्षमता आणि योग्यता वाढली की आपली शक्ती वाढते. चीनने हेच केले. आपली क्षमता, योग्यता, आर्थिक, औद्योगिक शक्ती वाढवली, सामरिक क्षमता वाढवली आणि आता तो जगाला ललकारतो आहे.अर्थात, चीनच्या मनात भारताविषयीची भीतीही आहे. परंतु, काही राजकीय पक्षांनी-नेत्यांनी चीन महाबलशाली आहे, असा प्रपोगंडा करून भारतीयांच्या मानसिकतेवर परिणाम केला आहे. जगामध्ये असे कोणतेही राष्ट्र नाही ज्याम ध्ये काही उणिवा, कमतरता, कच्चे दुवे नाहीत. त्या उणिवांचा अभ्यास करून त्यावरच जर आघात केला तर ते राष्ट्र निश्चितपणाने गलितगात्र होते. आपण चीनच्या कमतरतांचा, उणिवांचा, मर्मस्थळांचा अभ्यास करून त्यावर बोट ठेवले पाहिजे. माझ्या अनुभवावरून सांगेन की, चीनच्या एकूण १९ कमतरता किंवा दुबळी स्थाने आहेत; त्यापैकी सात कमरतांवर जरी आपण हल्ला केला तर लडाखमध्ये एक पाऊलही पुढे टाकण्याची चीनची हिंमत होणार नाही!