तिकीट खिडक्यांवर गर्दी

जनदूत टिम    18-Jun-2020
Total Views |
काही दिवसांपासून ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर भागांतील बस थांब्यांवर लागणाऱ्या रांगा घटल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले, तर बस प्रवास आणि कोंडीमुळे बदलापूर ते मुंबईपर्यंतचा कामानिमित्त होणारा आठ तासांचा प्रवास रेल्वे सेवेमुळे अवघ्या दोन तासांवर आल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
 
Ticket Khidki_1 &nbs
 
ठाणे, डोंबिवलीतील बस थांब्यांवर नेहमी प्रवाशांची गर्दी असायची. मात्र रेल्वे सेवा सुरू झाल्याने बस थांब्यांवरील गर्दी आटली तर रेल्वे स्थानकांमध्ये तिकीट काढण्यासाठी रांगा लागण्याचे चित्र दिसून आले. ठाणे, डोंबिवली, बदलापुरात बस थांब्यांवर शुकशुकाट, मात्र रेल्वे तिकीट खिडक्यांवर गर्दी. ठाणे ते बदलापूपर्यंतच्या रेल्वे स्थानकांबाहेर मंगळवारी सकाळी तिकीट काढण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. गर्दी आणि कोंडीच्या बस प्रवासातून सुटका झाली असली तरी रेल्वे स्थानकाबाहेर तिकिटांसाठी रांगेत उभे राहावे लागल्याने कर्मचाऱ्यांचे हाल झाले.
 
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने मंगळवारी शहरातील विविध मार्गावरील रेल्वे स्थानकापर्यंत ९० बसगाडय़ा सोडल्या होत्या. प्रत्येक बसगाडय़ांमध्ये केवळ १० ते १२ प्रवासी होते. अनेक शासकीय कर्मचारी त्यांच्या खासगी वाहनातून ठाणे रेल्वे स्थानक गाठत असल्याने टीएमटीवरील भार हलका झाल्याचे चित्र होते. तिकिटासाठी स्थानक परिसरात कर्मचाऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.
 
उपनगरी रेल्वे वाहतूक बंद असल्याने सर्वच नोकरदारांना मुंबई, ठाणे, वसई, नवी मुंबई भागांत जाण्यासाठी बस हा एकमेव पर्याय होता. त्यात बेस्ट, राज्य परिवहन सेवा आणि इतर परिवहन विभागाच्या बसगाडय़ा केवळ डॉक्टर, परिचारिका, पालिका कर्मचारी, एसटी व इतर अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांची वाहतूक करीत होत्या. त्यामुळे इतर नोकरदारांना रांगेत बसगाडय़ा उपलब्ध होत नव्हत्या. सोमवारपासून शासकीय, पालिका कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्र दाखवून लोकलमधून प्रवास करण्यास मुभा मिळाली आहे. त्यामुळे मागील दोन महिने बससाठी रांगेत उभे राहून प्रवास करणारा बहुतांशी कर्मचारी दोन दिवसांपासून लोकलने प्रवास करू लागल्याने बस थांब्यांवरील रांगा कमी झाल्या होत्या.
 
डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकातील बस थांबा सकाळी साडेपाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत नोकरदार प्रवाशांनी खच्चून भरलेला असायचा. मात्र रेल्वेसेवा सुरू झाल्याने या ठिकाणी गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना झटपट बस उपलब्ध होऊ लागल्या आहेत. बदलापूरमध्येही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. पूर्वी बसने बदलापूर, अंबरनाथसारख्या शहरांमधून मुंबईतील रुग्णालये, कार्यालय गाठण्यासाठी चार ते पाच तास लागत होते. मात्र मंगळवारपासून रेल्वेतून प्रवास केल्याने अवघ्या दीड तासात मुंबई गाठणे शक्य झाल्याने मानसिक समाधान मिळाल्याच्या प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी दिल्या आहेत. बससेवेवरील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा ताण कमी झाल्याने खासगी कर्मचाऱ्यांनाही विनारांग बस मिळू लागल्या आहेत.
 
अत्यावश्यक सेवेतील मुंबई महापालिका, रुग्णालय सेवेतील कर्मचारी स्थानकाबाहेर ओळखपत्र घेऊन उभे होते. मात्र मासिक पासची मुदत संपल्याने रेल्वे प्रशासनातील कर्मचारी प्रवाशांना तिकिटाच्या रांगेत जाण्यासाठी सांगत होते. त्यामुळे सामाजिक अंतर पाळत तिकीट घरांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दररोज मोठय़ा प्रमाणावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी बसने कार्यालयात जात असल्याने बसस्थानकांवर मोठय़ा रांगा पाहायला मिळत होत्या. त्या रांगा मंगळवारी ओसरलेल्या दिसल्या. तिकीट, नवा पास किं वा नूतनीकरणाकरिता बहुतांश स्थानकांवर मर्यादित खिडक्याच कार्यरत असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी लोकल प्रवासाचा दुसरा दिवस रांगेत तासन्तास तिष्ठत उभे राहून काढला. तिकीट मिळविण्याचे दिव्य पार पाडल्यानंतरही पुढे ओळखपत्र तपासणी आणि थर्मल स्क्रीनिंगमुळे लोकल गाठण्यात विलंब होत होता. मधल्या स्थानकांवर गाडय़ा थांबत नसल्यानेही अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळी सात वाजल्यापासून मध्य रेल्वेवरील ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली, कु र्ला, घाटकोपर, दादर या स्थानकांत तिकिटाच्या रांगा लागल्याचे चित्र होते. काही स्थानकांत सकाळी गर्दीच्या वेळी दोनच तिकीट खिडक्या सुरू होत्या. एकाच तिकीट खिडकीवर अनेक कामे होत असल्याने रांगा वाढतच होत्या.