आता गरज आत्मविश्वासाची

जनदूत टिम    15-Jun-2020
Total Views |
२५-३० वर्षांपूर्वी खेड्यातील समाजव्यवस्था परस्परांवर अवलंबून राहणारी अशी होती. अलुतेदारबलुतेदार पद्धत तेव्हा प्रचलित होती व काही प्रमाणात आजही आहे. गावातील कुणाच्याही मुलीला पाहुणे पाहायला यायचे म्हणजे सर्वांच्या घरातील प्रत्येकी एक महिला स्वयंपाक करण्यासाठी मुलीच्या घराकडे हजर होत असत.
 
Aatmavishwas_1  
 
पाहुणे येण्याआधी गावातील प्रतिष्ठित मंडळी कार्यक्रम स्थळी हजर होऊन सर्व व्यवस्थांवर नजर ठेवून असत. मुलीला पाहुणे पाहायला आल्यावर कुणीकडे तोंड करून बसवायचे इथपासून वडीलधाऱ्यांचे लक्ष असे. गावातील स्वयंस्फूर्तीने काम करणारी तरुण मंडळी कुणी पाणी देणे, चहा देणे, सरबत, हातपाय धुण्याच्या व्यवस्थेला लागत. गावातील बलुतेदाराने जेवणासाठी आमंत्रण म्हणून घरोघरी जाण्याची प्रथा आजही खेड्यात आहे. पूर्वी वाहनांची उपलब्धता नसल्यामुळे चार दिवसांचे विवाह असत. त्यामध्ये नवरदेव-नवरी यांना बोहल्यावर उभे करत त्या बोहले बांधण्याचाही एक छोटा कार्यक्रम पूर्वी होत असे. त्यासाठी पांढऱ्या मातीचे भेंडे, औताचे लोड, ते बांधकाम करणारे गावातीलच अनुभवी मिस्त्री असत. ते बांधकाम पूर्ण झाल्यावर पिठलं-भाकरीचे, ती हातावर घेऊन खाण्याचा व त्या चवीचा आनंद काही औरच असे. नंतर नवऱ्या मुलाला हळद लागत असे, हळद, वानिश्चय, लग्न असा तो विधी असो.
 
वाङ्निश्चय गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आल्याशिवाय सुरू होत नसे. ते आल्यावर पुरोहित त्यांना मानाचा कुंकवाचा टिळा लावत व मग कार्यक्रमाला सुरुवात. सायं गोरज मुहूर्तावर लग्न असे. वहाडी मंडळी टांगा, गाडी बैलात येत असत. गाडीचे बैल किंवा टांग्याचे घोडे कुणाच्याही गावखूर वा वाडग्यात सोडण्याची मुभा वहाडी मंडळींना असे. लग्न लागल्यावर वहाडी मंडळीमधील महिलांची पंगत, त्यांना यथोचित मान देणे, वरमाई त्यांचे पाय धूत, त्यांची विशेष विहीण पंगत गावातील सर्व जण कर्तव्य भावनेतून करत असत. वहाडी मंडळीचे जेवण झाल्यावर मुक्काम असे. दुसऱ्या दिवशी सकाळीच गावकरी मुलीला निरोप देण्यासाठी हजर असत. नवरदेव नवरी उभयता गावातील मंदिरात दर्शनासाठी जात असत. देवाचे दर्शन झाल्यावर गावातील सर्व वडीलधारे व त्यांचे दर्शन मुलगी घेत असे तोपर्यंत बॅण्डवाले 'निघाले आज तिकडच्या घरी' हे माणिक ताईंचे गाणे वाजवायला सुरुवात करत असत. त्यातील पहिले कडवे पडते पाया तुमच्या बाबा काय मागणे मागू' हे गावकऱ्यांच्या कानावर पडणे व समस्त गाव रडायला, गहिवरायला लागलेले मी पाहिले आहे.
 
दिवाळीच्या सुरुवातीला वसुबारस असते. त्या दिवशी सायंकाळी गायीला, वासराला ओवाळणे, त्यांची कृतज्ञतापूर्वक पूजा करण्याची प्रथा होती. गरमगरम भात गायीसह वासराला खाऊ घालत असत. त्याकाळचे गुराखी आपल्या कामाचा शीण हलका करण्यासाठी काही स्वरचित गाणेही म्हणत असत 'मासा गेला, सुळसुळु --- रडे मुळुमुळू --- मासा म्हणतो जाईनजाईन----खाईन-खाईन' हा गीत प्रकार सर्वांना खळखळून हसायला लावत असे. ग्रामीण भागात आजही वाडा झाडण्यासाठी फडा वापरतात. वर्षातून दोनदा-तीनदा झाडू तयार करणारे पुरुष वा बाया ते आणून देतात. ते लक्ष्मीचे प्रतीक म्हणून प्रत्येक घरातील गृहिणी त्या झाडूची हळद-कुंकू वाहून पूजा करतात. गाय, वासरू, बैल हे सजीव आहेत; परंतु स्वच्छतेचे प्रतीक असणाऱ्या झाडूंचीही आपण पूजा करतो, ही खऱ्या अर्थाने प्रतिकोपासनाच खेड्यात शेवाया, वळवट, खारोड्या, कुरडई, पापड्या याला वाळवण असे म्हणतात. ते करण्यासाठी आपल्या गल्लीतल्या व शेजारणी स्त्रिया उत्साहाने एकमेकींकडे जातात.
 
खारोड्या झाल्यावर त्याच्या कण्या तेल टाकून खाण्यात, गव्हाच्या पापड्याचा चीक गूळ टाकून खाण्यात काही वेगळीच मजा असते. एखाद्याच्या घरी गाय व्याली की, त्याचा खरवस करतात तोही सगळे जण वाटून आनंदाने खातात. दुपारी मुले शाळेतून घरी दुरडीमध्ये ठेवलेली भाकरी कुस्करून त्याच्यावर काळे तिखट व करडीचे तेल, कैऱ्याच्या तिखटमीठ-फोडणीच्या फोडी असे जेवण घेत. याला खब असे म्हणतात. तास-दीड तास कबड्डी, विटी-दांडू, गोट्या, सूरपारंब्या, मुलींसाठी दोरीवरील उड्या, सागरगोटे, चिंचोके असे खेळ प्रकार असत. अगदी लहान मुले भिरभिरा करून तो तोंडात धरून वाऱ्याच्या दिशेने तोंड करून घंटा-घंटा देहभान विसरत. प्रत्येकाकडे गाय असत, तिचे वासरू दामटणे हाही एक व्यायामाचाच भाग होता.
 
शेतात विहिरीवर, नदीवर पोहायला जाणे यामुळे तरुण-तरुणींच्या तब्येती काटक असत. मुलींच्या खेळामध्ये भुलाबाई नावाचा एक खेळ प्रकार होता. त्या भुलाबाईला बंद डब्यात खाऊ तयार करून ओळखायचा, त्या डब्यात खाऊ कोणता तर गुळ-पोळीचे लाडू, शेंगदाणे, गुळाचा लाडू असे गरिबांना परवडणारे पदार्थ असत. काळ बदलला, जागतिकीकरण आले, औद्योगिक क्रांती आली, दळणवळण वाढले, खेडेगावातील सुशिक्षितांचे लोंढेच्या लोंढे शहराकडे स्थलांतरित झाले, खेड्यातील सर्वसमावेशक सामाजिक व्यवस्था कोलमडली, परस्परांवर अवलंबून गावगाडा चालवणे बंद झाले. एकत्र कुटुंब पद्धतीचा लोप झाला, सत्तेबरोबर कुटुंबाचेही विकेंद्रीकरण झाले. गावातील वाडा संस्कृती नष्ट झाली. फ्लॅटचा, रो-हाऊसचा बंद दार प्रकार रूढ झाला, घरातील आजोबा-आजी नकोशी झाली, माया, प्रेम, आपुलकी, आत्मीयता हे शब्द फक्त पुस्तकातच वाचायला मिळायला लागले. शहरात राहून स्वाभिमान विकून कुठल्याही मार्गाने पैसा कमावणे सुरू झाले. राष्ट्रधर्म, आपदधर्म, शेजारधर्म याचा सोयीस्कर विसर पडला. खेड्यातील पारंपरिक पण मर्यादा व्यक्ती करणारी वेशभूषा बदलली. त्या वेशभूषेबरोबर मनेही बदलली.