कोरोनाने गाव दाखवला...

जनदूत टिम    09-May-2020
Total Views |
छे छे , कोण जाणार खेडेगावात सुट्टीला?
किती गरम होतं? आमच्या मुलांना एसी शिवाय झोप येत नाही? जनावरांच्या गोठ्याचा किती घाणेरडा वास येतो?
सगळीकडे नसती धूळ असते. मुलांना ऍलर्जी होईल धुळीची. गावाला फ्रीज नाही मुलांना थंड पाण्याची सवय आहे, पोतं गुंडाळलेल्या डबड्यातलं पाणी कोण पिणार?
किती डास चावतात तिकडे?
रस्ते किती खराब आहेत, आपली गाडी खराब होईल ना..
गावाला किती गावंडळ बोलतात आपल्या मुलांची भाषा बिघडेल ना? वगैरे वगैरे वगैरे...
त्यापेक्षा इथेच मुलांना समर कॅम्प मध्ये पाठवू मस्त पोहायला, डान्स, सिंगिंग शिकेल वगैरे वगैरे....

Sujitsingh Thakur00231_1& 
 
साधारणपणे असा विचार शहरात वास्तव्यास राहणारे आणि वर्षानुवर्षे गावाला न येणारे, तथाकथित पुढारलेले लोक करतात असं निरीक्षण आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झालं आणि ही मंडळी मिळेल त्या रस्त्याने, मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या साहित्यानिशी गावाला आली. यातील अनेकांना तर रस्ता विचारत विचारत यावं लागलं. अनेक जणांना गावाला जवळचं कोणी नाही किंवा स्वतःचं घर नाही म्हणून पाहुण्यांचा आसरा घ्यावा लागला.
नाईलाजाने म्हणा किंवा कसेही आता ही मंडळी हळू हळू स्थिर स्थावर होत आहेत. शेतात जात आहेत, 'सेल्फी' पुरतं का होईना पण हे काहीतरी काम करत आहेत. कुठल्याही ट्रेनिंगशिवाय मुले पोहायला शिकली आहेत, ट्रॅक्टर चालवायला शिकले आहेत, झाडाला झोका बांधून खेळत आहेत. रात्री शेतात आकाशातल्या चांदण्या मोजत मोजत झोपी जात आहेत. आपल्या शेजारी कोण कोण राहतंय हेही आता यांना माहीत झालंय. इकडची अस्वछता आता यांना त्रास देत नाही (किंवा जाणवत नाही). गावंढळ बोलणाऱ्याचा त्रासही आता होत नाही. आपला रंग फिका पडेल की काय याची भीतीही राहिली नाही. या सर्वांना आता शहरांपेक्षा जास्त सुरक्षित वाटू लागलं आहे, कारण प्रश्न जीवन मरणाचा झाला आहे.
पूर्ण जग थांबलेलं असताना शेतकरी थांबला नाही, आपल्या घराला पोटभर भरवून तो जगाला भरवतोय. नेहमीच करतोय. पिझ्झा, बर्गर, KFC, मॉल्स, पब डिस्को हे सर्व जीवनावश्यक नसून शेतकरी पिकवेल तेच फक्त जीवणावश्यक आहे हे आतातरी आपल्याला उमगलं असावं अशी आशा आहे.
हे संकट टळेल, आपण पुन्हा आपल्या भावविश्वात बुडून जाऊ, पण ग्रामीण भागाच्या प्रश्नाचं काय? शेतकाऱ्यांच्या प्रश्नाचं काय?
आपल्या डोळ्यासमोर शेतकऱ्याने जीवाचं रान करून आणि रानात जीव ओतून पिकवलेल्या मालाचं मोल काय देतो आपण?
५०-६० रु. प्रति लिटर दूध जे आपण शहरात घेतो त्याचा भाव शेतकऱ्यांना २० रु ने मिळतो आणि त्यासाठी त्याला किती जीव काढावा लागतो हे आपण पाहिलंय.
अर्धा तास वीज खंडित झाली की विजमंडळाला जेरीस आणणारे आपण शेताला पाणी द्यायला रात्री अपरात्री जाणाऱ्या शेतकऱ्याला पाहिलंय.
जे कलिंगड १२०-१५० रुपयांना घेतो ते कलिंगड 'ओ पाहुनं या कलिंगड घेऊन जा पोरांना' असं म्हणत हातात नाही बसणार एवढी मोठी कलिंगड फुकट देणाऱ्या शेतकऱ्याला आपण पाहिलंय.
जे कांद्याचे भाव कडाडले की बोंबा मारणारे आपण पाहिलं आहे की कांदे काढून ते साठवण्यासाठी किती आटापिटा करावा लागतोय. अवकाळी पाऊस येण्याची चिन्ह दिसलं की झाकपाक करायला शेतात धावपळ करताना आपण या शेतकऱ्याला पाहिलंय. अनेक लोकांनी अनेक गोष्टी यावेळी कदाचित आयुष्यात पहिल्यांदा पाहिल्या असतील, अनुभवल्या असतील.
आपण बाकी काही शिकलो असू किंवा नसू कमीत कमी ग्रामीण भागातील जगणं आपण जर शिकलो असेल तर या महामारीमुळे आपण खऱ्या अर्थाने समृद्ध झालो असं म्हणावं लागेल.
जेव्हा आपण मूळ ठिकाणी जाऊ तेव्हा या सर्व गोष्टींची नोंद ठेवू. कमीत कमी वर्षातून दोनदा तरी गावाला जाऊ. आई वडील भावंडांना एक छोटंसं टुमदार घर बनवायला मदत करु. त्यांच्या अडीअडचणीत त्यांना मदत करू. मुलांना गाव काय असतं ते वरचे वर दाखवत जाऊ. एखाद्या रिसॉर्ट वर जाऊन बैलगाडीत बसण्यापेक्षा, चुलीवरच जेवण मिळतं म्हणून आवडीने एखाद्या ढाब्यावर जाण्यापेक्षा हाच आनंद गावात येऊन घेऊ.
जसे समाज माध्यमांवर आपण हॅशटॅग चालवतो #Isupportअमुकतमुक, #IamAt204060, #metooबिटू तसेच हॅशटॅग आपल्या शेतकऱ्यासाठी चालतील का हा विचार करू. शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी आपण बोलू. व्यापाऱ्यांकडून माल घेण्यापेक्षा थेट शेतकऱ्यांकडून घ्यायला प्राधान्य देऊ. सरकार काय करेल ते करेल नाहीतर मरेल पण आपण शेतकऱ्याला मरू देता कामा नये.
 
कारण शेतकरी वाचला तर देश वाचेल! होय, याचा प्रत्यय आपल्याला आता आलाच असेल.