समाज : लॉकडाउन आधी आणि नंतर

जनदूत टिम    05-May-2020
Total Views |
समाज, समाज्यातील प्रत्येक व्यक्ती, व्यापारी, औद्योगिक समुह यांची आर्थिक घडी बसवणारा हा विषाणू आपणा सर्वांसाठी एक आव्हान होऊन बसला आहे.
 
corona-virus_1  
 
याचा फैलाव थोपविण्यासाठी आपण सरकारी आदेश्याने स्वतःला तीन आठवडे घरात बंद करून घेतलं(?) आता हीच टाळेबंदी दोन आठवड्याने अजून वाढविली. यात फक्त माणसच नाही तर त्याने उभे केलेले उद्योगधंदे ही बंद राहिले आणि यामुळेच इकडे आड तिकडे विहीर या उक्ती प्रमाणे एका संकटाला थोपवण्यासाठी सुरु केलेल्या टाळेबंदीमुळे, एकापेक्षा एक संकट डोक वर काढू पाहत आहेत. या संकटांचा एकत्र सामना करण्यासाठी सरकारने जिल्हानिहाय हिरवा, नारंगी आणि लाल असे विभागीय विभाजन करून लाल, जिथे पंधरापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत तिथे टाळेबंदी सुरु ठेऊन बाकीच्या ठिकाणी जिल्हांतर्गत शेती, छोटे उद्योग व व्यवसाय यांना व त्यासाठी लागणाऱ्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. पण या परवानगीने आपली आणि प्रशासनाची जबाबदारी नक्कीच वाढणार आहे.
 
प्रशाषण तासातासाला घरात रहा सुरक्षित रहा ‘ अस ओरडून सांगत असताना केवळ बाल-जीज्ञासेपायी, नक्कीच पोलीस बंदोबस्त चोख आहे का? बंदोबस्तात लोकांना मार कसा मिळतो?, रिकामे रस्ते कसे दिसतात? हे सर्व अनुभवण्यासाठी जाणारे खुश्शाल शौकीन पण बरेच. फक्त अत्याश्यक वस्तूसाठी बाहेर पडायचं असताना, चिकन, मटण आणि विविध पदार्थ बनवण्यासाठी खरेदीसाठी दुकानांसमोर रांगा लावणारे पण आपणच. शेवटी जे नाही करायला सांगितला, ते खरच नाही केलं तर आपण माणूसच कसे? अशी आमची कुलोत्पन्न परंपरा, पण या आपल्या वागणुकीतून आपण आपले शिक्षण, मुल्ये आणि व्यक्तिमत्व यांचे प्रदर्शनच करत नाही का? कि या पुढे जीवनावश्यक आणि चैन म्हणजे काय आणि या पैकी एकासाठीच घरातून बाहेर पडायचं हे पण आपल्या पुढाऱ्यांनी सांगण्याएवढे आपण अडाणी आहोत का? सामाज्याचा एक घटक म्हणून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे, प्रशासनाची अडचण वाढवण्यापेक्षा त्यांना सहकार्य करणे आणि मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग करून एखादी कला कुसर शिकून स्वतःची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न करण हे एका सुशिक्षित माणसाकडून अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे जर आपल्या उपजीविकेचा मार्ग बंद झाला तर पर्यायी साधन शोधण, या गोष्टींचा विचार करणे काळाची गरज आहे कारण या विषाणूचा फैलाव थांबल्यानंतर आपल्याला बऱ्याच परिणामांना सामोरे जायचे आहे. हे परिणाम मानवाच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक व राजकीय अश्या प्रत्येक पैलूवर परिणाम करणारे असणार आहेत. आतापर्यंत चलती का नाम गाडी या म्हणी प्रमाणे चालणाऱ्या आरोग्य व शिक्षण विभागांचे पुनर्मुल्यामापन करून त्यांची कार्यक्षमता वाढवावी लागेल. आणि यासाठी आपल्यासारख्या प्रत्येक नागरिकाने सहकार्य केलं नाही तर पुढच्या पिढीला अभिमानाने सांगू शकू अस आपण काहीही देऊ शकणार नाही.
 
बाकीच्यांना बढती पगारवाढ या पासून वंचित रहावे लागेल. यातून आर्थिक मंदी निर्माण होईल. अर्थमंत्रालय आणि रिझर्व बँक यांचे कसब पणाला लागणार. हे सांगण यासाठीच कि आपल्याकडे असलेल्या साधनांचा काटकसरीने वापर करावा. येणारी एक दोन वर्ष अंधारमय असू शकतात. २००८ च्या आर्थिक मंदीनंतर ही सर्वात मोठी मंदी असणार आहे. २००८ च्या मंदीनंतर जागतिकीकरण हा उपाय होता मात्र या मंदीनंतर प्रत्येक देश स्वयंपूर्ण होण्याचा विचार करेल. कारण प्रत्येक देश दुसऱ्या देशाबद्दल संशयास्पद राहील. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन साठीची अमेरिकेची आर्तता. चीन ने आपल्याला पुरवलेले निकृष्ठ दर्जाचे सेफ्टी कीट या आणि असल्या गोष्टींतून प्रत्येक देश नक्कीच स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करतील. यासाठी आपण ही आपल्या गरजा शक्य तितक्या कमी केल्या पाहिजेत. प्रत्येक गावांनी प्राचीन भारतीय गावाप्रमाणे शक्य तितक्या प्रमाणात स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करावा. ग्रामपंचायत सारख्या प्रशासन संस्थांनी यासाठी प्रयत्नशील व्हावे. हिवरेबाजार हे गाव यासाठी आपल्यासाठी आदर्श आहेच.
 
यासाठी मूल्य-शिक्षण आणि देश हा धर्म व जाती याउपर आहे ही रुजवणी मनामनावर होणे आवश्यक आहे. आपत्तीनिवारण हा विषय औपचारिकता म्हणून नव्हे तर त्या विषयाचे गांभीर्य आणि प्रत्येकाची कर्तव्य विद्यार्थ्याच्या मनावर ठसवणे आवश्यक आहे, कारण हेच विद्यार्थी आपला पुढचा समाज आहे.
 
आता देशाची आर्थिक घडी चालू करण्यासाठी टाळेबंदी उघडल्यानंतर, आपण सामान्य नागरिक, महायुद्ध जिंकल्याप्रमाणे त्याचा आनंद साजरा करण्याची गरज नाही. फक्त गरजेपुरता बाहेर पडाव, बाहेर जाताना काही महिने तरी तोंडावर मास्क असावा, तूर्तास हातमिळवण्यापेक्षा लांबून नमस्कार करावा, समोरच्या व्यक्तीशी बोलताना योग्य तितके अंतर ठेऊन बोलावे. या सामान्य बाबींचा अवलंब करून स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे सरकार आणि प्रशासन यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आचरणात आणण्यातच आपली भलाई आहे यासाठी प्रत्येकाने आपली व आपल्या माणसांची, सामाज्याची काळजी घेण्यातच पुढील भवितव्य अवलंबून आहे.