IAS मनिषा म्हैसकरांच्या घरी दोन चिमुकल्या मुली, तरीही अधिकारी म्हणून 'कोरोना'च्या लढाईत आघाडी

जनदूत टिम    25-May-2020
Total Views |
मुंबई : देशात सर्वाधिक 'कोरोना'चे रूग्ण मुंबईत आहेत. मुंबईला 'कोरोना'च्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आठ IAS अधिकाऱ्यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. यांत IAS मनिषा म्हैसकर यांचाही समावेश आहे. 'कोरोना' युद्धासाठी म्हैसकर अपार कष्ट घेत आहेत. सरकारी अधिकारी म्हणून IAS म्हैसकर 'कोरोना' आपत्तीमध्ये दिलेली जबाबदारी मनापासून पार पाडताना दिसत आहेत. परंतु घरात चिमुकल्या दोन लेसचाही त्या सांभाळ करीत आहेत. अवघी दोन वर्षांची दोन बाळे घरी असताना म्हैसकर 'कोरोना'ची जबाबदारीही खंबीरपणे सांभाळत आहेत.
 
Manisha Mhaiskar_1 &
 
आई आणि अधिकारी अशा दोन्ही भूमिका पार पाडणाऱ्या म्हैसकर यांच्याबाबत अधिकारी वर्तुळात कौतुक केले जात आहे. म्हैसकर यांना दोन जुळ्या मुली आहेत. एकिचे नाव अतिशा, तर दुसरीचे नाव मोनालिसा. दोघीही जेमतेम दोन वर्षांच्या आहेत.
या दोन्ही मुलींचा सांभाळ करण्यासाठी घरातील अन्य सदस्य असले तरी आई म्हणून म्हैसकर यांनाही नियमित लक्ष द्यावेच लागते. दोन वर्षांच्या मुलांवर लक्ष ठेवण्याचीही गरज असते. म्हैसकर कुटुंबिय या चिमुकल्या परींची योग्य काळजी घेत आहेत.
'कोरोना' आपत्तीमध्ये मनिषा म्हैसकर यांच्यावर सरकारने महत्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. मुंबईमधील सरकारी व खासगी रूग्णालयांचे नियोजन त्या पाहतात. मुंबईमध्ये सध्या 'कोरोना'ची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 25 हजारांच्या पुढे गेली आहे.
रूग्णांना भरती करण्यासाठी रूग्णालये अपुरी पडू लागली आहेत. अशा परिस्थितीत मनिषा म्हैसकर आपले प्रशासकीय कौशल्य वापरून प्रत्येक नव्या रूग्णाला सामावून घेण्याची कसरत करीत आहेत.
 
रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी वर्गाची कार्यक्षमता महत्वाची आहे. धोका पत्करून काम करणाऱ्या या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणी समजून घेण्याचेही काम म्हैसकर करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन देत आहेत. म्हैसकर यांनी आपल्या फेसबुक पेजवरून अनेक डॉक्टर्सचे जाहीरपणे कौतुक केले आहे. गरजेनुसार त्या रूग्णालयांनाही भेटी देत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून 'कोरोना'बाबत केल्या जणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती त्या फेसबुक पेजवर नियमितपणे देत आहेत.
 
मनिषा म्हैसकर या धडाडीच्या व कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. सांगलीमध्ये दुष्काळ हटविण्यासाठी त्यांनी केलेल्या जलसंधारण कामाचे राज्यभर कौतुक झाले होते. तसेच उत्कृष्ट काम त्यांनी स्मार्ट सिटी योजनेमध्येही केले. त्यांच्या प्रयत्नामुळे राज्यातील अनेक शहरांनी देशात स्वच्छतेचे पुरस्कार पटकावले आहेत. 'कोरोना'च्या या लढाईतही मनिषा म्हैसकर खंबीरपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. 'कोरोना'च्या संकटातून मुंबई जेव्हा बाहेर येईल तेव्हा IAS मनिषा म्हैसकर यांचे योगदान सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल, अशा भावना काही अधिकाऱ्यांनी 'लय भारी'शी बोलताना व्यक्त केल्या.
 
जिव्हाळ्याच्या माणसांचीही म्हैसकर घेतात काळजी
कौटुंबिक व नोकरीची जबाबदारी सांभाळण्यात IAS म्हैसकर व्यस्त आहेत. इतक्या व्यस्त कामातूनही म्हैसकर आपल्या परिचितांना फोन करतात, मेसेज पाठवतात. 'कोरोना'च्या या संकटात काळजी घ्या असे सांगतात. यापूर्वी त्यांनी काम केलेल्या विविध खात्यातील अनेक कर्मचाऱ्यांना त्यांनी फोन केले आहेत. मेसेजही केले आहेत.
एरवी, IAS अधिकाऱ्याची बदली झाली की, ते जुन्या कनिष्ठ सहकाऱ्यांची शक्यतो आठवण काढतच नाहीत. काळजी करणे तर दुरचीच गोष्ट. पण म्हैसकर मात्र वेगळ्या स्वभावाच्या अधिकारी आहेत. त्या माणूसपण जपणाऱ्या IAS अधिकारी आहेत, अशी भावना सूत्रांनी 'लय भारी'शी बोलताना व्यक्त केली.