काळ देखोनि वर्तावे...

जनदूत टिम    21-May-2020
Total Views |
रोगग्रस्त आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे स्वयंरोजगार करणाऱ्यांपासून ते बड्या कंपन्यांपर्यंत सर्वांना उत्पन्नाची चिंता भेडसावू लागली आहे. जागतिक बाजारपेठेत एक प्रकारची मंदी आहे. देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्या आहेत, कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांची कपात होत आहे. असा एकंदर निराशाजनक सूर त्याच्या बोलण्यातून आढळत होता. ओघात त्याने मला विचारले, 'तुला नाही का काळजी वाटत तुझ्या व्यवसायाची किंवा एकंदर स्थितीची?' यावर मी त्याला उत्तर दिले, 'नाही.
 
Lockdown_1  H x
 
मला दोन कारणांमुळे अजिबात काळजी वाटत नाही. पहिले म्हणजे तेजी-मंदी ही व्यवसायातील क्रमाने येणारी चक्रे आहेत. तेजीने हरळन जाऊ नये आणि मंदीमुळे घाबरुन जाऊ नये, खरा व्यावसायिक स्थिरचित्त असतो. मी अशा अडथळ्यांतून पूर्वीही सुखरुप पार पडलो आहे. पण त्याहीपेक्षा मी निर्धास्त असण्याचे दुसरे कारण म्हणजे माझा व्यवसाय समाजाची रोजची गरज भागवणारा आहे. माणसाला रोज भूक लागते. संकटाच्या काळात तो एकवेळ चैनीच्या वस्तूंकडे पाठ फिरवेल पण उपाशी राहू शकणार नाही. त्यातून उद्योजकाकडे चिकाटी, व्यवहारी वृत्ती व कल्पकता असेल तर तो कधीच अयशस्वी होत नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो.गेल्या शतकात म्हणजे सन १९२९च्या ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत शेअर बाजार कोसळले आणि मंदीच्या राक्षसी विळख्यात अनेक उत्तम कंपन्या भुईसपाट झाल्या. या संकटाचे परिणाम औद्योगिक क्षेत्राला पुढची दहा वर्षे भोगावे लागले. पण याही संकटात जे कल्पक उद्योजक होते त्यांनी चाकोरीबाहेर विचार करुन स्वतःच्या उद्योगांना मरु दिले नाही.
 
यापैकीच एक होता अमेरिकेतील बीअर उद्योग. तसे पाहता बीअर उत्पादकांपुढे दुहेरी संकट उभे राहिले होते. एक तर पाठीमागची सात-आठ वर्षे बीअर या प्रकारावर अनेक राज्यांत बंदी होती आणि मंदीच्या काळात नागरिकांकडे खायला पैसा नव्हता तर ते बीअर कुठून पिणार? यामुळे बीअरचा खप प्रचंड रोडावला होता आणि अनेक बीअर उत्पादकांनी व्यवसायच बंद केला होता. त्यातील काहीजण मात्र वारा येईल तशी पाठ फिरवण्याच्या सावध वृत्तीने वागणारे होते. त्यांनी बीअरचे उत्पादन किमान पातळीवर आणले व त्याचवेळी आपल्याकडील शिलकी पैसा दुग्धोत्पादन व शेतीकडे वळवला. अन्नधान्य, दूध, भाजीपाला या रोजच्या गरजा असल्यामुळे या उत्पादकांना ग्राहकांची कमतरता भासली नाही.
 
त्यांची गुंतवणूक निष्फळ ठरली नाही. काही वर्षांनी मंदीचा प्रभाव कमी होऊ लागला तेव्हा बीअरची मागणी पुन्हा एकदा वाढू लागली आणि या पेयावरची बंदीही उठली. दरम्यान ज्यांनी बीअर उत्पादन पूर्णपणे बंद केले होते ते त्या व्यवसायात परत येऊ शकले नाहीत आणि जे चिकाटीने टिकले त्यांना प्रचंड फायदा झाला. कोणत्याही स्थितीत व्यावसायिकाने घाबरुन आपला कष्टाने नावारुपाला आणलेला व्यवसाय बंद करायचा नसतो, हे या कहाणीतील तात्पर्य मंदीला यशस्वी तोंड देण्याचा जवळचा उपाय म्हणजे अन्य व्यवसाय क्षेत्रांकडे वळणे (डायव्हर्जन) हा होय, ही क्षेत्रे अशी निवडावी लागतात, की ज्यांची ग्राहकांना वारंवार गरज पडेल. उदाहरण द्यायचे झाले तर मंदीच्या काळात सर्वसामान्य व्यक्ती आलिशान खरेदीकडे म्हणजे कार, अलंकार, महागड्या मालमत्ता याकडे वळणार नाही पण तेच खाद्यपदार्थाचा व्यवसाय करणाऱ्याला ग्राहकांचा तुटवडा भासणार नाही. भूक ही रोज लागते आणि चैन ही कधी तरी करायची असते, या तत्त्वानुसार ग्राहक आपल्या उपयोगाच्या वस्तूंची खरेदी कधीच थांबवत नाही. ज्या कंपन्या ही वाऱ्याची बदलती दिशा ओळखतात ती आपली उत्पादनेही लोकांच्या गरजेनुरुप बदलतात. मंदी ही कल्पकतेला वाव देणारी खूप मोठी संधी ठरु शकते. ग्राहकांना कशाची गरज आहे हे ओळखून तशी उत्पादने बाजारात आणणे हीसुद्धा कल्पकताच आहे. त्यातून प्रत्येकवेळी अभिनव उत्पादने शोधून काढावीत असे नव्हे. एखादे चांगले चालणारे उत्पादन सुधारित स्वरुपात व अधिक सुविधांसह सादर केल्यास त्यालाही भरघोस प्रतिसाद मिळू शकतो.
 
जागतिक मंदीपाठोपाठ आलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतातील एका नांगर उत्पादक कंपनीपुढे असाच प्रश्न उभा राहिला होता. शेतकऱ्यांना नांगराची किंमत परवडत नसल्याने कंपनीने नांगर बनवणे कमी केले होते, परंतु त्यांच्याकडे लोखंडाचा मोठा साठा शिल्लक होता. त्याचे काय करायचे हा प्रश्न होता. अशावेळी या कंपनीने त्या लोखंडापासून घरात वापरायच्या खाटा बनवून किफायतशीर किंमतीत विकणे सुरू केले. लोकांना त्या खाटांचा दर्जा आवडल्याने त्यांनी या उत्पादनाला प्रतिसाद दिला. ही कंपनीही मंदीला तोंड देऊन उत्तरोत्तर अधिक वाढत गेली. कोविड संसर्गापश्चात जग पूर्वीसारखे राहणार नाही हे निश्चित. मानसिकतेपासून ते जीवनशैलीपर्यंत आमूलाग्र बदल घडणार आहेत. समाज स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेचा जागरुकतेने विचार करायला लागणार आहे. माझ्या व्यवसायापुरते बोलायचे झाले तर पुढच्या काळात समाजाचा ओढा रसायनमुक्त, भेसळमुक्त व नैसर्गिक उत्पादनांकडे वळेल, याची चाहूल मला लागली आहे. मी ग्राहकांना अधिकाधिक शुद्ध, स्वच्छ व सेंद्रीय उत्पादने देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. म्हणूनच मी नवउद्योजकांना आग्रहाने सांगतो, की तुम्ही कुठल्याही उद्योगक्षेत्रात असा, तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. रिसेशन, डिप्रेशन, स्लॅक अशा शब्दांनी विनाकारण घाबरुन जाऊ नका. असल्या निराशावादी चर्चाही इतरांशी करु नका. त्याजागी आपल्या उत्पादनात अधिकाधिक सुधारणा कशा करता येतील, त्याची किंमत आणखी कमी कशी करता येईल व ग्राहकोपयोगी विविध उत्पादने कशी बनवता येतील याचा विचार करा. 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' म्हणीप्रमाणे भीतीच आपल्याला व्यवसायातून पाय मागे घ्यायला लावते.