बेस्ट बसमधून दारुची वाहतूक

जनदूत टिम    18-May-2020
Total Views |
मुंबई : लॉकडाऊमुळ दारुची दुकानं बंद असल्यामुळे दारुच्या छुप्या पद्धतीने दारु आणण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लढवल्या जात आहेत. कधी अत्यावश्यक सेवेच्या वाहनातून तर कधी अॅम्बुलन्समधून दारूची वाहतूक केली जात आहे. आता तर थेट बेस्ट बसमधून दारुची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पूर्वेला मुंबईच्या बेस्ट बसमधून ३० हजार रुपयांची देशी विदेशी दारु पकडली आहे. एका आठवड्यात ही दुसरी घटना आहे.
 
Best Bus_1  H x
 
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलिसांनी बेस्ट बस क्रमांक एमएच ०३ सीव्ही ६०३८ वर काल रात्री ८ वाजेच्या दरम्यान छापा मारला. यावेळी बस ड्रायव्हरच्या केबिनमध्ये आणि बसच्या शेवटच्या सीट खाली दारु आढळून आली आहे. देशी विदेशी दारुच्या एकूण ३२७ बाटल्या आढळून आल्या. याची किंमत ३० हजार ५५० एवढी आहे. तर बसची किंमत पकडून १२ लाख ३० हजार ५५० रुपये एवढा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
 
बेस्ट बसचा चालक निजाम होडकर याच्यावर कलम १८८ सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ ई, ८१, ८२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई केली आहे. मुंबई परिसरात सध्या दारु विक्रीला मनाई आहे. त्यामुळे मुंबईतील काही टोळी आपल्या माणसांकरवी वसई-विरार परिसरातील दुकानांतून दारु विकत घेवून ती मुंबईत तिप्पट दराने विकत असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसापूर्वी एका रुग्णवाहिकेमधून विदेशी दारु पोलिसांनी पकडली होती. अत्यावश्यक वाहनामधून अवैद्यरित्या दारुची तस्करी होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.