चुकीच्या आकलनाने निसर्गाला धक्का

जनदूत टिम    11-May-2020
Total Views |
स्वयंचलित यंत्र, वीजनिर्मिती, सिमेंट, मोटार, इतर वाहनं, टीव्ही इत्यादी औद्योगिक युगातल्या बाबी त्यांचं निर्माण, वापर आणि विल्हेवाटीत पृथ्वीच्या धारणेचा विनाश करतात. परंतु याच भौतिकतेवर आणि उपभोगवादावर अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था उभी केली गेली आहे. ती शाश्वत होणं कधीच शक्य नव्हतं. गौतम बुद्ध म्हणतात, दुःखाचं मूळ तृषा, इच्छा आहे.
 
Corona012_1  H
 
भारतीय तत्त्वज्ञान इच्छांपासून मुक्तीला स्वातंत्र्य मानतं. मात्र अर्थव्यवस्था सतत फंकर घालन इच्छांचे निखारे पेटते ठेवते. त्याचं आता महाप्रचंड वणव्यात रूपांतर झालं आहे. तो जीवन बेचिराख करत आहे. आता या अर्थव्यवस्थेच्या काही समर्थकांनी अशी कल्पना मांडली आहे की, कोरोनाचा प्रसार होऊ द्यावा. मग आपोआप तरुणांमधे 'कळप प्रतिकारशक्ती' (हार्ड इम्युनिटी) निर्माण होईल
 
आणि कोरोनाला अटकाव होईल. अशा कल्पनेच्या भरीस पडल्याने ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली. ब्रिटनचं राजघराणं आणि पंतप्रधानांनाही कोरोनाची बाधा झाली. तिथे कळप प्रतिकारशक्ती विकसित झाली नाही. इटलीची वैद्यकीय व्यवस्था जगात सर्वोत्तम मानली जात होती. पण तिथे व जर्मनी, स्पेनमध्ये ती रुग्णांच्या संख्येमुळे कोसळली आहे कारण उपभोगवादी अर्थव्यवस्थेची नशा डोक्यात गेली होती. त्यांनी कोरोनाचं भय वाढत असतानाच पहिला महिना कोणताही निबंध पाळला नाही. अर्थसमर्थक म्हणतात, कळप प्रतिकारशक्तीचा प्रयोग तिथे झाला. तो पूर्ण अयशस्वी ठरला याची सर्वांनी गंभीर दखल घ्यावी.
 
काही देशांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी आहे. त्याची कारणं उलट आहेत. त्यांनी अर्थव्यवस्थेच्या कचाट्यात सापडणं टाळलं. त्यांनी अनेक वर्ष आधीच औद्योगिकीकरण आणि त्याच्या प्रदूषणाला आळा घातला होता. त्यांचे श्वसनमार्ग आणि फुफ्फुसं निरोगी होती. ते मोटारींना विरोध करून सायकल वापरत होते, त्यांनी परदेशातून येणाऱ्यांवर कडक निर्बंध घातले. त्यांच्या, विशिष्ट विमानतळांवर उतरवून तपासण्या केल्या आणि रुग्णांना वेगळं केलं. त्यामुळे तिथे कोरोनाचा प्रसार होऊ शकला नाही. तुकर्मनिस्तानने दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रीय स्वरूपाची सायकल शर्यत घेतली. सारा देश त्यात सामील झाला. त्यांचा प्रवक्ता म्हणाला, कोरोनाचा प्रसार होत आहे हे समजल्याबरोबर आम्ही बाहेरील देशांमधून येणाऱ्या सर्वांना वस्तीपासून दूर असलेल्या एकाच विमानतळावर उतरवत गेलो. तिथे त्यांची कोरोना चाचणी केली आणि रुग्णांना वेगळं ठेवून उपचार केले. शिवाय तो देश सायकल शर्यत घेतो, मोटार किंवा बाईक शर्यत नाही. यात त्यांची पर्यावरणाची जाण दिसते. ही सर्वात गंभीर बाब आहे; जिची दखल सर्व मानवजातीने घेण्याची गरज आहे. दुर्दैवाने ती या अर्थसमर्थकांच्या चुकीच्या विचारांच्या अमानवी बैठकीत आहे. ते म्हणतात, विषाणूला पसरू देणं हे लॉकडाऊनपेक्षा कमी महाग आहे. या हीन विचारातून चंगळवादी अर्थव्यवस्था समर्थकांची हिंसक, क्रर आणि जीवनविरोधी वृत्ती, बधीरपणा व पृथ्वीबाबत, निसर्गाबाबत अज्ञान व वैर स्पष्ट होतं. प्रत्येक गोष्ट पैशात तोलणं ही या तज्ज्ञ म्हणवणाऱ्यांची खासियत आहे. जगात १७५६ मध्ये प्रथम जेम्स वॅटचं वाफेवर चालणारं इंजिन हे स्वयंचलित यंत्र आलं. यामुळे उत्पादन पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. परंतु याला 'क्रांती' म्हणण्यात चूक झाली.
 
क्रांतीला होकारात्मक प्रगतीचं अंग आहे असं गृहीत धरलं जातं आणि इथे या यंत्राबाबतच्या आकलनात भयंकर चूक झाली. जी टॉलस्टॉय, रस्कीन बाँड, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद आणि गांधीजींसारख्या द्रष्ट्यांनी दाखवली. तरीही मानवजात सुख, सोय, आराम आणि प्रतिष्ठेच्या मायाजालात अडकली. जेम्स वॅट, त्यानंतर याच उत्पादनबदलावर आधारित आजच्या अर्थशास्त्राचा जनक अॅडम स्मिथ, त्यानंतर शंभर वर्षांनी तंत्रज्ञानाचे अनेक शोध लावणारे म्हणून औद्यौगिकीकरण शहरीकरणाला प्रचंड गती देणारे आणि त्यातून विनाशाला पृथ्वीव्यापी परिमाण देणारे एडिसनसारखे तंत्रज्ञ आणि विसाव्या शतकात आलेली तंत्र-अर्थाची लाट यात मानवजात वाहून गेली. यालाच ती प्रगती आणि विकास मानू लागली. वॅट, अॅडम स्मिथ वा एडिसन इत्यादींना आपण जे काही करत, सांगत आहोत त्याचे किती भयंकर परिणाम होतील याची जाणीव नव्हती. यातून तांत्रिक आणि आर्थिक कृत्रिम जगाचा प्रभाव आणि पसारा एवढा वाढला की लोक त्यालाच खरं जग मानू लागले आणि पृथ्वीच्या खऱ्या जगाचं त्यांचं भान लोपलं. आर्थिक सुबत्तेमागे धावणाऱ्यांनी लॉकडाऊन महाग असल्याचा जावईशोध लावला आहे. यांच्या लेखी, अर्थव्यवस्था ही अस्तित्वापेक्षा महत्त्वाची आणि जपण्याची गोष्ट आहे. यामुळे युद्ध, दहशतवादी हल्ला, अपघात, भूकंप, रोगराई किंवा कोणतीही मानवनिर्मित अथवा नैसर्गिक दुर्घटना यांना अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी पर्वणी वाटते. ही माणसांना स्वतःच्या जीविताविरुद्ध उभी करणारी विकृती आहे. आपल्याकडे या वृत्तीचा अनुभव सात वर्षांपूर्वी आला.
 
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे व्यथित होऊन सर्वोच्च न्यायालय म्हणालं की, गोदामांमध्ये खूप धान्यसाठा आहे. शेतकऱ्यांना आणि अन्नाअभावी मरणाऱ्या गरीबांना धान्य फुकट द्यावं. ताबडतोब अर्थव्यवस्था समर्थक सरसावले. तत्कालीन अर्थमंत्री चिदंबरम म्हणाले, अशाने अर्थव्यवस्था धोक्यात येईल. अर्थव्यवस्थेच्या समर्थकांनी हाकाटी केली की ते गरीब भुकेले आहेत, कारण - त्यांच्याकडे क्रयशक्ती नाही. म्हणजे - क्रयशक्ती आणण्यासाठी आम्हाला अधिक भौतिक विकास करू द्या.
 
वस्तुतः औद्योगिकीकरण आणि विकासाने उद्ध्वस्त करण्याआधी निसर्ग शाबूत होता आणि तो मुंगी किंवा हत्तीलाही उपाशी मरू देत नव्हता. जनतेनं हे लक्षात घ्यावं की शेतकरी, गरीब जात्यात होते तेव्हा इतर सुपात होते. आता तुम्ही सर्व शहरीही जात्यात आहात आणि तुम्हाला मरू देण्यास अर्थव्यवस्था सरसावली आहे. औद्योगिकीकरण म्हणजे प्रगती ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे, हे इथे नमूद करायला हवं. जीवन अमूल्य आहे. लॉकडाऊन हाच उपाय आहे. पृथ्वी जीवन देण्यासाठी आहे. तिला उद्ध्वस्त करणाऱ्या उद्योगासाठी, त्यात नोकरी देण्यासाठी नाही. तो पृथ्वीचा अपमान, अनादर आहे. तिला उद्ध्वस्त करणाऱ्या उद्योगासाठी, त्यात नोकरी देण्यासाठी नाही. तो पृथ्वीचा अपमान, अनादर आहे. आपण पृथ्वी आणि निसर्गामुळे जीवन अनुभवतो. औद्योगिक युगातली नोकरी ही, जीवनाला मुळीच आवश्यक नसलेली, किंबहुना जीवनाविरुद्ध जाणारी, कृत्रिम उत्पादनं खरेदी करून, अर्थव्यवस्था नावाचा भ्रम चालू ठेवण्यासाठी केलेली, यंत्रोत्तर कृत्रिम जगातली घातक व्यवस्था आहे. औद्योगिक कृत्रिम जगानेच कोरोना आणला. मग ते जैविक विविधता व पृथ्वीची दुर्गम डोंगर, जंगल इत्यादी अस्पर्श जडणघडण नष्ट करणं असो की जैविक अस्त्रासाठी जनुकीय प्रयोग करणं असो. मानवाला आताही निसर्ग वाचवतोय पण जनतेला त्याची माहिती नाही.