महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीचे सावट

जनदूत टिम    01-May-2020
Total Views |
मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे असतात,संधीसाधू तर पावलोपावली आढळतात, परंतू कोरोना सारख्या महामारीच्या संकटात सत्तेचे राजकारण करणारे महाराष्ट्रात प्रथमच दिसत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाविरूद्धच्या युद्धात सर्वस्वपणाला लावून लढत आहेत.अपुरी साधन सामुग्री असूनही तेङ धिरोदात्तपणे महाराष्ट्राचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी झटत आहेत. त्याच वेळी त्यांचे पंख छाटण्याचे,त्यांना चारिमुंड्या चित्त करून राजकीय कुरघोडी कशी करता येईल,यासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस व त्यांचे सहकारी करीत आहेत.
 
rashtrpatirajvat_1 &
 
राज्यपालांकडे त्यांच्या कोट्यातील स्वीकृत आमदारकी साठी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळाने ठराव देऊन 15-16 दिवस झाले तरी राज्यपालांनी आपला निर्णय अद्याप जाहिर केलेला नाही. दिल्लीश्वराच्या इशा-यावर ते वागत आहेत. त्यामुळे राज्यपालांकडून उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता धूसर वाटत आहे. किंबहुना ते अशक्यच आहे. कोरोना संकटाची संधी साधून महाराष्ट्र व पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपयशी ठरवून महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादण्याचा केंद्र शासनाचा इरादा स्पष्ट दिसत आहे.
 
एकदा महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादली की, केंद्र शासन महाराष्ट्रावर अनभिषिक्तपणे हुकमत गाजवू शकेल. भाजपाचे सत्ता संपादनाचे स्वप्न भंग पावले याचे अतिव दुःख सर्वात जास्त माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यांना आहेच तितकेच महाराष्ट्रासारखे राज्य जिथे मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, तेथील हातातोंडाशी आलेली सत्ता शिवसेनेमुळे गेली याचा केंद्राला खेद आहे, या निमित्ताने शिवसेनेवर सूड ऊगवण्याची व शिवसेनेस सत्ताच्युत करण्याची संधी केंद्र शासन गमावणार नाही ,असा राजकीय तज्ज्ञांचा कयास आहे.
 
कोरोना नियंत्रणात अपयश आले असे भासवून महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लादणे केंद्र शासनाच्या सोयीचे ठरणार आहे. पहिली बाब म्हणजे महाराष्ट्र शासनात सहा महिने केंद्राचे नियंत्रण राहिल,या काळात शिवसेना, राष्ट्रवादी व काॅन्ग्रेस हे भाजपा विरोधक सत्तेपासून दूर राहतील.या काळात मध्यप्रदेशा प्रमाणे आमदार फोडून भाजपाला महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा दावा करता येईल.
 
राज्यपालांच्या अखत्यारितील सध्याच्या दोन रिक्त जागी आपल्या मर्जीतले आमदार नेमता येतील. या शिवाय आमदारांच्या मतदानाने जे १२ आमदार नियुक्त करायचे आहेत ते मनमानी पद्धतीने करता येतील.आजच्या घडीस शिवसेना-५, राष्ट्रवादी-४ व काॅन्ग्रेस-३ आमदार निवडून आल्यास सत्ताधारी आघाडीस विधानपरिषदेत बहुमत मिळेल, हे बहुमत आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाला राष्ट्रपती राजवट आणणे हाच शाॅर्टकटचा मार्ग सोईस्कर वाटतो.सध्या भाजपा नेते व त्यांचे सायबर सेल या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणविस यांचा उल्लेख "परमनंट मुख्यमंत्री" असा केला जात आहे. प्रत्येक बारिक सारिक घटनेचे खापर राज्य शासन व प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्यावर सर्रास फोडले जात आहे.मग ते बांद्राच्या गर्दीचे असो, करोना रूग्ण वाढ असो, पालघर प्रकरण असो की, लाॅकडाऊनची लोकांकडून होणारी पायमल्ली असो.काहीही करून महाराष्ट्र राज्य सरकार बदनाम करायचे व राष्ट्रपती राजवट लादण्या सदृश्य परिस्थिती निर्माण करणे,हाच एकमेव उद्देश भाजपाच्या सायबर सेलचा आहे.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत यशस्वीपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळत हेत.समंजसपणा,मृदु भाषा,आपुलकी व राज्याची काळजी त्यांच्या प्रत्येक वाक्यात व कृतीतून जाणवत आहे. महाराष्ट्रातील जनतेत ते कमालीचे लोकप्रिय झाले आहेत. नेमके हेच यश भाजपाला खुपत आहे. त्यांच्या दृष्टीने हे अनपेक्षित आहे. केंदाचे असहकार्य, मदतीबाबत दुजाभाव असूनही उद्धव ठाकरे यशस्वी होणे, ही भाजपास धोक्याची घंटा वाटत आहे. त्यामुळे अनेक अनाजीपंत त्यांना पाण्यात पाहत आहेत. कारण इतक्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्धव ठाकरे सुखरूप बाहेर पडले तर त्यांच्या यशाचा उधळलेला वारू भाजपास कधीच रोखता येणार नाही, याची भाजपा श्रेष्ठींना खात्री वाटते. म्हणून राष्ट्रपती राजवट ही त्यांना सुवर्ण संधी वाटते,आणि त्यादृष्टीने त्यांची व्यूहरचना आखली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी बेसावध न राहता या चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा मार्ग तातडीने शोधला पाहिजे. एकमात्र नक्की. जर का भाजपाने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लादण्याचे दुःसाहस केले तर भविष्यात भाजपाला त्याची जबर किंमत मोजावी लागेल.