फुले,आंबेडकर जयंती दिनी घरातच ज्ञानाचा दिवा लावा:- रघुनाथ ढोक

जनदूत टिम    07-Apr-2020
Total Views |
सोलापूर : राज्यात व देशात कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतच चालली असुन काहीजण मृत्युमुखी पडत आहेत.यावर नियंत्रण आणण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे.
 
Jyotiba_1  H x
 
या काळात केंद्र व राज्यसरकार वारंवार सुचना देत असुन ही जनता त्याचे उल्लंघन करून नाहक रस्त्यावर भटकणे,वाहनावर फिरणं, सामुदायिक नमाज ,सकाळी सकाळी एकत्र येऊन व्यायाम करणे,मंदिरात जाणे या गोष्टी करताना सापडत आहेत.नुकतेच तबलिग मरकज मुळे,त्याच प्रमाणे या विज्ञान युगात थाळीनाद,आणि आता दिवे लावणे या मुळे काय काय घडले हे देखील पहातो आहे.या विज्ञान युगात लॉकडाऊन वेळी शासनाच्या योग्य सूचना पालन करून सरकार ला सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे. या नाहक गोष्टीचा पोलीस व प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. खरे तर माणूस माणसाला उपयोगी पडतोय दुसरे कोणीही नाही हे पहात असताना निदान आपण घरात बसुन मानवता धर्म पाळण्याचे कार्य करायला हवे आहे.तरच हा कोरोना आटोक्यात येईल. काही दिवसांनी म्हणजे 11 एप्रिल ला थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले जयंती आणि 14 एप्रिल ला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे .
 
ज्या प्रमाणे गर्दी टाळण्यासाठी अनेक यात्रा,जत्रा,सामुदायिक विविध कार्यक्रम रद्द केले त्याच प्रमाणे अजुनही 14 एप्रिल पर्यंत कोणत्याही प्रकारे गर्दी करून कोरोनाला पोषक वातावरण निर्माण होऊ नये,यासाठी यंदा फुले आंबेडकर यांची जयंती फक्त आपल्या कुटुंबात म्हणजे घरातच ज्ञानाचा दिवा लावून म्हणजे शिव,फुले, शाहू, आंबेडकर इत्यादी महापुरुषांचे ग्रंथ ,भारतीय संविधान वाचून साजरे करावेत असे आवाहन फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांनी केले आहे.
 
पुढे ते असे ही म्हणाले की विविध पक्षाचे कार्यकर्ते,सार्वजनिक मंडळे,संस्था,संघटना यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन पुर्ण समाप्त होईपर्यंत अथवा केंद्र व राज्य सरकारचे पुढील आदेश येत नाहीत तो पर्यंत पुतळ्याशेजारी जमा होऊ नये,मिरवणूका काढू नयेत,रस्त्यावर गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम करू नयेत याची योग्य दक्षता घ्यावी. तसेच सोशल मीडिया द्वारे सारखे सारखे सर्व समाजबांधवाना घरातच रहानेचे आव्हाने करावीत. पुढे रघुनाथ ढोक असे देखील म्हणाले की आपला देश भारतीय संविधान वर पुर्णपणे चालतो पण 70 ते 80 टक्के लोकांनी अजूनही भारतीय संविधान वाचलेले नाही तर सर्वांनी घरातच जास्तीत जास्त वेळ बसुन 11 ते 14 एप्रिल दरम्यान पुर्ण भारतीय संविधानाचे वाचन करून ज्ञान अवगत करावे ही विनंती केली.