हरित पर्यावरणासाठी चिमण्यांचे रक्षण गरजेचे

जनदूत टिम    06-Apr-2020
Total Views |
उंच इमारतींच्या छतांवर, आपल्या घराच्या गॅलरीत किंवा अगदी कुठेही चिमणी नेहमीच आढळून येते. लहान मुलांच्या भावविश्वात जितके स्थान चंद्राला असते, तितकेच ते चिमणीलाही असते. त्यामुळे, प्रत्येकाच्या मनात चिमणीविषयी कुठे ना कुठे जिव्हाळा असतो. काही वर्षांपूर्वी चिमण्यांची संख्या कमी झाल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त करण्यात आली. त्यातूनच २०१० पासून जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
 
sparrow_1  H x
 
ही संख्या वाढावी म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणारे कार्यक्रमही राबविण्यात आले. त्या सर्वांचा उपक्रमांचा नेमका काही लाभ झाला का तसेच चिमण्यांच्या संख्येत काही सकारात्मक फरक पडला का हे तपासून बघितले जात आहे. त्यासाठी देशभरात नागरिकांच्या मदतीने चिमण्यांची संख्या मोजण्यात येत आहे. देशात अनेक ठिकाणी त्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून चिमण्यांवर काम सुरू असून लाखो लोक त्यात सहभागी झाले आहेत. मधल्या काही वर्षांच्या तुलनेत आता चिमण्यांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात येते. मात्र, अद्याप तरी त्याला बळ देणारी आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. जागतिक चिमणी दिवस २० मार्च रोजी असल्याने त्याविषयी घेतलेला हा वेध…….
 
भारतात इतिहास काळापासून चिमणी आढळत असली तरी तिची संख्या मोजण्याचा कधी प्रयत्न झालेला नाही. गेल्या काही वर्षांच्या काळात आपल्या घरात, अंगणात दाणे टिपणारी चिमणी अचानक जी र्भुर्रकन उडून गेली, ती परतलेली नाही. त्याला हवामानातील बदल, मोबाइल टॉवरची प्रारणे अशी एक ना अनेक कारणे सांगितली जातात. २०१० पासून ५० देशांत जागतिक चिमणीदिन साजरा केला जातो. शहरी भागात चिमण्यांची संख्या कमी झाल्याने नाशिकच्या नेचर फॉरएव्हर सोसायटी या संस्थेने याविषयी बरेच काम केले आहे. लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. जगभरातील चिमणीप्रेमींना विविध भागांत एकत्र जमवून चिमण्यांना परत आणण्यासाठी व जैवविविधता टिकविण्यासाठी काम करता येईल. जगभरातूनच चिमण्या नष्ट होण्याचा वेग अतिशय झपाट्याने वाढत आहे. द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या लाल यादीत सामान्य घरात आढळणार्‍या चिमणीची नोंद अत्यंत संकटग्रस्त प्रजातींमध्ये केली आहे. त्यांच्या संवर्धनासाठी जगभरातूनच पावले उचलली गेली नाहीत, तर पुढील पिढीला हा चिवचिवाट फक्त युट्युबवरच पहावयास मिळेल, असा इशारा चिमण्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्यांकडून सांगितला जात आहे. अत्यंत संकटग्रस्त प्रजातींमध्ये झालेली चिमण्यांची नोंद बघून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी चिमणीला दिल्लीचा राज्यपक्षी म्हणून घोषित केले होते. २०१० मध्ये नाशिकच्या नेचर फॉरेव्हर सोसायटीने काही संस्थांच्या सहकार्याने २० मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. त्याला जगभरातून या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यात त्यांना फ्रान्सच्या इको सिस अ‍ॅक्शन फाउंडेशन, युकेच्या एवॉन वाईल्ड लाईफ ट्रस्ट, युएसएच्या कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथॉलॉजी तसेच काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी सहकार्य केले.
 
चिमण्या खरोखरच गायब झाल्या आहेत, त्याचे भान नागरिकांना यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे चिमणीसाठी पाणी आणि दाणे अधिकांश घरी ठेवले जात आहे. मात्र, एवढ्यावर भागणार नाही. चिमण्या नष्ट होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे पक्षी तज्ज्ञ सांगतात. गत काळात नाशिकच्या मनपाने चिमण्यांच्या संवर्धनासाठी एक अतिशय स्तुत्य निर्णय घेतला होता. घर बांधणीची परवानगी देतांना चिमण्यांना घरटे करण्यासाठी बाहेरुन छिद्र ठेवणे बंधनकारक केले. असाच निर्णय इतर शहरांनी घेतल्यास कदाचित चिमण्यांना जीवदान मिळेल. अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे नेहमी दिसणाऱ्या गोष्टींचे खरे महत्त्व जाणवत नाही. असा त्याचा साधारण अर्थ आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या चिमण्यांची संख्या कमी होणे हे त्याचे एक उदाहरण देता येईल. वाढत्या प्रदुषणामुळेच चिमण्यांची संख्या कमी झाली, हे खरेतर विनाशाचेच प्रतीक मानले जात आहे. जगभरातील लोककथा आणि चिऊताई… चिऊताई… दार उघड सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिवचिव करणारी चिमणी गेली कुठे? असा प्रश्न जगभरातील पर्यावरणप्रेमींना पडू लागला. कारखान्यातल्या चिमणीचे निघणारे धूर ओकणे प्रमाणाबाहेर वाढले अन् अंगणातली चिमणी दिसेनाशी झाली. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली.
 
नाशिकच्या नेचर फॉरएव्हर सोसायटी आणि फ्रान्समधील इकोसिस अ‍ॅक्शन फाउंडेशन या संस्थांनी- इतरही असंख्य स्वयंसेवी संस्थांबरोबरच या बाबीचा विस्तृत अभ्यास केला. चिमण्यांची घटती संख्या हे वातावरणातील वाढत्या प्रदुषणाचे लक्षण आहे की काय, हे शोधण्यासाठी जगभर चळवळ उभारली होती. हाऊस स्पॅरोज हा माणसाच्या अगदी जवळ राहणारा पक्षी. गेल्या वीस ते तीस वर्षांच्या कालावधीमध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये तो १० ते २० टक्के इतकाच आढळत आहे. चिमण्या गायब होण्यासंदर्भात अनेक अंदाज वर्तविण्यात आले. त्यासाठी वाढते मोबाइल टॉवर आणि डिश अँटेनांचे कारणही कारणीभूत ठरविण्यात आले. मात्र, चिमण्या कमी होण्यास शहरांमध्ये कमी होत असलेले मातीचे प्रमाणही कारणीभूत असल्याची माहिती समोर आली. दुर्मीळ आणि लुप्त होत जाणाऱ्या प्रजातीची नोंद घेणार्‍या इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या लाल यादीत अत्यंत धोकादायक श्रेणीत चिमण्यांची नोंद झाली आहे. मोबाइल टॉवर्समधून निघणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन प्रामुख्याने त्यासाठी कारणीभूत ठरले आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास चिमण्या पूर्णपणे नाहीशा होण्याचा धोका या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
 
शास्त्रज्ञांच्या मते, अँड्राईड, आयफोन्स, ब्लॅकबेरी यासारख्या अत्याधुनिक फोनमधून निघणारी किरणे नैसर्गिक जगतावर परिणाम करीत आहेत. चिमण्या किंवा मधमाशांचे नष्ट होणे ही एक सुरुवात आहे. सर्वाधिक मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. त्यामुळे भारतात मोबाईल टॉवर्सची संख्याही वाढली आहे. पर्यावरण रक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या चिमणीला विद्युत चुंबकीय उत्सर्जनाबरोबरच हवामान बदल आणि प्रदूषण याचाही धोका वाढला आहे.
 
आययूसीएनच्या लाल यादीत प्रथमच चिमणीची नोंद झाली असली तरीही इतर पक्ष्यांप्रमाणे चिमण्यांच्या या स्थितीवर फारसे संशोधन झालेले नाही. गुवाहाटीत चिमण्यांवर दोन संशोधने, नेचर्स डिकॉनचे हिरेन दत्ता यांचे संशोधन, निसर्ग अभ्यासक सारिका हिचे स्वतंत्र संशोधन वगळता संशोधने नाहीत. २०१० मध्ये अ पॉसिबल इम्पॅक्ट ऑफ कम्युनिकेशन टॉवर्स ऑन वाइल्ड लाइफ अँड बीज हे संशोधन प्रसिद्ध झाले. सतत एक तास चिमण्यांच्या अंड्यावर विद्युत चुंबकीय उत्सर्जनाचा मारा केल्यानंतर अंड्यातील गर्भ नष्ट झाला. किरणांमुळे चिमण्याच्या सुसंवादावर परिणाम होऊन त्या उग्र झाल्या. त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाल्याचे संशोधनात तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी रेडिएशन टॉवर्स या नव्या मानकानुसार एक किलोमीटर अंतराच्या आत नव्या टॉवर्सला मनाई आहे. हा कायदा मोडल्यास पाच लाखाच्या दंडाचीही तरतूद आहे. मात्र, तरीही चिमण्यांसोबतच इतरही पक्ष्यांना धोका आजही कायम आहे. चिमण्या नष्ट झाल्या असून ज्या थोड्या शिल्लक आहेत, त्यांना वाचविण्याची गरज आहे. आपण आरोग्यदायी आणि हरित पर्यावरणासाठी चिमण्यांचे रक्षण करणे गरजेचे आहेे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने चिमणी वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, हेही तितकेच खरे.