दिव्यात रुग्णालयाची प्रतीक्षा

सुचित शिंदे    04-Apr-2020
Total Views |

* चार लाख दिवावासीयांसाठी वैद्यकीय सेवा पुरवण्याची मागणी

दिवा : ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिवा परिसर आरोग्यसेवांपासून गेली अनेक वर्षांपासून वंचित असून प्रत्येक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे या परिसरावर मोठा आघात होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. दिव्यातील लोकसंख्या चार लाखांहून अधिक वाढली असली तरी महापालिकेचे आरोग्य केंद्र या भागात सेवा देऊ शकलेले नाही. त्यामुळे करोनाच्या तोंडावर येथील नागरिकांमध्ये असंतोष उफाळला असून आरोग्य व्यवस्थेची प्रतीक्षा सुरू झाली आहे.
 
कपअं_1  H x W:
 
'करोना'च्या प्रतिबंधासाठी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या मार्गांनी व्यापक उपाययोजना सुरू आहेत. ठाणे महापालिकेकडूनही शहरामध्ये अनेक वैद्यकीय सुविधांची उपलब्धता करून दिली जात आहे. आजारी नागरिकांच्या उपचारांसाठी व्यापक प्रयत्न होत असले तरी दिवा परिसरात फारशा सुविधा अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी अद्याप या भागातील दवाखाने खुले केले नसून रुग्णवाहिका आणि अन्य वैद्यकीय सेवा तुटपुंज्या आहेत. महापालिकेकडून फवारणी होत असली तरी वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयाची सेवा मात्र अद्याप सुरू झालेली नाही. या भागात किमान तात्पुरते, तात्काळ सेवा देणारे रुग्णालय उभारणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे किमान २५ ते ३० खाटांचे तात्पुरते रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या धुरामुळे गुदमरण्याच्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या दिव्यातील नागरिकांचे आरोग्य नेहमीच धोक्यात असते. पावसाळ्यामध्ये पाणी तुंबल्यानंतर येथे आलेल्या साथीच्या आजारांनी अनेक रहिवाशांचे मृत्यू झाले होते. त्यावेळीही आरोग्य शिबिरांशिवाय प्रशासनाकडून फारशी मदत झाली नव्हती. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव झाल्यास दिव्यात भीषण परिस्थिती उद्भवण्याचा धोका रहिवाशांकडून केला जात आहे.
तात्पुरते रुग्णालय हवे
दिवा शहराच्या सध्याच्या वैद्यकीय मदतीचा आढावा घेतल्यास परिसरात अद्याप एकही करोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. परंतु त्याचवेळी या शहराच्या आसपासच्या अन्य शहरांमध्ये करोनाची संख्या वाढत आहे. डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि नवी मुंबई शहरामध्येही करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या भागामध्ये प्रशासन सक्रियपणे काम करत आहे. रुग्णालयांची व्यवस्था, विलगीकरण कक्ष आणि तात्पुरती रुग्णालयेही उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु दिव्यात यापैकी कशाचीच व्यवस्था झालेली नाही. लोकप्रतिनिधींकडून केवळ औषध फवारणीच्या उपायाचा अवलंब केला जात आहे.
 
खासगी डॉक्टरही गायब
दिव्यातील डॉक्टरांसोबत बैठका घेऊन येथील दवाखाने सुरू करण्याचे अश्वासन लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दिले होते. परंतु अद्यापही दिव्यातील दवाखाने उघडलेले नसल्याने साध्या आजारांसाठी संचारबंदीच्या काळात दिव्यातून बाहेर जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देऊन तात्काळ व्यवस्था उभारण्यास पाठपुरावा करण्याची मागणी दिव्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आली आहे.