मोदी सरकारच्या लढ्याला जागतिक बँकेची साथ; दिला ७५०० कोटींचा निधी

जनदूत टिम    03-Apr-2020
Total Views |
नवी दिल्ली : जागतिक बँकेने करोनाविरुद्ध लढण्यासाठी भारतीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. यासाठी जागतिक बँकेने पुढाकार घेतला असून बँकेने भारताला आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. भारतामध्ये करोनाचा प्रसार वेगाने होत असून देशामधील करोनाच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र याचबरोबर देशातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज असल्याने जागतिक बँकेने करोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताला सात हजार ५०० कोटींचा (१०० कोटी डॉलर) आप्तकालीन निधी देण्यास मंजूरी दिली आहे.
 
modi_1  H x W:
 
‘जागतिक बँकेकडून मदतनिधी म्हणून देण्यात येणाऱ्या निधीपैकी पहिला टप्पा म्हणजे १.९ अरब डॉलरचा निधी देण्यास सुरुवात झाली आहे. हा निधी २५ देशांना देण्यात येणार आहे,’ असं जागतिक बँकेने म्हटलं आहे. या निधीपैकी सर्वाधिक निधी भारताला देण्यात आला आहे. “या निधीच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी भारत सरकारला तात्काळ उपाययोजना करता येतील. यामध्ये स्थानिक स्तरावर करोनाचा संसर्गाला आळा घालणे आणि इतर महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात महत्वाचे निर्णय घेता येतील. त्याचबरोबर देशातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करुन करोनाशी सामना करण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने सरकारला तयार राहता येईल. व्यक्तीमधून व्यक्तींना होणार संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना सरकारला करता येतील,” असं जागतिक बँकेने म्हटलं आहे.
 
भारतामधील आरोग्य यंत्रणा योग्य पद्धतीने या परिस्थितीचा समाना करावा यासाठी हा विशेष निधी देण्यात आला आहे. या निधीचा वापर करुन आरोग्य सेवा अधिक सक्षम करुन त्या माध्यमातून देशावर आलेल्या करोना संकटाशी सामना करणं शक्य होणार आहे. करोनासारखे साथीचे रोग देशामध्ये येत राहतील अशी शक्यता असल्याने तसेच भविष्यातील देशातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी भारताला आरोग्य क्षेत्रासंदर्भातील दिर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे.
 
जागतिक बँकेने भारताला सात हजार ५०० कोटींची मदत केली असून या निधीमधून करोनासंदर्भातील स्क्रीनिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (म्हणजे संर्सग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना शोधणे), प्रयोगशाळा उभारणे यासारखी कामे केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे मास्क आणि इतर आरोग्य विषयक गोष्टींची खरेदी करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. दक्षिण आशियामधील पाकिस्तानला २० कोटी डॉलर आणि अफगाणिस्तानला १० कोटी डॉलरची मदत जागतिक बँकेने जाहीर केली आहे.