कोरोना उपचाराची सज्जता: १६७७ त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे कार्यरत

जनदूत टिम    28-Apr-2020
Total Views |

- राज्यात पावणे दोन लाख आयसोलेशन खाटांची उपलब्धता - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या तीन वर्गवारीतील १६७७ उपचार केंद्र असून त्यामध्ये १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या आहे तर ७२४८ अतिदक्षता (आयसीयू) खाटांची उपलब्धता आहे. सुमारे तीन हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. ८० हजाराच्या आसपास पीपीई किटस तर २ लाख ८२ हजार एन ९५ मास्क उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कोरोना उपचाराची सज्जता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.
 
Rajesh Tope _1  
 
केंद्र शासनाच्या सूचनांनुसार कोरोनावरील उपचारासाठी तीन श्रेणींमध्ये रुग्णालयांची वर्गवारी केली आहे. श्रेणी- १ मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय, श्रेणी- २ मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय व निगा केंद्र तर श्रेणी ३ मध्ये कोविड रुग्ण निगा केंद्र यांचा समावेश होतो. या तीनही श्रेणीतील उपचार केंद्रामध्ये तापाचे रुग्ण तपासण्यासाठी फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत.
कोरोनाबाधीत गंभीर रुग्णांसांठी श्रेणी १ मध्ये उपचार सुविधा असून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी श्रेणी २ मध्ये तर ज्यांना लक्षणे नाहीत अशांसाठी श्रेणी ३ मध्ये उपचार केला जातो. राज्यात श्रेणी १ चे २४६ अधिकृत कोरोना रुग्णालये असून त्यामध्ये एकूण ३२ हजार ८६१ विलगीकरण खाटा आहेत त्यात अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश आहे.
 
श्रेणी २ मधील ५१७ अधिकृत कोरोना रुग्णालय व निगा केंद्र कार्यरत असून त्यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटा मिळून सुमारे ३१ हजार विलगीकरण खाटा आहेत. श्रेणी ३ मधील ९१४ कोरोना रुग्ण निगा केंद्र कार्यरत आहेत. त्यात १ लाख २० हजार ६११ विलगीकरण खाटा आहेत. अशाप्रकारे राज्यात एकूण १६७७ रुग्णालये तीनही श्रेणीतील असून त्यात १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटा आहेत. त्यामध्ये कोरोना संशयित रुग्णांसाठी ६२ हजार ६४० तर कोरोनाबाधीतांसाठी १ लाख १३ हजार ७०७ विलगीकरण खाटांचा समावेश आहे. या तीनही श्रेणीतील रुग्णालयांसाठी खाटांची, पीपीई, किट्स तसेच व्हेंटीलेटर्सची संख्या पुरेशी आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.