कोरोनाचे धडे

जनदूत टिम    27-Apr-2020
Total Views |
कोरोना हे मानवी जीवनावर आलेले एक महाअरिष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला जागतिक संकट म्हणून घोषित केले आहे. चीनमधून या जीवघेण्या विषाणूचा जगभर फैलाव झाला. एवढ्या झपाट्याने तो वाढेल, याची कुणालाही कल्पना नव्हती.
 
Corona-01_1  H  
 
त्यामुळे सरकारने सुरुवातीला 'जनता कफ्यूं, संचारबंदी, लॉकडाऊनसारखे निर्णय घेतले. त्यामुळे तो आटोक्यात येऊ शकला. कोरोना विषाणूमुळे समाजात आणि एकूणच मानवी जीवनात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शिक्षण, शेती, उद्योग, कृषी, पत्रकारिता, राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची प्रचंड हानी झाली. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. मंदिरे-देवालयांना टाळे लावावे लागले. सरकारचा प्रचंड महसूल बुडाला आणि विशेष म्हणजे त्यांचा याच्याशी फारसा संबंध नाही अशी गाव-खेडे आणि शेतकरी, शेतमजुरांवर उपासमारीची पाळी आली. विशेष म्हणजे हातावर पोट असणारे मजूर, ऊसतोड कामगारांना प्रचंड त्रास झाला. शहरात अधिकारी, प्रशासन, पुढारी, पोलीस, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून समाजाला चांगली मदत झाली. या संकटाला न घाबरता ही सर्व मंडळी आपणास घरी थांबण्याचे कळकळीचे आवाहन करून उपाशीतापाशी सेवा बजावत आहेत. समाजातील प्रतिष्ठित, श्रीमंत, दानशूर, सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते यांच्या वतीने गरजूंना आपापल्या परीने मदत करीत आहेत.
 
प्रत्येक जण आवश्यक वस्तु, औषधी खरेदीसाठी मास्क तोंडाला बांधून, सॅनिटायझरचा प्रभावी वापर होत आहे. स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटले आहे. प्रत्येक जण घरात बंदिस्त आहे. कुटुंबात रममाण होऊन बायका, मुलांना वेळ देत आहेत. घर कसं भरल्यासारखं वाटत आहे. गल्लीगल्लीत गंभीर वातावरण आहे. माणसं अंतर ठेवून वागत आहेत. इतरांनाही तसे सांगत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने काळजी घेत आहे. इतरांनाही सांगत आहेत. सरकार, मुख्यमंत्री, मंत्री, आरोग्यमंत्री प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, तर नागरिकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचावी, यासाठी पत्रकार हिंडून-फिरून ताज्या घटना-घडामोडींची माहिती देण्याचे काम सातत्याने करत आहेत. यामुळेच वयस्करांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांना या आजाराचे गांभीर्य लक्षात आले आहे. काही ठिकाणी रेड, ऑरेंज, ग्रीन झोन झाले आहेत. कॉलनी, गल्ली सील करण्यासारखे उपाय नागरिकांनी स्वतःहून केले. ग्रामीण भागात मात्र वेगळे चित्र आहे. सुरुवातीला ग्रामीण भागात आजाराचे गांभीर्य जाणवले नाही.
 
पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक आदी ठिकाणी नोकरी-व्यवसायानिमित्ताने गेलेला वर्ग, विद्यार्थी आपापल्या गावी गेल्यानंतर त्यांना आजाराचे गांभीर्य लक्षात आले. काही गावात रस्ते अडवले. असा प्रकार प्रत्येक गावाच्या इतिहासात पहिल्यांदा घडला. या कोरोनामुळे माणसामाणसात असे अंतर पडले. प्रत्येक माणूस दुसऱ्याकडे संशयाने पाहू लागला. संपर्क टाळू लागला. शहरी नागरिकांनाही गावाचे महत्त्व कोरोनानेच अधोरेखित करून दिले. एरवी कधीही गावाकडे न जाणारे गावाला सुरक्षित समजू लागले. शेतकरी वर्ग छोट्या-मोठ्या कामात व्यस्त आहे. पारावर, मंदिरात, शाळेच्या आसपास फिरकणारी मंडळी आपापल्या घरात बसून आहेत. हे चित्र सार्वत्रिक आहे. मरणाच्या अनाम भीतीने प्रत्येकाला एका शिस्तीत, सवयीत आणले. संयम शिकवला. किंबहुना मानवाची साधी, सरळ जीवनशैली हीच आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले
 
आहे. माणसं बेभान, बेधुंद झाली होती. कोरोनाने त्यांना वास्तव दाखविले. जागरण, पाट्या, मद्याचा अतिरेक, आरडाओरड, वाहनांचे आवाज, कंपन्यांचे प्रदूषण, घड्याळाच्या काट्यासारख्या धावपळीला ब्रेक लावला. नातेवाइकांकडे, गावाकडे, कुटुंबाकडे, समाजाकडे जायला कुणालाही वेळ नव्हता. कोरोनाने मात्र वेळच वेळ मिळवून दिला. माणसं चंगळवादात, नफेखोरीत आणि खोट्या प्रतिष्ठेत अडकली होती. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आजाराने दाखवून दिला. पशू, पक्षी बाहेर आणि माणूस घरात लॉकडाऊन हे पहिल्यांदा घडत आहे. कोरोनामुळे माणूस अंतर्मुख झाला आहे. जगण्याची केवळ भराभर साधने जमविण्यात सुख नसून, प्रत्यक्ष साधेपणाने, नात्यागोत्याच्या स्नेहबंधाने, आपुलकीने, माणुसकीचे जीवन जगणे, एकमेकांना समजून घेणे, सहकार्य करणे असे सगळे धडे कोरोनाने महिनाभरात प्रत्येकाला दिले.
 
जातपात, धर्म, श्रेष्ठ, कनिष्ठ अशा अहंभावाचे खोटे मुखवटे कोरोनाने फाडून फेकले. अखिल मानव जातीला खडबडून जागे केले आहे. आपण जे जगतो ते खरे जीवन नव्हे, याची जाणीवच करून दिली आहे. मानवतावादी समाज निर्माण व्हावा आणि जीवनाचा आनंद सर्वांना घेता यावा, असे अनेक धडे या संकटकाळात मिळाले. कदाचित ही धोक्याची घंटा असू शकते, याचा मानवी समाजाने विचार केला पाहिजे, जगायला लागते तरी काय आणि किती या प्रश्नांची सोपी उत्तरे कोरोनाने मिळवून दिली.