सॅनिटायझेशन चेम्बरचा चकवा

जनदूत टिम    24-Apr-2020
Total Views |
मूलत: वैज्ञानिकदृष्ट्या कोरोना व्हायरस हा शिंक किंवा नाकात, डोळ्यांत असलेल्या ओलाव्यातील ड्रॉपलेट मधून पसरतो. आपल्या हाताला कोणताही व्हायरस पटकन या ड्रॉपलेट द्वारे चिकटतात व त्यातूनच याचा प्रसार जास्त होतो. बाधीत व्यक्तीचे हात आवारातील लाकूड, प्लॅस्टिक, कापड, धातू यांना लागल्यास सदर व्हायरस त्यावर चार तास ते बहात्तर तास एवढ्या कालावधीसाठी राहतो.
 
corna_1  H x W:
 
आता व्हायरस असलेल्या लाकूड, प्लॅस्टिक, कापड, धातू यावर एखाद्या निरोगी माणसाने हात लावल्यास सदर व्हायरसचा प्रसार होतो. ऑफीस किंवा कोणत्याही आवारातील (जिथे एकापेक्षा जास्त लोक आहेत) एका व्यक्तीला बाधा झाली असल्यास सदर बाधित व्यक्तीने हात न धुता कुठेही हात लावल्यास या व्हायरसचा प्रसार होतो. धातू व प्लॅस्टिकवर सर्वाधिक वेळ म्हणजे जवळपास ७२ तास हा व्हायरस राहतो. यामुळेच लिफ्टमध्ये याचा प्रसार सर्वाधिक होतो असे काही वैज्ञानिकांचे मत आहे.
 
आता यावर आम्ही भारतीयांनी एक जुगाड केला. एक छोटेखानी भुयार बनवून त्यातून माणसाला आवारात प्रवेश घेण्याआधी सोडायचे. या भुयारात काही केमिकलची फवारणी करून निर्जंतुकीकरणाची सोय केलेली असते. निर्जंतुकीकरणासाठी क्वाटरर्नरी अमोनिक कंपाऊंड, हायपोक्लोराईट, अल्कोहोल, लायसॉल, क्लोरीन इत्यादी वापरलेले असते. वीस ते पंचवीस सेकंदांची ही फवारणी आपल्याला निर्जंतूक करेल ही यामागील भावना. लॉजिक किंवा तर्कशास्त्राप्रमाणे हे अगदी बरोबर आहे. पण खरेच असे होते का? कोरोना व्हायरसच्या आकाराचा विचार केल्यास हा व्हायरस सुईच्या टोकावर किंवा केसाच्या टोकावर कितीतरी मोठ्या संख्येने असू शकतो इतका तो अतिसूक्ष्म आहे. आता वीस ते पंचवीस सेकंदांच्या कालावधीत एखाद्या बाधीत रुग्णाच्या शरीराच्या केसाच्या टोकाचा भाग जर या औषधाच्या फवारणीतून बचावला तर हजारोंच्या संख्येने हा व्हायरस बचावला व पुढच्या प्रसारासाठी तयार राहिला.
 
बरं, याकामी आपण सदर औषधाची फवारणी आपल्या संपूर्ण शरीरावर केली. उघडी असलेली त्वचा, नेत्रपटल व इतर भाग जे अतिशय नाजूक आहेत त्यावर ही ह्या औषधाची फवारणी झालीच तर ते घातक आहे. या बाबी लक्षात घेऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अशा चेम्बरवर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच बंदी घातली आहे. ही बंदी लक्षात घेता तामिळनाडू सरकारनेही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सर्व राज्यभरात अशा सॅनिटायझेशन चेम्बरवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने खरे तर संपूर्ण भारतात अशी बंदी घालणे गरजेचे आहे. पण या आणीबाणीच्या परिस्थितीत कदाचित इकडे लक्ष देता आले नसेल त्यांना.
 
आजघडीला महाराष्ट्रात ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येकजण (सामान्य नागरिक, राजकारणी, एनजीओ इत्यादी) एक सामाजिक उपक्रम म्हणून असे सॅनिटायझेशन चेम्बर बनवून किंवा विकत घेऊन वेगवेगळ्या सार्वजनिक / कार्यालयीन आवारात लावत आहे. यासोबत आयआयटी खरगपूर, इ्स्टिटटय़ूट ऑफ ऑशियनोग्राफी, ॲग्रिकल्चरल रिसर्च इ्स्टिटटय़ूट आदी नामांकित संस्थांनी असे सॅनेटायझेशन चेम्बर केल्याने जनमानसात यावरील श्रद्धा वाढीस लागली आहे. भावना तर योग्य आहेत. पण त्यामागची शास्त्रीय भूमिका कुणीच लक्षात घेत नाही.
 
इतर नुकसानीपेक्षा मोठे नुकसान म्हणजे लोक गाफील राहतील. 'सॅनिटायझेशन चेम्बर आहे, कुठं सारखं हात धूत बसायचे' असे काहीसे डोक्यात ठेवून लोकांमध्ये एक गैरसमज तयार होईल. याने होणारे नुकसान सर्वात मोठे. सतत हात धुणे, कमीत कमी वेळा स्वत:च्या नाकाला व डोळ्याला हात लावणे या गोष्टी करणे गरजेचे. कोणत्याही प्रकारे अनोळखी ठिकाणी कापड, लाकूड, प्लॅस्टिक, धातू व इतर ठिकाणी हात लावणे इत्यादी गोष्टी करू नयेत. चुकूनमाकून हात लागला तर साबणाने हात धुवावेत किंवा हाताला सॅनिटायझर लावावे हाच एक पर्याय आहे. याला शॉर्टकट अजिबात नाही. जीवनमरणाच्या या प्रसंगात या छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळल्या नाहीत तर नक्कीच आपल्या आयुष्यावर बेतेल. कुणीही घाबरून न जाता सर्वांनी प्रत्येक बाबतीत सतर्क व दक्ष राहून यावर मात केली पाहिजे.