भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका?

जनदूत टिम    23-Apr-2020
Total Views |
करोनामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया वर्षअखेरीस भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत चारऐवजी पाच सामने खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
 
india vs austrelia_1 
 
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात डिसेंबरमध्ये कसोटी मालिका रंगणार असून त्यापूर्वी उभय संघांत ट्वेन्टी-२० मालिकासुद्धा खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियामध्येच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यादरम्यान ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धासुद्धा खेळली जाणार आहे.
‘‘करोनामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सर्व आगामी प्रकल्प रद्द झाले असून आम्हाला आर्थिक नुकसानीलासुद्धा सामोरे जावे लागत आहे. त्यातच ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाविषयीही प्रश्नचिन्ह अद्याप कायम असल्याने आमच्या चिंतेत भर पडली आहे,’’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स म्हणाले.
 
‘‘शक्य होईल त्यावेळी आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील आहे. त्यामुळेच भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत चारऐवजी पाच सामने खेळवण्याचा आमचा विचार आहे. यासाठी रिकाम्या स्टेडियम्समध्ये सुद्धा सामने खेळवावे लागले तरी चालेल,’’ असेही रॉबर्ट्स यांनी सांगितले.
 
ऑस्ट्रेलियामध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत विदेशी नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला असून क्रिकेट ऑस्ट्रेलियानेसुद्धा त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना ३० जूनपर्यंतचे मानधन सुपूर्द केले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियावर बिकट परिस्थिती येऊ शकते.
 
‘‘ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटला फार उच्च दर्जा दिला जातो. करोनामुळे येथील स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटलासुद्धा मोठा फटका पडला असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे असलेला पुढील चार वर्षांचा रकमेचा साठा या काळात संपायला आला आहे. त्यामुळेच करोनाचे संकट टळल्यावर चहूदिशेने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू,’’ असे रॉबर्ट्स यांनी नमूद केले.