गरिबांसाठी दोन पोळ्या जास्तीच्या

जनदूत टिम    21-Apr-2020
Total Views |
संकटाच्या काळात माणूस कमालीचा स्वार्थी होतो असे शास्त्र सांगते. एकदा का ही स्वार्थाची लागण झाली की माणसाला कुटुंबाशिवाय दुसरे काही सुचत नाही. टंचाईच्या काळात वस्तू जमवून ठेवण्याचा छंद आपसूकच जडतो. ही मानवी प्रवृत्ती आहे. मी, माझे अशी भावना याच काळात तीव्रतेने मेंदूत घर करते. याची लागण जर या वर्गास झाली असेल तर तो त्यांचा दोष कसा? सध्याची बंदी किती काळ चालू राहणार? तिला कितीदा मुदतवाढ मिळणार? आणि या काळात साऱ्या चीजवस्तू संपून गेल्या तर आपले काय? मग टंचाई आणि महागाईचे दुष्टचक्र सुरू झाले तर त्या मिळवायच्या कशा? यासारखे प्रश्न याच वर्गाच्या मनात येणार. त्याला कारणही तसेच आहे. समाजातला जो उच्चवर्ग आहे त्याने त्याची सोय आधीच करून ठेवली आहे. काही लागलेच तर एका फोनवरून ते उपलब्ध करून घेण्याची त्याची ऐपत आहे. महागाईची झळ या वर्गाला बसली तरी सहन करण्याची त्याची तयारी आहे.
 
vegetable_1  H
 
सर्व जाती, धर्माचा समावेश असलेला हा वर्ग तसा राष्ट्रभक्त आहेच. थाळी वाजवणे, दिवे घालवणे व लावणे असल्या राष्ट्रकार्यात त्याचा सहभाग असतोच. हे काय राष्ट्रकार्य आहे का, असा प्रश्न कुणी उपस्थित केलाच तर त्याला तावातावाने उत्तर देण्यातसुद्धा हा वर्ग समोर असतो. त्यामुळे त्याच्या भक्तीविषयी शंका घेणे तसे चूकच. या वर्गाचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. तो सदैव नियमांचे पालन करतो, इतरांना नियमांचे पालन करायला लावतो. जे करत नाहीत त्यांच्यामुळे अस्वस्थ होतो. तर अशा या वर्गाकडून एखादवेळ चूक घडलीच तर त्याचा किती बाऊ करायचा. याला काही धरबंद आहे की नाही! सध्याच्या टाळेबंदीच्या काळात मोठय़ा प्रमाणावर कापडी पिशव्या घेऊन बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी जाणारा वर्ग हाच आहे असा जावईशोध कुणीतरी लावला व नाहक या वर्गास बदनाम व्हावे लागले.
 
हा वर्ग सध्याच्या संकटाच्या काळात एवढय़ा भाज्यांची बेगमी कशासाठी करतो? तिकडे गरिबांना अन्न मिळत नसताना स्वत:ला संवेदनशील समजणाऱ्या या वर्गाने एवढी घाऊक खरेदी करण्याची गरज काय? यांच्या घरातल्या भाज्या रोजच्या रोज संपतात तरी कशा? दर आठवडय़ाला खाद्यतेलाचे पिंप घेऊन हा वर्ग घरात नेमके काय तळतो? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करून काही कुंठित मनांनी या वर्गास बेजार करून सोडले आहे. मुळात हे असे हल्ले करणाऱ्या जमाती अनेक गोष्टींतील कार्यकारणभाव समजून घेत नाहीत. यामागचे नेमके इंगित काय तेही लक्षात घेत नाहीत.
 
किराणा थोडा जास्त घेतला तरी त्यासाठी रोज दुकानात जावे लागत नाही. आता या थोडय़ा जास्तीला साठेबाजी म्हणणे गैरच; पण म्हणणारे म्हणतात. तिकडे वर्ध्यात म्हणे दिवाळीपेक्षा जास्त वाणसामानाची विक्री करोनाकाळात झाली. त्यासाठीही याच वर्गाला दोषी ठरवले गेले. हा अपवाद म्हणू! शेवटी उरतो तो भाजी बाजार. सध्या काही कामच नसल्याने व बातम्या पाहून पाहून कंटाळा आल्याने सहज शतपावली म्हणून रोज या बाजारात गेले तर कोणते आभाळ कोसळणार? कोणत्याही साथीच्या आजारावर मात करायची असेल तर उपचारासोबतच संतुलित आहार महत्त्वाचा असतो. त्यातल्या त्यात हिरव्या भाज्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या. मग त्या थोडय़ा जास्तीच्या खरेदी केल्या, त्या ताज्या मिळाव्या म्हणून रोज बाजारात चक्कर मारली तर असा कोणता फरक पडणार? तरीही काहीजण या वर्गाच्या भाजीप्रेमावर प्रश्न उपस्थित करतात. आता या जास्तीच्या खरेदीमुळे काही भाज्या खराब होत असतील, फेकल्याही जात असतील तर त्यावरून एवढा बागुलबुवा करण्याचे काही कारण नाही.
 
बाहेर जातानासुद्धा हा वर्ग साऱ्या नियमांचे पालन करतोच. शारीरिक अंतराचे भान ठेवतो. कुणी त्यात खोडा घालत असेल तर त्याला राष्ट्रभक्ताच्या शैलीत सुनावतो. कुणी चेहऱ्यावर मुखपट्टी बांधली नसेल तर त्याला हटकतो. राष्ट्राच्या बचावासाठी जे जे आवश्यक असेल ते ते तो अगदी प्रामाणिकपणे करतो. त्याच्या या वारंवार बाजारभेटीमुळे गर्दी वाढते असा आक्षेप घेणे या वर्गाचा अपमान आहे. बाजारात हवशे, नवशे, गवशे गर्दी करतात. त्यात या वर्गाचा समावेश करून त्यांचा अपमान करण्याची घाई कुणी करू नये. आता बंदीच्या काळात असे वारंवार बाहेर जाणेच बेकायदा, असे कुणी म्हणेल. त्यात थोडेफार तथ्य असले तरी त्याला हा वर्ग अजिबात जबाबदार नाही. जे करू नको म्हटले की ते हटकून करायचे ही मानवी प्रवृत्ती आहे. सर्वामध्ये असलेल्या या प्रवृत्तीचा केवळ मध्यमवर्गाशी संबंध जोडणे ही नाहक बदनामीच नाही का?
 
टाळेबंदी नेमकी कशी असते, निर्मनुष्य रस्ते कसे दिसतात, बंदोबस्त नेमका कसा असतो हे न्याहाळण्याची उत्सुकता कुणाला नसते हो! मग त्यासाठी एकटा मध्यमवर्गच दोषी कसा? नुसते प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी यावर विचार करणे गरजेचे नाही का? खरे तर उच्चप्रतीच्या सामाजिक जाणिवा जोपासणारा हा एकमेव वर्ग आहे. भलेही तो मदत करू शकत नसेल पण गरिबांविषयी त्याला कळवळा आहे. म्हणूनच तर आता या वर्गाच्या अनेक घरांतून गरिबांसाठी दोन पोळ्या जास्तीच्या अशी मोहीम सुरू झाली आहे व त्याला प्रतिसादही उत्तम मिळतो आहे. एवढे सगळे करून हा वर्ग आपल्या कुटुंबाला कसलीही असुविधा व्हायला नको, यासाठी काही वस्तूंची, भाज्यांची साठवणूक करत असेल, खाऊनपिऊन कौटुंबिक जिव्हाळा वाढवत असेल तर तेवढय़ावरून त्याला बोल लावणे योग्य आहे का?
तुम्हीच सांगा!