रामायणातील संजीवनी औषध वनस्पतीचे 'हे' रहस्य

जनदूत टिम    20-Apr-2020
Total Views |
रामायणामध्ये श्री हनुमान यांनी प्रभू रामचंद्र यांचे भाऊ लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी संजीवनी औषधी वनस्पतीची आवश्यकता होती. पण संजीवनी वनस्पती ओळखू न शकल्यानं हनुमानानं पूर्ण पर्वतच उचलून आणला.
 
Sanjivani_1  H
 
देशात प्राचीन काळापासून उपयोगात असलेले औषधी वनस्पती, त्यांचा वापर करण्याच्या पद्धती आणि त्यांचे महत्त्व याबाबत तुम्हाला माहिती देण्यासाठी रामायणातील संजीवनी औषधी वनस्पतीचे उदाहरण देत आहे. या औषधी वनस्पतींशी संबंधित काही तथ्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रामायणामध्ये ज्याप्रमाणे आयुर्वेदिक औषधी वनस्पतीमुळे लक्ष्मणाचा जीव वाचला होता. त्याचप्रमाणे आजही कित्येक आयुर्वेदिक औषधांमुळे गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. जाणून घेऊया संजीवनी औषधी वनस्पतीबाबतची माहिती...
 
​आयुर्वेद म्हणजे काय?
आयुर्वेद ही भारतातील प्राचीन औषध प्रणाली आहे. संस्कृतमध्ये आयुर्वेद या शब्दाचा अर्थ जीवनाचे शास्त्र असा होतो. भारतात या विद्येचा जन्म ५००० वर्षांपूर्वी झाला होता. यास "मदर ऑफ ऑल हीलिंग" देखील म्हणतात. याचे मूळ प्राचीन वैदिक संस्कृतीशी संबंधित आहेत. बर्‍याच वर्षांपूर्वी याचं शिक्षण गुरूंकडून आपल्या शिष्यांना शिकवलं जायचे. सर्व शिक्षण तोंडी दिले जात असल्यानं याबाबतची माहिती लिखित स्वरुपात मिळणे दुर्मिळ आहे. पाश्चिमात्य देशांतील बऱ्याच नैसर्गिक औषधोपचार पद्धतींचे मूळ आयुर्वेदाशी जोडलेले आहेत. ज्यामध्ये होमिओपॅथी आणि पोलॅरिटी थेरपीचा समावेश आहे.
 
आजही द्रोणागिरी पर्वत अस्तित्वात आहे?
हनुमानानं ज्या द्रोणागिरी पर्वताचा काही भाग उचलून आणला, तो पर्वत आजही प्रसिद्ध आहे. श्रीलंकेत हा पर्वत रुमासला पर्वत म्हणून ओळखला जातो. या पर्वतावर आजही संजीवनी औषधी वनस्पती उपलब्ध आहे, असे म्हटलं जाते. सोबतच श्रीलंकेमध्ये दक्षिणेकडील समुद्राच्या किनाऱ्यावर बर्‍याच ठिकाणी हनुमानानं आणलेल्या या डोंगराचे भाग आढळून येतात. असंही म्हटलं जातं की पर्वत उचलून घेऊन जात असताना त्याचा एक भाग रीतिगालामध्ये पडला होता. याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आजही अशा औषधी वनस्पती आढळतात, ज्या त्या क्षेत्रात वाढणाऱ्या वनस्पतींपेक्षा अगदी निराळ्या आहेत. याचदरम्यान द्रोणागिरी पर्वताचा दुसरा हिस्सा हाकागाला बागेत पडला होता. या ठिकाणावरील झाडेझुडपे देखील त्या परिसरातील माती आणि वनस्पतींपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत.
 
​संजीवनी औषधी वनस्पती म्हणजे काय?
संजीवनी ही एक चमत्कारी औषधी वनस्पती आहे, असं म्हटलं जातं. कोणत्याही समस्येचं निवारण करण्याचे सामर्थ्य या औषधामध्ये आहे. या औषधाच्या सेवनामुळे मृत शरीर पुन्हा जिवंत होऊ शकते,असं म्हणतात. वैज्ञानिक साहित्याच्या यादीमध्ये संजीवनीचा उल्लेख 'सेलागिनेला ब्रायोप्टेरिस' म्हणून केला गेला आहे. प्राचीन ग्रंथांच्या संशोधनातही आतापर्यंत कोणतीही वनस्पती संजीवनी औषधी वनस्पती म्हणून निश्चित स्वरुपात समोर आलेली नाही. मात्र संजीवनी वनस्पती अंधारात चमकते, असा उल्लेख काही ग्रथांमध्ये करण्यात आला आहे.
 
​वाल्मिकींनी रामायणात काय लिहिलंय?
लंकेतील वैद्यांनी हनुमानाला असे सांगितले होते,हिमालयावर कैलाश आणि ऋषभ पर्वतामध्ये एक असा पर्वत आहे. ज्यावर जीवन प्रदान करणाऱ्या औषधी वनस्पती आहेत. एकूण चार वनस्पती आहेत. मृतसंजीवनी, विशल्यकरणी, सुवर्णकर्णी आणि संधानि या चारही औषधी वनस्पतींमधून प्रकाश बाहेर पडतो. या औषधी वनस्पती घेऊन तुम्हाला लवकरात लवकर यावे लागेल. रामायणाच्या कथेनुसार लक्ष्मणाला शुद्ध आल्यानंतर हनुमानानं तो पर्वत पुन्हा मूळ जागेवर नेऊन ठेवला. औषधी वनस्पतींच्या संवर्धनाचे हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. दरम्यान संजीवनी औषधी वनस्पती विषयी अद्यापही संशोधन सुरू आहे.