राज्याच्या तिजोरीवर ताण, नोकरी, व्यवसायही धोक्यात

- डॉ. जे.एफ.पाटील, अर्थतज्ज्ञ    17-Apr-2020
Total Views |
अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या घटकांपैकी पर्यटन हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने देशाचे सामाजिक तसेच आर्थिक स्वास्थ्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे.
 
Job_1  H x W: 0
 
लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांतील परिस्थिती गंभीर झाली असून पर्यटनावर त्याचा दीर्घकालीन परिणाम होणार आहे. महिनाभरात हजारो कोटी रुपयांचा फटका या क्षेत्राला झाला असून, आगामी काळात राज्याच्या तिजोरीवर ताण पडण्याबरोबरच नोकरी आणि व्यवसायावरही त्याचा मोठा परिणाम होणार आहे.
 
राज्यात दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे २० लाख पर्यटक येतात. त्यापैकी दीड कोटी पर्यटक हे अजिंठा, वेरूळ व मुंबईला भेट देतात. परदेशी पर्यटकांपैकी तीन ते साडेतीन लाख पर्यटक राज्याच्या इतर भागांना, जसे पंढरपूर, शिर्डी, पैठण, शनिशिंगणापूर आदी ठिकाणी भेटी देतात. विशेष म्हणजे सुट्टयांमध्ये या पर्यटनाला बहर येतो. मात्र यावेळी कोरोनाने पर्यटनाचीच सुट्टी केल्याने थंड हवेची ठिकाणे, गडकोट, दुर्ग, किल्ले, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, जैवविविध उद्याने, सरोवरे, कोकण दर्शनासह, समुद्र, हवाई, फुरसतीचे, उन्हाळी, निसर्ग, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, व्यावसायिक तसेच धार्मिक अशा सर्व प्रकारचे पर्यटन लॉक झाले आहे. देशातील वैद्यकीय सेवेबाबत महाराष्ट्राचा अव्वल राज्यांपैकी एक, असा नावलौकिक आहे. मुंबई, पुणे, मिरज या ठिकाणी राष्ट्रीय, तसेच बाहेरून येणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जातात. यामुळे परकीय चलनात मोठी भर पडते. सध्या कोरोनामुळे हे पर्यटनही बंद आहे.
 
कोरोनामुळे सर्व प्रकारचे धार्मिक उत्सव, विधींना बंदी घालण्यात आल्याने या क्षेत्रात होणारी मोठी आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. गावा-गावांतील जत्रा, मेळावे त्याचबरोबर लग्न समारंभ आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमांनाही बंदी घातल्याने, या प्रकारच्या पर्यटनातून होणारी उलाढालही थांबली आहे. छोट्या-मोठ्या रोजगारांवरही त्याचा परिणाम झाला असून, हातावर पोट असणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.
 
पर्यटनाचे उत्पन्न हे विविधांगी आहे. प्रत्येक राज्यातील तिजोरीत किमान दहा टक्के हिस्सा हा पर्यटनाचा असतो. गोवा, केरळ, उत्तर प्रदेश, तामिळनाडूनंतर महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्र अधिक विस्तारले आहे. पर्यटनातून फार मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते. यामुळे विविध व्यवसायांना चालना मिळत असते. राज्याच्या तिजोरीत सुमारे पंधरा टक्के हिस्सा हा पर्यटनाचा आहे. मात्र यावर्षीचे पर्यटन आता ठप्प झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा प्रवासामधून अधिक होतो. त्याचे संक्रमण थांबवण्यासाठी पर्यटन थांबवणे अपरिहार्य आहे. त्यामुळे यावर्षीचे पर्यटन थांबवून पुढील वर्षीसाठी तयारी करणेच अधिक हिताचे आहे.