सर्वाधिक कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

जनदूत टिम    13-Apr-2020
Total Views |
मुंबई : कोरोनाविरूद्ध लढाईतील महत्त्वाचे शस्त्र असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता आणखी वाढ झालेली असल्याने आपल्याला आपला लढा आणखी खंबीरपणे लढायचा आहे. कोरोनाविरूद्धचे हे युद्ध आपण जिंकणारच, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
 
Devendra Fadnvis_1 &
 
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना आज ज्या जिल्ह्यांत कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत, त्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. या जिल्ह्यांतील खासदार, आमदार, महापौर, पदाधिकारी आजच्या संवादसेतूमध्ये सहभागी झाले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर नेतेही सहभागी होते. यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मालेगाव, नगर, लातूर, अकोला इत्यादी ठिकाणांहून अनेक सूचना करण्यात आल्या.
 
भाजपाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी अन्नधान्य, तयार अन्न, मास्क, सॅनिटायझर, औषधी आणि इतर लोकोपयोगी वस्तुंचा पुरवठा करीत आहेत. आतापर्यंत सुमारे ४० लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहोत. हे सारे जिल्हे अधिक कोरोना रूग्णांचे असल्याने आणि आता लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने आपल्याला आणखी कठोर परिश्रम येत्या काळात करायचे आहे. हे परिश्रम करताना आपल्या स्वत:ला सुरक्षित राखत आणि अधिकाधिक काळजी घेत काम करायचे आहे. स्वत:ची सुरक्षितता राखत येणाऱ्या काळात आव्हानांना तोंड द्यायचे आहे. लॉकडाऊनची अधिकाधिक अंमलबजावणी करण्यात सुद्धा आपल्याला योगदान द्यायचे आहे आणि विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
 
ज्यांना रेशनकार्ड नाही, त्यांनाही धान्य मिळणे, हॉस्पीटल सुविधा, डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी यांच्या सुरक्षेचे उपाय अशा अनेक सूचना यावेळी लोकप्रतिनिधींनी केल्या. अनेक चांगले उपक्रम कार्यकर्ते राबवित आहेत. नागपुरात १ लाख सॅनिटायझर्सचे वाटप, ठाण्यात पोलिसांना २५०० लिटर्स सॅनिटायझरचा पुरवठा, लातूरमधील मास्कवाटप असे अनेक चांगले प्रयोग राबविले जात आहेत. आरोग्यदूत, पोलिस आणि सफाई कामगार ही लढाई प्रत्यक्ष मैदानातून लढत असल्याने त्यांची काळजी घेणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. लॉकडाऊन कालावधी वाढल्याने कोणताही गरिब भोजनापासून वंचित राहणार नाही आणि कोणताही गरजू मदतीपासून वंचित राहणार नाही, हे आपल्या सेवाकार्याचे ब्रिद यापुढील काळात सुद्धा सुरूच ठेवावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी केले.