भारत बनला ‘संजिवनी’

जनदूत टिम    13-Apr-2020
Total Views |
ज्या औषधांसाठी अमेरिकेने भारताला धमकी वजा इशारा दिला होता, ती हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधे १३ देशांसाठी पाठवण्याची परवानगी भारत सरकारने दिली आहे. विशेष म्हणजे त्यात अमेरिकेचाही समावेश आहे.हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पाठवण्यात येणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, स्पेन, जर्मनी, बहरिन, ब्राझिल, नेपाळ, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदिव आणि बांगला देश या १३ देशांचा समावेश आहे. अमेरिकेने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या ४८ लाख गोळ्या मागितल्या होत्या. भारताने ३५.८२ लाख गोळ्या पाठवण्यास मंजुरी दिली आहे.
 
medicine_1  H x
 
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजे काय ?
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या आहेत त्यांचा वापर स्वप्रतिकारशक्ती कमी झाल्याने होणाऱ्या रोगात केला जातो. मलेरियाविरोधात वापरल्या जाणाऱ्या क्लोकोक्विन या गोळीच्याच प्रजातीचे हे औषध आहे. पण त्याचा वापर हृदयाच्या संधीवातावर केला जातो.
 
औषधाचे वैद्यकीय पुरावे काही आहेत का ?
दी लॅन्सेट ग्लोबल हेल्थ या नियकालिकातील संशोधन निबंधानुसार या औषधाने प्राथमिक पातळीवर तरी सार्स सीओव्ही २ या विषाणूला मारण्याचे गुणधर्म दाखवले आहेत, या औषधामुळे शरीरात एका टप्प्यावर विषाणूंची जी संख्या वाढत जाऊन ते मोकाट सुटतात त्या प्रक्रियेला आळा घातला जातो. भारतात या औषधाच्या वापराबाबत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने काही नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार प्रायोगिक पातळीवर हे औषध करोनावर प्रतिबंधात्मक पातळीवर गुणकारी आहे. लक्षणे न दाखवणारे आरोग्य कर्मचारी तसेच संपर्कात आलेले पण लक्षणे न दाखवणारे रूग्ण यांच्यात या औषधाचा वापर करावा अशी शिफारस करण्यात आली. भारताच्या करोना प्रतिबंधक दलाने या औषधाचा वापर तातडीच्या परिस्थितीत मर्यादित पातळीवर करावा असे म्हटले आहे.
 
या औषधाचे भारतातील उत्पादक कोण आहेत ?
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाची बाजारपेठ फेब्रुवारी २०२० पर्यंत १५२.८० कोटी रूपयांची होती. अनेक देश हे औषध भारताकडून घेतात. मुंबईच्या आयपीसीए लॅबोरेटरीजकडून या औषधाचे ८२ टक्के उत्पादन होते. त्यांची एचसीक्यूएस व एचवायक्यू ही उत्पादने आहेत. या कंपनीचे ८० टक्के औषध निर्यात होते. अहमदाबाद येथील कॅडिला हेल्थकेअरचा वाटा आठ टक्के आहे तर वॉलेस फार्मास्युटिकल्स, टॉरेंट फामॉस्युटिकल्स, ओव्हरसीज हेल्थकेअर प्रा. लि. यांचा वाटा खूप कमी आहे.