कोरोना... दुसरी बाजू

जनदूत टिम    10-Apr-2020
Total Views |
भारतात एका दिवसाला रस्त्यावरील अपघातांत मरणाऱ्यांची संख्या सरासरी ४१० इतकी आहे. जर नेहमीसारखीच परिस्थिती असती तर या सरासरीप्रमाणे गेल्या पंधरा दिवसांत जवळपास साडेसहा हजार लोक मृत्युमुखी पडले असते. आज या कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे हे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झाले आहे . म्हणजे भारतभरात जवळपास ६००० लोकांचे प्राण वाचले आहेत. ही कोरोनाला धन्यवाद द्यावी वगैरे अशी काही गोष्ट नाही पण घरातून बाहेर न पडल्यामुळे ही एक चांगली गोष्ट घडत आहे.
आज देशभरातील गुन्हेगारी खूप कमी झाली आहे. बेंगलोर मध्ये गेल्या आठवड्यात एकही चेन स्नॅचिंगची घटना नोंद झालेली नाही तर दिल्लीमध्ये सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांवर होणारे अत्याचार शुन्य टक्के एवढे आहेत. ना कुठे गाड्यांची चोरी होतेय ना कोणत्या गटात हाणामारी!
 
corona-virus-negative_1&n
 
आत्महत्या करणं जवळपास बंद झालं आहे. WHO च्या आकडेवारी नुसार भारताचा वार्षिक आत्महत्या दर, एक लाखाला १० आहे. यानुसार गेल्या पंधरा दिवसांत भारतभरात तब्बल पाच हजार आत्महत्या झाल्या असत्या ज्या नाही झाल्या. तसेच तब्बल २५०० खून आणि हत्या थांबल्या आहेत. एकंदरीत गेल्या दोन आठवड्यात भारतात जवळपास पंधरा हजार मृत्यू थांबले आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मशिनरी अंगावर पडून होणारे मृत्यू, अपंगत्व तसेच कोळशाच्या खाणीतील, पाण्यात बुडून, रेल्वे अपघातातील मृत्यू... आकडेवारी खूप मोठी आहे. हे सर्व मृत्यू आज थांबले आहेत.
 
कोरोनामुळे होणारा मृत्यूचा आकडा गुणाकाराच्या पटीने जरी वाढत असेल तरी हे टळलेलं नुकसानही काही कमी नाही. खरंतर लॉकडाऊन हा काही हे मृत्यू किंवा हे नुकसान टाळण्याचा मार्ग नाही. हे जे काही घडतंय ते तुमच्या आमच्या चांगुलपणामुळे नाही तर पाणी नाकातोंडात शिरू लागल्यामुळे नकळत का होईना हे चांगले काम आपल्याकडून झाले आहे.
 
जालंधरमधून हिमाचल प्रदेशच्या पर्वतरांगा दिसत आहेत, मुंबईमध्ये मोर आणि हरिण रस्त्यावर दिसून आले, कदाचित तुम्ही अनुभवलंही असेल की पक्षांचा किलबिलाट अशात थोडा जास्त वाढला आहे. गंगा नदी गेल्या पंधरा दिवसात स्वत:हून ५० टक्के स्वच्छ झाली आहे. आपल्याला करोडो रुपये आणि हजारोंचे मनुष्यबळ वापरून जे काम शक्य झाले नाही ते निसर्गाने घडवून आणले...अगदी सहजपणे, नकळत! कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल पण वायूप्रदूषणात गेल्या पंधरा दिवसात तब्बल ७१ टक्के घट झाली आहे. हवेतील नायट्रोजन डायॉक्साईड चे प्रमाण ५२ हून १५ वर आले आहे. हां, त्यात माणसाचे आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि बरेच काही नुकसान भरपूर झाले... असे मनुष्य नावाच्या प्राण्याला वाटत असेलही पण त्याच्या वाटण्याला निसर्गाने केराची टोपली दाखवली आहे. एका झटक्यात माणसाला त्याची औकाद दाखविली आहे. निसर्ग ही जी पर्वतरांग, जी स्वच्छ हवा पाणी दाखवतोय यातून तो आपल्याला एकच सांगतोय की... त्याला, या पृथ्वीला माणसांची बिलकुल गरज नाही. आपण घरात बसलोय म्हणून तर प्राणी शहरात येत आहेत, निसर्ग स्वच्छ होतोय...ही कौतुकाची नसून माणसांसाठी खरंच किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही? इथे आपल्या व्यतिरिक्त दुसरेसुद्धा कोणी राहाते हे आपण विसरूनच गेलो होतो. माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळा मेंदू दिला आहे याच घमंडामध्ये आपण जगत राहिलो. खरंतर जिवंत राहण्यापलीकडे आपण सतत काहीतरी शोधत राहिलो... कशासाठी हे मात्र कधी कोणालाच कळले नाही. संपत्ती, मानापमान, अघोरी स्पर्धा, धर्म, अपेक्षा... आज ते सर्व तुच्छ आणि अर्थहीन आहे हे आपल्याला समजावून सांगितले तेही एका न दिसणाऱ्या विषाणूने! विरोधाभास तर पहा, आज हवा प्रदुषणमुक्त, अतिशय स्वच्छ आहे. सर्व प्राणी ही स्वच्छ हवा अनुभवत आहेत आणि माणूस मात्र मास्क लावून फिरतोय... ही आपली किंमत! बघू यातून आपण किती शिकतो ते.
काल हे चंद्रदर्शन झाले. आयुष्यात एवढा स्पष्ट आणि मोठा चंद्र कधीच पाहिला नव्हता... उघड्या डोळ्यांनी त्याच्या बदलणाऱ्या छटा दिसत होत्या. तो चंद्रचा लख्ख प्रकाश कोरोनाच्या प्रभावाची दुसरी बाजू दाखवून गेला. पुढच्या दीड महिन्यात निसर्ग खूप काही दाखवणा
र आहे. आपण फक्त पाहात राहायचं... दोन्ही बाजू!