महात्मा गांधीही होते क्वारंटाइन

जनदूत टिम    01-Apr-2020
Total Views |
कस्तुरबा गांधी आणि आपल्या दोन्ही मुलांसह महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासाला निघाले होते. मुंबईहून हा प्रवास सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेत जाऊन काय करणार, असा प्रश्न कस्तुरबा यांना पडला. जलमार्गे हा प्रवास मुंबई येथून सुरू झाला. प्रवासात एक भयंकर सागरी वादळ आले. या वादळाच्या परिस्थिती महात्मा गांधी आपल्या सहप्रवाशांना किस्से आणि कहाण्या सांगत त्यांचे मनोबल वाढवत होते.
 
gandhi_1  H x W
 
वादळ शमल्यानंतर ४४ दिवसांनी जहाज गंतव्य स्थानी पोहोचले. डरबनच्या किनारी जहाज लागल्यानंतर तेथील प्रशासनाने सर्व प्रवाशांना जहाजातून उतरण्यास प्रतिबंध केला. मुंबईतील प्लेग रोगाचे कारण देण्यात आले होते. सर्व प्रवाशांना सरकारी देखरेखीमध्ये विलग करण्यात आले होते. जोपर्यंत सरकारी आदेश येत नाही, तोपर्यंत कोणीही जहाजावरून खाली उतरू नये, असे सांगण्यात आले. अनेक दिवस हा प्रकार सुरू होता. या परिस्थितीतही गांधीजी सहप्रवाशांना धीर धरण्याचा सल्ला देत होते; त्यांचे मनोबल वाढवत होते.
 
काही दिवसांनंतर हे गोऱ्या लोकांचे षड्यंत्र आहे, असे गांधीजींच्या लक्षात आले. महात्मा गांधींचे पाय पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत पडू नयेत, यासाठी प्लेगच्या साथीचे कारण पुढे करून महात्मा गांधींना क्वारंटाइन करण्यात आले होते. असे असले तरी गांधीजींनी सरकारच्या निर्णयाचा सन्मान राखला. काही दिवसांनी त्यांना मुक्त करण्यात आल्यानंतर गोऱ्या सरकारविरोधात निर्णायक लढ्याची वेळ आली आहे. आता हे पाऊल उचलणे भाग आहे, असा पक्का निर्धार महात्मा गांधींनी केला. यानंतरचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. प्रतिकूल परिस्थितीतही माणसाने संयम बाळगणे आवश्यक आहे, अशी शिकवण गांधीजींनी या घटनेतून दिली आहे. क्वारंटाइन कितीही लांबले तरी, संयमाने, स्वतःवर विश्वास ठेवून, धैर्य राखत आणि सर्व परिस्थिती सुरळीत होईल, अशी प्रचंड इच्छाशक्ती दाखवली पाहिजे, असेच या घटनेतून शिकायला मिळते.
 
आजच्या घडीची परिस्थितीही अशीच आहे. देशावर करोना नावाचे संकट घोंघावत आहे. त्याला संयमान, धीराने, सकारात्मकतेने तोंड द्यायला हवे आणि करोनामुक्त भारताचा संकल्प कठोर आचरणाने सर्वांनी सत्यात उतरवायला हवा. घराबाहेर न पडल्याने अनेकांना आपली मदतच होत आहे. घराबाहेर पडू नये. शासन, प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, हीच काळाची गरज आहे.