१०० दिवसात ठाकरे सरकारने मनं जिंकली

जनदूत टिम    07-Mar-2020
Total Views |
“कालपर्यंत उद्धव ठाकरे यांना विरोध करणाऱ्या तरूणाचं पत्र सोशल मीडिया वर व्हायरल… होतय. महाराष्ट्र सरकारला १०० दिवस झाले एकापाठोपाठ एक कामाचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सरकारच्या पहिल्या ६०-७० दिवसांत आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचं नविन सरकार स्थापन झाले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अनेकांना धक्का दिला.
मुख्यमंत्री होण्याअगोदर वैयक्तिक उद्धव ठाकरे यांना विरोध करणाऱ्या एका तरूणाने उद्धव ठाकरे यांच्या २ महिन्यांच्या कार्य काळानंतर त्यांच्याविषयी एक लेख लिहिला आहे, जो की सोशल मीडिया वर चर्चेचा विषय ठरला आहे.
त्या तरूणाने लिहिले आहे की ” मी काही शिवसैनिक वगैरे नक्कीच नाही. मी गेल्या काही दिवसांपर्यंत अनेक मुद्द्यांवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका देखील केली आणि विरोध सुद्धा.
 
Uddhav CM 01_1  
 
मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर आजकाल उद्धव ठाकरे यांच्यावर होणाऱ्या टिकेविषयी सुद्धा मला माझं मत मांडावसं वाटलं. एखाद्या माणसाची विचारसरणीच संकुचित असेल आणि बुद्धी कुंठित झालेली असेल तर ती व्यक्ती त्यानुसारच वागणार यात आश्चर्य नाही.पण अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि व्यापक, सर्वसमावेशक विचारधारा असूनही कुणी संकुचित,मर्यादित अवकाशात वावरत असेल तर मात्र आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सद्या जोमदार वाटचालीकडे पाहताना मला राहून-राहून हेच वाटत राहतं.मागील दोनतीन महिन्यांच्या काळात ज्या पद्धतीने आणि प्रचंड आत्मविश्वासाने ते राज्याचा गाडा हाकताहेत, ज्या पद्धतीने अतिशय प्रगल्भ वक्तव्य करताहेत,विरोधकांना धोबीपछाड देताहेत ते पाहिल्यावर का? हा माणूस इतकी वर्ष विरोधी बाकावर अडकून पडला होता हा प्रश्न पडतो. वेगवेगळ्या व्यासपीठांवरून आणि विधिमंडळातही मागील काही काळात ते ज्या पद्धतीने बोलताहेत ते अतिशय प्रभावी आहे. राज्य हिताचं आहे. तिन्ही पक्षांचा समन्वय राखण्यासाठी त्यांचा प्रयत्न प्रामाणिक आहे. काहीतरी चांगलं करून दाखवण्याची त्यांची जिद्द, तळमळ हृदयाला भिडणारी आहे.राष्ट्रवादीचा काही प्रश्न नाही. परंतु काँग्रेसने काही नाटक केले नाही आणि सरकार स्थिर राहिले तर पाच वर्षात राज्य बऱ्यापैकी सुस्थितीत येऊ शकेल.
 
त्याने म्हटले आहे की, पूर्वी मी सुद्धा अनेकदा उद्धव ठाकरेंवर प्रसंगानुरूप टीका-टिप्पणी केली आहे. पण आता त्यांच्या कामाची दिशा योग्य असल्यावर त्यांचे कौतुक का करू नये..? मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिल्याच बैठकीत रायगड संवर्धनासाठी निधी मंजूर करून उद्धवजींनी महाराष्ट्राच्या अस्मितेच्या भावनीक विषयाला हात घातला. त्यानंतर दुसरं म्हणजे शिवभोजन‌. अगोदर मी या योजनेचा विरोध केला होता. कारण ही योजना हवी त्या पद्धतीने राबविली जाणार नाही, असा माझा अंदाज होता. मात्र राज्यातील गोरगरीब जनतेसाठी १० रूपयांत भरपेट शिवभोजन ही संकल्पना उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सत्यात उतरवण्यास सुरूवात केली आहे ते कौतुकास्पद आहे. मराठा क्रांती मोर्चा, भीमा कोरेगाव, आरे आंदोलन, नाणार आंदोलन या सर्व आंदोलनातील सौम्य गुन्हे माफ करून तरूणांचं वाया जाणारं आयुष्य वाचवण्याचं काम उद्धवजींनी केलं.
 
सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. २ लाखांपर्यंत कर्ज असलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी या योजनेतून जाहीर केली गेली. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येक सभेत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते जे की त्यांनी पुर्ण करण्यास सुरुवात केली आहे. ७ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमुक्ती मिळाली आहे आणि अजुन पुढे येणाऱ्या यादीमध्ये इतर शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे. शेतकरी कर्जमुक्तीची जी सोपी आणि सुटसुटीत पद्धत वापरली आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे. आजपर्यंतची ही सर्वात सोपी कर्जमाफी असेल. मी म्हणत नाही की कुठेच अडचणी येत नसतील परंतु मागच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीचा घोळ, जाचक अटी व निकष, शेतकऱ्यांना झालेला त्रास बघता ही कर्जमुक्ती नक्कीच चांगली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षणात मराठी भाषा सक्तीची करणे, गिरणी कामगारांना म्हाडाच्या घरांची योजना देणे अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
 
मुख्यमंत्री झाल्यानंतरचे उद्धवजी बघता माझ्या मतात नक्कीच बदल झाला आहे. जर का हे सरकार ५ वर्ष चालले तर महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि राज्य पुन्हा प्रगतीपथावर येईल असं मला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे बघुन वाटत आहे.
असे किशोर मस्के नावाच्या तरूणाने सोशल मिडयावर आपले पत्र टाकून ठाकरे सरकारला एक प्रकारे प्रशस्ती पत्रच दिले आहे. मात्र याबाबत सरकारची कामगीरी विश्वासहार्ता असली तरी किशोर म्हस्के ह्याचा नेमका उद्देश काय हे मात्र आम्हाला प्रत्यक्षात समजलेला नाही. असे अनेक किशोर म्हस्के महाराष्ट्रात असतील आणि त्या सर्वांना या ठाकरे सरकारच्या १०० दिवसाच्या कालावधीतच समाधानाचे आणि आत्मविश्वासाचे दिवस पाहायला मिळत असतील तर आम्हाला दखल घेण्याशिवाय पर्यायच राहत नाही.