स्पेशल ट्रेनने शिवसैनिकांची आयोध्येकडे रवाना

जनदूत टिम    05-Mar-2020
Total Views |
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने १०० दिवसांचा टप्पा ओलांडला असून यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या ७ मार्चरोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील शिवसैनिकांनी राम जन्मभूमीकडे कूच केली आहे. राज्यभरातील शिवसैनिकांना घेऊन १८ डब्ब्यांची एक विशेष रेल्वेगाडी आज दुपारी मुंबईतील लोकमान्य टर्मिनसवरून आयोध्येकडे रवाना झाली असून ती उद्या सायंकाळी अयोध्येला पोहचेल. उद्धव ठाकरे यांच्या शनिवारच्या एकदिवसीय अयोध्या दौरा आटोपल्यानंतर शिवसैनिक लगेचच याच ट्रेनने परतणार आहेत.
 
shivsena_1  H x
 
अयोध्येला राहुल गांधी यांना सोबत घेउन जा अशी टीका भाजपाने केली होती. त्याला उत्तर देताना संजय राउत यांनी, ‘रामजन्मभूमीचा निकाल सर्वोच्च न्यायालयानेच दिला आहे. त्याचे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांनी स्वागतच केले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील आमच्या मित्रपक्षाच्या नेत्यांना देखील अयोध्येला सोबत येण्याचे आवाहन आम्ही करणार आहोत.’ असं उत्तर दिलं होतं.
 
अयोध्या यात्रा हा काही राजकीय प्रश्न नाही. जशी पंढरपूरची वारी असते तशीच ही वारी आहे. पंढरपूरच्या वारीत राजकारण, जात-पात काहीच नसते तशा प्रकारचीच ही अयोध्येची वारी असल्याचे राउत म्हणाले. हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. त्याचं कोणीही राजकारण करू नये. राजकीय दृष्टीनं याकडे पाहू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.