भिवंडी मनपा मुख्यालयाला समोरील वाहतूक कोंडी सोडविण्यात प्रशासन हतबल

जनदूत टिम    05-Mar-2020
Total Views |
भिवंडी : भिवंडी महापालिकेत सेवा सुविधांचा बोजवारा उडाला असून सध्या रस्त्यांच्या काँक्रेट कारणामुळे वाहतूक कोंडी, व धुळीच्या समस्येने भिवंडीकर अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. शहर विकास कामांमध्ये मनपा प्रशासनाचे कोणतेही नियोजन नसल्याने शहराची अक्षरशः वाताहात झाली आहे. भिवंडीत एमएमआरडीएच्या माध्यमातून सध्या रस्त्यांच्या काँक्रेटकरणाची कामे सुरू आहेत. मात्र नियोजन शून्य कारभारामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांची सुटका करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनासह भिवंडी मनपा प्रशासन पूर्णतः अपयशी ठरली आहे.
 
traffic_1  H x
 
भिवंडी बस स्थानक ते जकात नाका पर्यंतच्या रस्त्यावर सध्या काँक्रेट रस्त्याचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे या सुमारे १०० मीटरच्या अंतरावर भिवंडी न्यायालय, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस उपायुक्त कार्यालय , गुन्हे पोलीस विभाग, राशन कार्यालय, तालुका पोलीस ठाणे, एसीपी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, आमदार खासदार कार्यालय, सिनेमागृह, स्व.इंदिरागांधी शासकीय रुग्णालय व मुख्य म्हणजे भिवंडी मनपा मुख्यालय अशी सर्व कार्यालये या सुमारे १०० मीटरच्या परिसरात आहे. या सर्व शासकीय कार्यलयांमुळे या ठिकाणी शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध ठिकाणाहून नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. विशेष म्हणजे मनपा प्रशासनासह वाहतूक पोलीस विभागाला याची जाण असूनही रस्ता काँक्रेटकरण कामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यात हे दोन्ही विभाग अपयशी ठरले आहेत. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे शहरात इतर अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
 
मनपा मुख्यालया समोर सुरु असलेल्या रस्ता काँक्रेटकरण कामामुळे वाहतूक विभागाने ज्या पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली आहे ती मनपाच्या मुख्यालयाला मागच्या बाजूने वेढा घालून केली आहे. मात्र या रस्त्यावर रिक्षा चालकांचे थांबे व मंडई परिसरातून येणाऱ्या गाड्यांचे नियोजन नसल्याने मनपाच्या मुख्यालयासमोरच रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र यातून सुटका अथवा मार्ग काधनुयासाठी मनपा प्रशासन कोणतेही प्रयत्न करत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.