आपल्या शौर्याने ब्रिटिशांना घाम फोडणारी, एक विस्मृतीत गेलेली वीरांगना- महाराणी अवंतीबाई

जनदूत टिम    04-Mar-2020
Total Views |

आपल्या शौर्याने ब्रिटिशांना घाम फोडणारी, एक विस्मृतीत गेलेली वीरांगना- महाराणी अवंतीबाई

१८५७ च्या उठावात सामर्थ्य गाजवणाऱ्या झाशीच्या राणीची कथा आपल्याला सर्वाना माहिती आहे, पण झाशीच्या राणीच्या बरोबरीने एक अजून शूर महिला लढली होती, जिचा इतिहास आज फारसा कोणाला परिचित नाही. पण तिच्या कर्तृत्वाने इंग्रजांना घाम फोडण्यात ती यशस्वी झाली होती. ती वीरांगना होती महाराणी अवंतीबाई लोधी. ब्रिटिश राजवटीशी अवंतीबाईंनी केलेला संघर्ष, त्यात त्यांना आलेलं वीरमरण याचा सर्व इतिहास अंगावर काटा आणणारा आहे. अवंतीबाईंचा जन्म १६ ऑगस्ट १८३१ ला एका जमीनदार कुटुंबात झाला. त्या बालपणापासूनच स्वतंत्र आणि शूर होत्या. त्यांना सर्वप्रकारचे प्रशिक्षण मिळाले होते. त्या राजकीय मुत्सुद्देगिरीपासून ते लष्करी प्रशिक्षणापर्यंत सर्व गोष्टींशी अवगत होत्या. तलवारबाजी आणि घोडेस्वारीमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलं होतं.
 
avantibai_1  H
 
त्यांच्यात असलेल्या राजकीय चातुर्यामुळे व लढाऊ बाण्यामुळे एक साम्राज्ञी होण्यासाठी त्या संपूर्णपणे योग्य होत्या. त्यांच्या या वीरतेचे आणि सुंदरतेचे चर्चे संपूर्ण नर्मदा खोऱ्यात होते. यामुळे सण १८४९ साली त्यांचा विवाह मध्य प्रदेश मधील रामगडचे महाराज विक्रमादित्य लोधी यांच्यासोबत झाला. परंतु, काहीकाळातच विक्रमादित्य महाराजांची प्रकृती खालावली आणि ते अंथरुणाला खिळले. या काळात अवंतीबाई राज्यकारभाराचा गाडा व्यवस्थितपणे चालवत होत्या. त्या नवऱ्याची सुश्रुषा करत होत्या आणि राज्यकारभारही चालवत होत्या, पण ब्रिटिश राज्यकर्त्यांना ते मंजूर नव्हतं. त्यांच्यामते अवंतीबाईंनी राज्यकारभार चालवणे कायद्याला धरून नव्हतं. दुर्दैवाने राजा विक्रमादित्य यांनी ब्रिटिशांशी तैनाती फौजेचा करार केल्यामुळे, त्यांच्या राज्यात ब्रिटिश आमदानीचा कायदा लागू होता, ज्यानुसार जर राज्याचा शासक हा अल्पवयीन असेल अथवा तो राज्यकारभार करण्यायोग्य नसेल तर त्या राज्याची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली घेतली जाईल.
 
लॉर्ड डलहौसी या ब्रिटिश अधिकाऱ्याने हा करार भारतातील अनेक संस्थानिकांच्या गळी उतरवून अनेक संस्थानांचा आणि राजवटींचा नाश करून, ब्रिटिशांचा अधिपत्याखाली घेतले होते. अवंतीबाईंनी आपल्या शेरसिंह आणि अमनसिंह या दोन पुत्रांना गादीचा वारस म्हणून घोषित केले, परंतु ते अल्पवयीन असल्याचे कारण देऊन ब्रिटिशांनी त्यांच्या दाव्याला नकार दिला. ब्रिटिशांनी लोधी साम्राज्याच्या जागी आपली राजवट प्रस्थापित केली. त्यांनी शेख मेहमूद नामक अधिकाऱ्याची रामगडचा प्रभारी म्हणून नेमणूक केली. हे अवंतीबाईंना रुचले नाही. शेख मेहमूदने रामगडच्या प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. हे बघून अवंतीबाईंनी याविरोधात आवाज मजबूत करायाला सुरुवात केली. १३ सप्टेंबर १८५७ साली अवंतीबाईंचा नवऱ्याचे निधन झाले आणि संधी साधून त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात बंड करण्याची तयारी सुरु केली.
 
त्यांनी अखेरीस बंड पुकारून शेख मेहमूदच्या तावडीतून रामगडची मुक्तता केली. १८५७ च्या मे महिन्यापर्यंत बंडाचा वणवा हा मीरत आणि दिल्लीपासून देशभरात पसरायला सुरुवात झाली. काडतूस बनवण्यात केलेला डुकराच्या आणि गाईच्या चरबीचा वापर याने मंगल पांडे यांच्या नेतृत्वात एका मोठा जनांदोलनाला चालना दिली. पुढे यातूनच १८५७ चा उठाव आकारास येऊ लागला. या संपूर्ण लढ्यात अवंतीबाई मागे नव्हत्या, त्यांनी देखील १८५७ च्या उठवात मोठ्या हिरीरीने सहभाग नोंदवला. त्यांनी बांगड्या आणि पत्र पाठवून आजूबाजूच्या राजवटींना या उठावात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केलं. जर आपल्या राष्ट्राचा अभिमान बाळगत असाल आणि स्वातंत्र्याची चाड असेल तर मोठ्या संख्येने या ब्रिटीशशाही विरोधात एकत्र या आणि बंडाचे निशाण फडकवा, असे आवाहन अवंतीबाईंनी केले. ब्रिटिशांना या बंडाळीची माहिती मिळाली आणि त्यांनी महाराजा शंकर सिंहाचा शिरच्छेद केला. यामुळे प्रदेशात एकच असंतोष पसरला आणि सर्व लोकांनी ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. लोकांनी अवंतीबाईंना लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी आग्रह धरला. अवंतीबाईंनी लोकांच्या विनंतीला मान देऊन नेतृत्व आपल्या हाती घेतलं.
 
अवंतीबाईंनी तब्बल चार हजार सैन्य उभारलं आणि लढायची तयारी केली. अवंतीबाईंनी आपलं सैन्य मंडलाजवळच्या खेरी या गावी एकत्र केले. ब्रिटिशांना या युद्धात सहज विजय अपेक्षित होता पण त्यांचा अत्यंत दारुण पराभव अवंतीबाईंच्या सैन्याने केला. इतकंच काय तर डिसेंबर १८५७ ते फेब्रुवारी १८५८ या तीन महिन्याचा काळात तिने मंडलावर राज्य केले. ब्रिटिशांची गच्छंती करण्यात आली होती. पुढे जाऊन ब्रिटिशांनी याविरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली. ब्रिटिशांनी एक मोठी कवायती फौज घेऊन रामगडवर आक्रमण केले. त्यांनी अत्यंत क्रूरपणे रामगडच्या लोकांना व सैन्याला चिरडून टाकले. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार करायला सुरवात करायला सुरुवात केली की अवंतीबाईंनी देवहरीगडाच्या डोंगर दऱ्यामध्ये आपल्या सैन्याला घेऊन आसरा घेतला. त्या परिस्थितीही अवंतीबाईंनी हार पत्करली नाही, त्यांनी आपला संघर्ष चालूच ठेवला. त्यांनी शिवरायांची प्रेरणा घेऊन गनिमी काव्याच्या पद्धतीने ब्रिटिश जनरल वेडिंग्टनचा कॅम्प उध्वस्त केला होता. पण त्यांच्या लहान- मोठ्या कारवायांनी ब्रिटिशांचं फार काही नुकसान झालं नाही. ब्रिटिशांनी अवंतीबाईंच्या फौजेला चारी बाजूने घेरले. आता अवंतीबाईंच्यासमोर दोनच पर्याय उपलब्ध होते. एकतर शरणागती, दुसरं होतं आत्मदहन, परंतु अवंतीबाईंनी शेवटपर्यंत शरणागती पत्करली नाही. त्यांनी स्वतःची तलवार पोटात घालून प्राणत्याग केला. मरताना त्यांच्या तोंडी शेवटचे शब्द होते,
  
‘हमारी दुर्गावती ने जीते जी वैरी के हाथ से अंग न छुए जाने का प्रण लिया था. इसे न भूलना बडों’
 
दुर्दैवाने अवंतीबाईंच्या या शौर्याचा व बलिदानाचा विसर भारत सरकारला पडला, त्यांना इतिहासाच्या पुस्तकात स्थान मिळायला २०१५ साल उजाडावं लागलं. आज अवंतीबाईंच्या स्मरणार्थ नर्मदा नदीवर एका धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे.