भिवंडी पंचायत समितीत सेना - भाजपची छुपी युती घेणार मनसेचा बळी

जनदूत टिम    04-Mar-2020
Total Views |

भिवंडी पंचायत समितीत सेना -
भाजपची छुपी युती घेणार मनसेचा बळी

जनदूत टिम
भिवंडी : सेना भाजपची युती तुटल्याने राज्यात अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली असून अनेक ठिकाणी राजकीय उलथापालथ झाली आहे. विशेष म्हणजे युती तुटल्याने बहुसंख्ये ठिकाणी सेना व भाजपलाच त्याचा फटका बसला आहे. मात्र भिवंडी पंचायत समिती युती तुटण्याला अपवाद ठरली असून शिवसेना भाजपच्या छुप्या युतीमुळे भिवंडी पंचायत समितीत मनसेचा बळी जाणार असून मनसेला आपल्या उपसभापती पदावर पाणि सोडावे लागणार आहे. सेना भाजपच्या या छुप्या युतीमुळे मनसे गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र सेना भाजपच्या झालेल्या छुप्या युतीपुढे मनसेला नांगी टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. एकीकडे राज्यात सेना भाजपची युती तुटून महाआघाडीची सत्ता स्थापन झाली आहे तर दुसरीकडे भिवंडी पंचायत समितीत उपसभापती व पुढे सभापती पद मिळविण्यासाठी सेना भाजपने आपसी समझोता केला असून सेनेने भाजप प्रेमा खातर पंचायत समितीत आपल्या सोबत असलेल्या मनसे या मित्रपक्षाचाच राजकीय बळी दिला आहे.
 
Bhiwandi Panchayat Samiti
भिवंडी पंचायत समितीवर सध्या भाजपची सत्ता असून भाजपच्या रविना जाधव या सभापती आहेत तर मनसेच्या वृषाली विशे या उपसभापती आहेत. सेना भाजपच्या सम समान मतसंख्येमुळे त्यावेळी चिट्ठी उडवून हि सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली होती.भिवंडी पंचायत समितीत एकूण ४२ सदस्य असून त्यापैकी भाजप १९, शिवसेना १९, काँग्रेस २, मनसे १, राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल होते. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपला एकेकी पाडण्यासाठी भिवंडी पंचायत समितीत महाआघाडीच्या फॉर्म्युला दोन वर्षांपूर्वीच भिवंडी पंचायत समितीच्या निवडणुकीत अस्तित्वात आला होता. मात्र सभापती निवडणुकीत काँग्रेसच्या दोन सदस्यांना आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश आल्याने भाजप २१ सदस्य संख्येवर पोचला होता. राष्ट्रवादीचा एक आणि मनसेचा एक अशा दोन्ही सभासदांना देखिल भाजपने आपल्या गोटात खेचण्याचा त्यावेळी जोरदार प्रयत्न केला होता मात्र मनसे आणि राष्ट्रवादीने महायुती धर्म पाळला व सेनेला साथ दिली.
 
मात्र आता अडीच वर्षांची मुदत संपायला सुमारे तीन चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असतांना सेनेने भाजपच्या प्रेमा खातर मित्रपक्ष असलेल्या मनसेवर दबाव टाकून उपसभापती पदाचा राजीनामा देण्याचा गळ घातला आहे. राजीनामा द्या अन्यथा अविश्वास ठराव आणू असा दमच सेनेने मनसेला दिला आहे . सेनेच्या या दबावामुळे मनसे हतबल झाली असून उपसभापती असलेल्या वृषाली विषे यांनी आपला राजीनामा सभापतींकडे सोपवला आहे. त्यामुळे भिवंडी पंचायत समितीत भाजप प्रेमासाठी सेनेने भाजपशी छुपी युती समोर आली असून या छुप्या युतीने मनसेचा बळी जाणार हे मात्र नक्कीच. विशेष म्हणजे मनसेच्या या राजीनाम्यानंतर भिवंडी पंचायत समितीत उरलेल्या अडीच वर्षांच्या काळात सव्वा वर्ष भाजप आणि सव्वा वर्ष सेना अशी सत्ता थापन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
 
'' दरम्यान सेनेच्या वाढत्या दबावामुळे आपण आपला उपसभापती पदाचा राजीनामा सोमवारी सभापतींकडे दिला आहे मात्र ८ मार्च रोजी असलेल्या जगातील महिला दिनाच्या कार्यक्रमांमुळे आपण राजीनाम्यावर ९ मार्चची तारीख दिली असून ९ मार्च रोजी महिला दिन कार्यक्रम झाल्या नंतर माझा राजीमाना स्वीकारण्यात येणार आहे '' अशी माहिती भिवंडी पंचायत समितीच्या उपसभापती वृषाली विशे यांनी दिली आहे.