देशात एकाच दिवशी आढळले १३० नवीन रुग्ण

जनदूत टिम    31-Mar-2020
Total Views |
नवी दिल्ली : भारतात 'कोविड १९' पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत रविवारी एकाच दिवशी लक्षणीय वाढ दिसून आलीय. देशातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं १००० चा आकडा ओलांडलाय. रविवारी २९ मार्च रोजी देशात एकाच दिवशी १३० नवीन रुग्ण आढळलीय. त्यामुळे चिंतेत भर पडलीय. रविवारी आढळलेल्या १३० रुग्णांपैंकी तब्बल २३ जण राजधानी दिल्लीत आढळले. तर महाराष्ट्रात रविवारी एकाच दिवशी दोन जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले.
 
cORONA 012_1  H
 
उल्लेखनीय म्हणजे, दिल्लीत एकाच दिवशी करोनाबाधित रुग्णांची दोन अंकी संख्या गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्याच्या अधिकाऱ्यांनीही यावर चिंता व्यक्त केलीय. राष्ट्रीय स्तरावर एकाच दिवशी १०० हून अधिक रुग्ण सापडण्याची ही तिसरी वेळ आहे. करोना व्हायरस देशात तेजीनं फैलावत चालला असल्याचं हे लक्षण आहे. सोमवारी सकाळपर्यंत देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ११२२ वर पोहचलीय. यातील ३० जणांचा मृत्यू करोनामुळे झालाय.
 
महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर कोविड १९ पीडितांची संख्या २०३ वर गेलीय. रविवारी झालेल्या दोन मृत्यूंमुळे आता एकूण बळींची संख्या ८ वर गेलीय. प्राण गमावणाऱ्यामध्ये पश्चिम मुंबईत राहणाऱ्या एका टॅक्सी ड्रायव्हरची पत्नी आणि बुलडाण्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. दोघंही वयाच्या चाळीशीत होते. परंतु, उल्लेखनीय म्हणजे या दोघांनीही कोणतीही परदेश यात्रा केली नव्हती.
 
करोना प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्रानंतर क्रमांक लागतो तो केरळचा. इथं २०२ करोनाबाधित रुग्ण आढळलेत तर एकाचा मृत्यू झालाय. गुजरातमध्ये कोविड १९ चे ५८ प्रकरणं आढळलीत तर पाच मृत्यू झाले आहेत. रविवारी ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हा राज्यातील पाचवा मृत्यू ठरला. उत्तर प्रदेशात रववारी एकाच दिवशी १९ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील आकडा ८० वर पोहचलाय. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात मेरठ आणि नोएडा करोनाचं केंद्र बनत चाललंय. परंतु, अजूनही करोनाचा सामाजिकरित्या फैलाव झाल्याची प्रकरणं दिसलेली नाहीत.