केंद्र सरकारने राज्यातील व देशातील पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा करावी: राम कुलकर्णी

जनदूत टिम    28-Mar-2020
Total Views |
अंबाजोगाई : जगाच्या पाठीवर कोरोना या महामारीने धुमाकुळ घातला असताना या संपुर्ण परिस्थितीत प्रसारमाध्यमाची भूमिका महत्त्वाची आहे.राज्यात करोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिडीया व प्रिंट मिडीयाचे पत्रकार गल्लोगल्ली फिरून वार्तांकन करत आहेत. जनतेच्या भल्यासाठी व राष्ट्राच्या हितासाठी आपले संसार आणि कुटुंब बाजूला ठेवून पत्रकारांची भूमिका जनजागरणासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे.मात्र त्यांना कुठलाही आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार आणि केंद्र सरकारने राज्यातील एवढेच नव्हे तर देशातील पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तथा भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
 
Ram Kulkarni_1  
 
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून जनतेच्या मनात प्रचंड दहशत पसरलेली आहे.केंद्र आणि राज्य सरकार प्रशासनाच्या मदतीने उपाययोजना करत असले तरी या सर्व परिस्थितीत मिडीयाची भूमिका महत्वाची आहे. राज्यातील ईलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी व प्रिंट मिडीयाचे प्रतिनिधी शहरी आणि ग्रामिण भागात स्वतःचे जीव धोक्यात घालून जनतेला घरात बसविण्यासाठी जनजागरण करत आहेत.एवढेच नव्हे तर प्रशासन आणि जनता यांच्या दुवा म्हणून काम करताना त्यांची भूमिका महत्वाची वाटते. आश्‍चर्य म्हणजे ईलेक्ट्रॉनिक मिडीयाचे सर्व प्रतिनिधी वेगवेगळ्या वाहिन्यांचे संपुर्ण राज्यात जिथे कोणी जात नाही.तिथे हे प्रतिनिधी जावून वास्तव चित्रीकरण जनतेसमोर मांडत आहेत.कोरोना हा साथरोग जीवघेणा आहे.
 
हे माहित असताना ही स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस अनेक पत्रकार रस्त्यांवर फिरून आपली भूमिका निभावत आहेत.वास्तविक पाहता पत्रकारांना किंवा ईलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर पगार नसतो.या उलट प्रिंट मिडीयाचे पत्रकार यांना तर कुठल्याही प्रकारचे मानधन ही नसते.मात्र समाज आणि राज्य व राष्ट्रहितासाठी हे पत्रकार बंधु अहोरात्र परिश्रम घेताना दिसत आहेत.कुठल्याही आर्थिक प्रकारचे पाठबळ नसल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ वर्तमान परिस्थिती निश्‍चित आहे.केंद्र सरकारने या संकटाच्या काळात सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली आहे. ही बाब स्वागतर्ह असली तरी राज्य सरकाने महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बंधुंना ईलेक्ट्रॉनिक मिडीया व माध्यमाचे संपादक यांच्यासाठी एवढेच नव्हे तर वर्तमानपत्र विक्रेते,वाटप करणारे कामगार आदी विविध प्रसारमाध्यमांत काम करणार्‍या कामगारांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहिर करून देण्याची मागणी राम कुलकर्णी यांनी केली आहे.जर पत्रकारांना अशा परिस्थितीत आर्थिक मदत मिळाली.तर पञकारांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी जमेची बाजू राहिल असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.