गुढीपाडव्यात दागिन्यांमध्ये नथीला पसंती महिला वर्गामध्ये अधिकच

जनदूत टिम    25-Mar-2020
Total Views |
गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. सणांचे औचित्य साधून महिला नेहमीच खरेदी करत असतात. खरेदी असते ती कपडे, दागिने आणि घरात आवश्यक असणाऱ्या इतर वस्तूंची. पण यात जास्त खरेदी असते ती साड्यांची आणि दागिन्यांची. यंदा दागिन्यांमध्ये नथीला पसंती महिला वर्गामध्ये अधिकच वधारली आहे. पाडव्याला पारंपरिक पद्धतीने तयार व्हायचे असेल, तर नाकात नथ ही हवीच! मग साडी असो वा कुर्ता, नाकातील नथीमुळे शोभायात्रांचीही शोभा वाढते, असे समीकरणच
बनले आहे.

nath_1  H x W:  
 
महाराष्ट्रीयन स्त्रीचा साज नथीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नथ हा नासिकाभूषणातील एक महत्त्वाचा प्रकार असून हिंदू स्त्रियांत तो सौभाग्यालंकार म्हणूनच रूढ झाला आहे. सवाष्णीचे लेणे म्हणून मान्यता पावलेली नथ, तिच्या आगळ्या नजाकतीसाठी अजूनही प्रसिद्ध आहे. आज गिरगाव, लालबाग-परळ, ठाणे, डोंबिवली परिसरात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा निघणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या बहुतांश मुलींनी नखरेल नथीचा साज धारण केलेला आज सर्वत्र नक्कीच पाहायला मिळेल. काळाबरोबर नथही आता बदलली आहे. तिच्या डिझाइन्सही बदलल्या असून सध्या पारंपरिक नथीसोबत मॉर्डन लुकच्या नथ बाजारात उपलब्ध आहेत.
 
पेशवाई नथ, डायमंड नथ, रुक्मिणी नथ, पारंपरिक नथ असे नानाविध नथीचे पर्याय उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे, तर 'जय मल्हार' टीव्ही मालिकेतील बानु घालत असलेल्या नथीची स्त्रियांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. बारीक समान आकारातले डाळिंबी रंगाचे खडे आणि मोती असलेली ही नाजूक नथ हटके लूक देते. यामध्ये माशाच्या आकारातील नथही उपलब्ध आहे. या अशा इमिटेशन नथीची किंमत पन्नास रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत आहे. सोन्याची नथ ३ हजार रुपयांच्या घरात आहे. आजकालच्या तरुणी फॅशनमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. इंडो-वेस्टर्न लुकही त्यातीलच एक प्रकार. साडीच्या किंवा चोळीच्या कापडातील ड्रेस, गाऊन किंवा टॉप-स्कर्ट शिवून त्यावर नथ आणि चंद्रकोर लावल्यास तुमच्या लुकची चर्चा न झाली तरच नवल!