गुढीपाडवा : सूर्योपासनेला या दिवशी महत्त्वाचे स्थान दिले जाते

जनदूत टिम    25-Mar-2020
Total Views |
महाराष्ट्रात सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. त्यातलाच एक म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणारा गुढीपाडवा. हिंदू परंपरेनुसार चैत्र महिना हा नव्या वर्षाचा प्रारंभ मानला जातो. या महिन्याची पहिली तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा ही वर्ष प्रतिपदा मानली जाते. ‘प्रतिपदा’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषेत ‘पाडवा’ हा शब्द रूढ झाला. वसंत ऋतूचे आगमन आणि नववर्षाची सुरुवात म्हणून चैत्र पाडवा साजरा होतो. याच दिवशी राजा सातकर्णी विजयी झाला. आनंदाच्या प्रीत्यर्थ जनतेने गुढ्या, तोरणे उभारली. तेव्हापासून हीच परंपरा रुजल्याने गुढीपाडवा संबोधले जाते. गुढीला ‘ब्रह्मध्वज’सुद्धा म्हणतात. या सणाची सुरुवात होण्यासाठी अनेक पौराणिक व ऐतिहासिक दाखले मिळतात. त्यांपैकी चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी अनेक घटनांना प्रारंभ झाला. प्रभू श्रीरामांचा राज्यभिषेक याच दिवशी करण्यात आला.

gudi_1  H x W:  
 
युगाब्ध संवत्सर/शकेचा प्रथम दिवस ५११७ वर्षे अगोदर युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला. विक्रम संवत्सर/शकेचा प्रथम दिवस १९३७ वर्षे अगोदर शालिवाहन राजाने दक्षिण भारतामध्ये राज्य स्थापन केले. नवरात्र स्थापना- शक्ती व भक्तीचे नऊ दिवस. त्यातीलच नवरात्र स्थापनेचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस होय. म्हणूनच रामनवमीच्या अगोदर हा सण साजरा करतात. शकांनी हुणांचा पराभव केला. तेव्हापासून शालिवाहन शक सुरू झाले. शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला तो पाडव्याचाच दिवस होता. मराठ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू साम्राज्याची स्थापना केली. विजयी पताका लावून गुढी उभारण्यात आली. असे अनेक दाखले आपणास मिळतात. तेव्हापासून व्यक्तिगत आणि धार्मिक कार्याच्या प्रसंगी शुभवार्ता घोषित करण्यासाठी लोक गुढी उभारू लागले. गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांतील एक मानला जातो. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. सर्व सृष्टी अवलंबून असणाऱ्या सूर्यदेवाची उपासना केली जाते. सूर्योपासनेला या दिवशी महत्त्वाचे स्थान दिले जाते. खगोलशास्त्राच्या अभ्यासानुसार सर्व खगोल आणि सर्व नक्षत्र या दिवशी सुस्थितीत असतात. संपूर्ण दिवस शुभ असतो. या दिवशी कोणतेही काम करताना वेळ पहावी लागत नाही. यातूनच वैदिक शास्त्रानुसार पंचांग आणि दिनदर्शिकेची सुरुवात झाली.
ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याचे भौगोलिक महत्त्वही आहे. वसंत ऋतूची सुरुवात इथूनच होते. पाडव्याच्या आसपास सूर्य हा वसंत संपातावर येतो. (संपात बिंदू म्हणजे क्रांतिवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परास छेदतात तो बिंदू म्हणजे संपात बिंदू होय.) सर्व ऋतूंच्यामध्ये कुसुमाकारी असणारा ऋतू म्हणजे वसंत ऋतू होय. वसंताच्या आगमनामुळे हवामान समशीतोष्ण व उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने गळतात तर वसंत ऋतूत नवीन पालवी येते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
 
हा दिवस अतिशय शुभ आणि उत्तम असल्यामुळे लोक नवीन शुभकार्यांना सुरुवात करतात. नवीन संकल्पाला सुरवात केली जाते. नवीन वास्तू प्रवेश, नवीन बांधकामाची सुरवात, नवीन गाडी आणि इतर काही नवीन वस्तूंमुळे सर्वजण आनंदात असतात.
नवीन पालवी येते, त्यामुळे वातावरण चैतन्यमय होते. यातूनच पर्यावरणाशी संबंध घालून देणारा हा सण कडू लिंबाची आठवण करून देतो. एरव्ही लिंबाची पाने कडू वाटतात. पण, या दिवशी लिंबाचा प्रसाद सर्वांना आवर्जून दिला जातो. सदृढ आयुष्यासाठी आवश्यक असलेला कडूलिंब त्या दिवशी सर्वांच्या शरीरात जातो. सर्वांत औषधी कडूलिंबाचे महत्त्व या सणामुळे आपल्याला समजते.
 
गुढीपाडवा म्हणजेच नववर्ष प्रतिपदा. याचे स्वागत महाराष्ट्रामध्ये जल्लोषात केले जाते. सूर्योदयापूर्वी उंच अशी बांबूची काठी स्वच्छ केली जाते. गुढीच्या टोकावर लिंबाच्या डहाळ्या, साखरेच्या माळा, फुलांच्या माळा, नवे कापड ठेवून त्यावर तांब्या किंवा पेला उपडी घालून गुढीची काठी सजवली जाते. गुढीची यथार्थ पूजा केली जाते.
भव्य रंगबिरंगी रांगोळ्या, गुढीभोवती दरवळणारी धूप-उदबत्तीचा वास, जवळच लावलेली समई, आरती असे मंगलमय वातावरण होऊन जाते. घरामध्ये गृहिणींची पुरण-पोळ्या, बासुंदी, श्रीखंड आणि इतर गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. यामध्ये लहान-मोठे, स्त्री-पुरुष सर्वजण अगदी आनंदाने नवनवीन कपडे, नवीन विचार, नवीन संकल्प, नवीन गोष्टी हे सर्वांचा आस्वाद तर घेतातच. शिवाय सर्वजण अगदी जल्लोषात नववर्षाचे स्वागत करतात. पूजा-आर्चा करतात आणि देवाला प्रार्थना करतात. या आनंदाच्या क्षणी सुख-समृद्धीची, उत्तम आरोग्याची सर्वजण प्रार्थना करतात. म्हणूनच आपण त्याचे स्वागत जल्लोषात करू या. यादिवशी आपण गुढ्या-तोरणे उभारू या आणि नववर्षाच्या दिवशी सुख-समृद्धी, उदंड आरोग्य, ऐश्वर्य लाभावे यासाठी प्रार्थना करू या. आपल्या सर्वांना नवीन वर्ष सुखा-समाधानाचे जावो यासाठी हार्दिक शुभेच्छा!