गुढी पाडवा, आनंद गगनात मावेना

जनदूत टिम    25-Mar-2020
Total Views |
रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे. कारण कडुनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत (आंबट, तुरट, तिखट यासारखा) याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.
 
gudi-padwa1_1  
 
वर्षाच्या सुरवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असे तर ही प्रथा सांगत नसेल? कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात. कारण उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचारोगापासून बचाव करण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे. मुलांनाही इळवणी घालतात. म्हणजे उन्हात पाणी ठेवून त्या पाण्याने मुलांना अंघोळी घालतात याचाच अर्थ लहानथोरांच्या जीवन शैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचाच मार्ग या परंपरेत आहे.
 
संक्रांतीला थंडी म्हणून गूळ-पोळी शीतल-शिमग्याला तान्हा मुलांना मुलींना पातळ पाढऱ्या रंगाची झबली केशराच्या रंगाच्या (किंवा कुंकवाच्या पाण्यांचे शिंतोडे) शिंतोंड्यांनी भिजवून देतात हार-कडे देतात मुलांनी द्राक्षाचे दागिने घालतात (तसे संक्रांतीला हलव्याचे करतात) कारण याच काळात द्राक्षे येण्यास सुरवात होते.
 
चैत्रात कैरीचे पन्हे (कैऱ्या तेव्हाच होतात) श्रावणात फुलांची आरासींनी मंगळागौर सजवतात. या अन् अशा अनेक सणात मोसमी फळे, फुले येतातच. दिवाळीत झेंडूच्या फुलांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते तर गुढीपाडव्याला आंब्याला कोवळी पालवी फुटते, त्यामुळे घरादारावर आंब्याच्या पोपटी पानांचे तोरण खुलते.चैत्रातही झेंडू फुलतो. त्याचाही उपयोग घराच्या सुशोभनासाठी केला जातो. आपण जसे १५ ऑगस्टला आपला स्वांतत्र्यादिवस उत्साहात साजरा करतो तसाच हा नववर्षाचा पहिला दिवस गुढीरूपी झेंडा आकाशात दिमाखाने फडकवत प्रत्येक घर साजरा करते. १ जानेवारी आळसात उजाडतो (३१ डिसेंबरचा अमल असतो ना !) नवीन वर्षाचे अत्रुप असतं. पण हा तर आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा! प्रत्येक घरातील लहानथोरांनी नटूनथटून अलंकाराने सुशो‍भित होऊन गुढ्या उभारायचा दिवस, गोडधोडाचा दिवस, पंचांग पुजेचा दिवस, संवत्सर फल वाचनाचा दिवस, नवीन खरेदीचा दिवस, अन् सजलेल्या सालंकृत गृहलक्ष्मी बरोबरच चैत्रपालवीने नटलेल्या या धरतीच्या वसंतआगमनाच्या उत्साहाचा दिवस आपण ही दिमाखात साजरा करूया.