लोक लॉकडाऊनला अजूनही गांभीर्याने घेत नाहीत : पंतप्रधान

जनदूत टिम    23-Mar-2020
Total Views |

स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, असा दम मुख्यमंत्र्यांनी भरला

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्ये लॉकडाऊन झाले आहेत. परंतु जमावबंदी असूनही लोक रस्त्यावर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक लोक लॉकडाऊनला अद्यापही गांभीर्याने घेत नसल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. तर स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, असा दम मुख्यमंत्र्यांनी भरला आहे.

Modi012_1  H x
 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केला. देशभरातील जनता कर्फ्यू हटल्यानंतर मुंबईकर रस्त्यावर उतरलेले दिसले. सकाळी 9 वाजच्या सुमारास मुंलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मात्र, गर्दी कमी करण्यासाठी टोल नाक्यावरुन वाहनांना मुंबईच्या दिशेनं तात्काळ सोडण्यात आलं. असंच चित्र देशात अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी घरा बाहेर न पडण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातं आहे. मात्र, याचं पालन होताना दिसत नाही. त्यामुळे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त करत नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. गर्दी टाळा, प्रवास टाळा सांगूनही लोक गाड्या घेऊन बाहेर आल्याने सरकार आता कडक पावलं उचलणार का? जमावबंदी आदेश न पाळण्यावर सरकार कारवाई करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव आपल्याला आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. लोक ऐकत नसल्याने संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “परिस्थिती गंभीर आहे. करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८९ झाली आहे. लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. मी स्वतः फिरून हा अनूभव घेतला. लोक ऐकत नाहीत. उद्धव ठाकरेजी संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे.
 
लॉकडाऊनबाबत लोक अजूनही गंभीर नाहीत : पंतप्रधान
अनेक लोक लॉकडाऊनला अजूनही गांभीर्याने घेत नाहीत. कृपया करुन स्वत:ला वाचवा, तुमच्या कुटुंबाला वाचवा, आदेशांचं गांभीर्याने पालन करा. राज्य सरकारांना माझी सूचना आहे की त्यांनी नियम आणि कायदा पाळायला भाग पाडावं," असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
 
कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या, कायदा मोडू नका : मुख्यमंत्री
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोकांना गर्दी करुन कायदा मोडू नका, असं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, "कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका.