कोरोनाला दूर करू या! राष्ट्रहित जपु या! - सुभाष गोटीराम पवार

जनदूत टिम    23-Mar-2020
Total Views |
मुरबाड : सर्व सरपंच,ग्रामसेवक,व गाव,पाडे, वाड्यामधील राजकीय,सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की,सध्या सर्वत्र जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर सर्वोत्तरी प्रयत्न केले जात आहेत, देशातील व राज्यातील प्रमुख शहरे,व सार्वजनिक ठिकाणांतुन कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रतिबंधांत्मक उपाय योजना करीत आहे आणि नागरिकही तशाप्रकारे सहकार्य करीत आहेत. आपण सारे ग्रामीण भागांत राहतो आपलीही काळजी सरकार घेत आहे,पण त्यासाठी आपलेही सहकार्य तितकेच आवश्यक आहे,की ज्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टळू शकतो म्हणून आपणही खालील सूचनांचे स्वतःहुन पालन करावे,ही विनंती.
 
Subhash Pawar_1 &nbs
 
दि. ३१ मार्चपर्यंत कोणीही घराबाहेर,गावा बाहेर पडू नये. लग्न कार्य,हळदी समारंभ, रद्द करावेत किंवा कौटुंबिक साध्या पद्धतीने कमीत कमी लोकांच्या उपस्थित करावेत,जास्त लोकांनी जाऊ नये. अंत्यसंस्कार व उत्तरकार्य कमीत कमी नातेवाईकामध्ये करावेत. अतिशय महत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे. गावातील फार्म हाऊसवर बाहेर गावातील व्यक्ती व अनोळखी व्यक्ती येऊन राहिली असल्यास त्याची माहिती सरपंच, ग्रामसेवक,पोलीस पाटील यांनी तात्काळ पोलीसस्टेशन व जवळच्या आरोग्यविभागास अथवा तहसील कार्यालयास द्यावी. आपल्या गावात आता ७/८ दिवसांपूर्वी आलेल्या अनोळखी व्यक्तीस राहू देऊ नये,त्याची माहीती सरकारी यंत्रणेस द्यावी. कोरोना विषयी विनाकारण अफवा पसरवू नये,सावधगिरी बाळगावी व विनाकारण घाबरून जाऊ नये. आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावे,बाहेर निघाल्यावर मास्क व रुमालचा वापर करावा घरी परत आल्यावर हँडवॉश किंवा साबणाने हात पाय स्वच्छ धुवावेत,आवश्यक तेव्हा सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोना बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयास आपण सर्वांनी गावातील नागरिकांनी व राजकीय,सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य करावे. या भयानक काळात आपण तालुक्याच्या ठिकाणी विनाकारण येऊ नये,आपल्या घरीच थांबून कुटुंबाची काळजी घ्यावी. 31 मार्च पर्यंत अथवा कोरोना विषाणू साथ अटोक्यात येईपर्यंत सरकार कडून ज्या ज्या सूचना व संदेश येतील त्या नियमांचे योग्य प्रकारे पालन करावे. किमान 31 मार्च पर्यन्त घरातच थांबा,आपले मोबाईल चालू ठेवा व एकमेकांच्या सपंर्कात रहा. ३१ मार्च नंतर आपली प्रलंबित कामे पूर्ण करूयात.
 
अनोळखी व अपरिचित व्यक्तीस आपल्या गावात फिरकू देऊ नका. गाव,पाडे,वाड्या वस्त्या मधील कार्यकर्ते मोबाईलद्वारे एकमेकांच्या सपंर्कात रहा. सामाजिक सुरक्षितता व देशसेवा/राष्ट्रहित ही आपली जबाबदारी आहे म्हणून आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी,घरातील लहान मुलं,आजारी माणंस व वयोवृद्ध माणसांचीही काळजी घ्यावी. या काळात कामाचा ताण बाजुला ठेवुन काही काळ आपण सर्वानी कोरोना बाबत काळजी घेऊ या, आपणही एकमेकांना भेटू नये.महत्वाचे काम असेल तर मोबाईल वर एकमेकांशी सपंर्कात नक्कीच राहू.
 
देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी साहेबानी कोरोना पासून बचाव करण्याविषयी देशातील सर्व नागरिकांना अनमोल संदेश दिला आहे हे आपण सारे जाणत आहातच त्याचे पालन करावे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब , उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब आणि आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे साहेब,पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब हे कोरोना विषाणू समूळ नष्ट करण्यासाठी व महाराष्ट्रावर आणि देशावर आलेलं हे संकट दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत,त्याचा आपणा सर्वांनाच अभिमान आहे.मी आपणा सर्वांपर्यंत पोहचू शकत नाही म्हणूनच मी याद्वारे सर्वांना आवाहन करीत आहे,आपण सर्व जण वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,अखंड भारत व आपला महाराष्ट्र पूर्ववत आनंददायी/आरोग्यदायी घडविण्यासाठी आपण सारेजण सहकार्य करु या.