धनगर समाज माझा आहे, जातीचं राजकारण बाजूला ठेवा आरक्षणासाठी एकत्र या- मुख्यमंत्री

जनदूत टिम    02-Mar-2020
Total Views |

धनगर समाज माझा आहे, जातीचं राजकारण बाजूला ठेवा आरक्षणासाठी एकत्र या- मुख्यमंत्री

जनदूत टिम 
मुंबई : जातीचं राजकारण बाजूला ठेऊन धनगर आरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं आहे. विधान परिषदेमध्ये आज धनगर आरक्षणावर चर्चा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. धनगर समाज माझा आहे. धनगर समाजाला कुठेही काहीही कमी पडू देणार नाही. जोपर्यंत धनगर समाजाला कायदेशीर कायदेशीर मान्यता मिळत नाही तोपर्यंत धनगर समाजाची सगळी जबाबदारी सरकारची आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. धनगर समाजाने काळजी करण्याची गरज नाही.
 
img1_1  H x W:
 
आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करण्यासाठी हे सरकार तयार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसंच धनगर आरक्षणाबाबत केंद्राशी चर्चा केली जाईल, असंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. भाजपला टोला लगावताना मुख्यमंत्री म्हणाले, “असं समजू नका की या प्रश्नाची काळजी फक्त तुम्हाला आहे. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर आपण सगळे एकत्र आहोत. आमच्यात आणि तुमच्यात कोणताही फरक होणार नाही. धनगर समाजासाठी जे जे करण्याची गरज आहे ते मी केल्याशिवाय राहणार नाही”.
 
दुसरीकडे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनांमध्ये गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याची मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी या संदर्भातली घोषणा आज विधान परिषदेत केली. गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्यात येतील, असं अनिल परब यांनी सांगितलं आहे.