कोकणातील सर्व ग्रामीण भागात शिमगोत्सवाची चाहूल गावागावात होळीच्या पुर्वतयारीची लगबग!

जनदूत टिम    02-Mar-2020
Total Views |

कोकणातील सर्व ग्रामीण भागात शिमगोत्सवाची चाहूल गावागावात होळीच्या पुर्वतयारीची लगबग!

जनदूत टिम
बोरघर / माणगांव : सांस्कृतिक परंपरांचे माहेरघर असलेल्या कोकणात सर्वत्र वेगवेगळे उत्सव आणि परंपरा आजही मोठ्या मनोभावे जपल्या जातात. त्यामुळे संपूर्ण कोकण प्रांत उत्सवप्रिय आहे. कोकणातील शिमगा हा एक मोठा पारंपरिक सण आहे. हिंदू धर्मात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सदर शिमगोत्सवाला फागपंचमीपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता काही दिवसांनी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला अर्थात सोमवार दिनांक ०९ मार्च रोजी होळी आणि त्या नंतर मंगळवारी १० तारखेला धूलीवंदन असल्याने संपूर्ण कोकणात वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे.
 
holi_1  H x W:
 
सद्या कोकणात शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. देवाला रूपं लावण्याची लगबग आता सुरू झाली आहे. रूपं लावल्यानंतर देव गाववेशी बाहेर जाणं इतर गावांमधल्या देवांची भेट घेण्याची प्रथा आहे. कोकणात पारंपारिक वाद्य ढोलावर थाप पडतेय. ग्रामदेवतेच्या मंदिरातील पालखीत देवाची रूपं लावली गेली आहेत. होळी भोवती होम पेटवून शिमगोत्सवाला रंग चढू लागला आहे. शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा उत्सव. नोकरी धंद्याच्या निमित्ताने गावाबाहेर गेलेला चाकरमानी या निमित्ताने आपल्या गावात परततो. गावागावातील ग्रामदेवताच्या मंदिरांचे देव्हारे आकर्षक फुलांनी सजवले गेलेत. ग्रामदेवतेला दागिन्यांचा साज चढवला गेला आहे.
 
ग्रामदेवतेच्या पालखीत देवाची रूप लावण्यापासून ती काढे पर्यंतचे सारे मान निश्चित असतात. शिगोत्सवात गावाचे हेच मानकरी वर्षानुवर्ष आपला मान जपत हा उत्सव साजरा करतात. शिमगोत्सवात ग्रामदेवतेच्या मंदिरात चाकरमान्यांसह सारा गाव जमा होतो आणि देव्हाला गाऱ्हाणं घातलं जातं. त्यानंतर पुढील महिनाभर हा शिमगोत्सव चालतो. सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी पालखी सजते. कोकणातील ग्रामीण भागात काही ठराविक अंतरानंतर शिमगोत्सवाच्या प्रथा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पहायला मिळतात.
 
शिमगोत्सवातील होळी सणाला कोकणात मोठं महत्त्व आहे. जे गैर आणि अनिष्ट आहे त्याचा नाश करण्याचा हा उत्सव ख-या अर्थाने कोकणच्या सांस्कृतिक वैभवाच दर्शन घडवतो. गावागावातील आपल्या अनोख्या परंपरा जपत कोकणी माणूस या उत्सवाच्या काळात आपल्या ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होतो. आणि आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावातील सर्व गावकऱ्यांना सुख समृद्धी लाभो अशी नम्र याचना करतो. अशा शिमगोत्सवाला कोकणात दमदार सुरूवात झाली असून कोकणातील प्रत्येक गाव होळीच्या ठिकाणी दररोज रात्री एकत्र येऊन त्यांची होळीच्या पूर्वतयारी साठी पारंपरिक लगबग सुरू झालेले दिसून येत आहे.