देशात ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा - पंतप्रधान मोदी

जनदूत टिम    19-Mar-2020
Total Views |
नवी दिल्ली : जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी मी करतो आहे. २२ मार्चला सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे.
 
Modi_1  H x W:
 
मी आज १३० भारतीयांकडे काहीतरी मागायला आलो आहे. अद्याप करोनावर कोणतीही लस शोधण्यात आलेली नाही. तसंच काही उपायही शोधण्यात आलेला नाही. त्यामुळे देशवासियांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. जगातल्या ज्या देशांमध्ये करोना व्हायरस आणि त्याचा प्रभाव जास्त आहे तिथे अचानक करोनाचं संकट गहिरं झालं आहे. करोनाग्रस्तांची संख्या त्या देशांमध्ये वेगाने वाढली आहे. भारत सरकार या स्थितीबाबत नजर ठेवून आहे. भारताची लोकसंख्या १३० कोटीच्या घरात आहे. आपण विकासासाठी प्रयत्नशील देश आहोत. आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे की केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांचं पालन करु.
 
करोना नावाच्या संकटाने जगाला ग्रासलं आहे. जगातल्या सगळ्या मानवजातीला करोनाचा त्रास होतो आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही जगातल्या सगळ्या देशांवर इतका गंभीर परिणाम झाला नव्हता जेवढा करोनामुळे होतो आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मागच्या दोन महिन्यांपासून आपण करोनाबाबत विविध बातम्या ऐकतो आहोत आणि पाहतो आहोत. भारतीयांनी करोनाचा प्रभावीपणे सामना केला याचं मला कौतुक आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून असं वातावरण तयार झालं की आपण संकटापासून आपण सध्या वाचलो आहोत. सगळं काही ठीक आहे मात्र जागतिक महामारी असलेल्या करोनामुळे निश्चिंत होण्याची ही वेळ नाही. प्रत्येक भारतीयाने सजग राहणं आवश्यक आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.
 
प्रत्येक नागरिकानं निरोगी राहणं गरजेचं आहे. नागरिकांनी सरकारच्या निर्देशांचं पालन करावं. सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक आहे. 'संयम'चा अर्थ गर्दी टाळणं... घराबाहेर पडणं टाळणं. आपल्याला संकल्प करायला हवा की, आपण स्वत:ही करोनापासून वाचू या आणि इतरांनाही वाचवूया. संकल्प आणि संयम हेच करोनाला उत्तर. भारतावर या जागतिक संकटाचा परिणाम होणार नाही, असं मानून चालणं चुकीच ठरेल. करोनावर अजूनही उपाय निघालेला नाही. भारतासारख्या १३० कोटींच्या विकसनशील देशावर करोनाचं संकट सामान्य गोष्ट नाही. आज १३० कोटी देशवासियांकडे काही मागण्यासाठी आलोय. मला तुमचा येणारा काही काळ हवाय.
 
लॉकडाऊन नाही :
करोना व्हायरसचा संसर्ग फैलावू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संपूर्ण 'लॉकडाऊन'ची घोषणा करणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, पंतप्रधान कार्यालयानं मात्र ही शक्यता साफ फेटाळून लावलीय. देशभरात लॉकडाऊनच्या भीतीनं अनेक नागरिक आपल्या घरात धान्य आणि वस्तूंचा साठा करून ठेवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनापूर्वी आज दिल्लीत निर्माण भवनमध्ये केंद्रीय मंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी आरोग्यमंत्री हर्षवर्धन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्राशिवाय अनेक राज्यांतील सरकारनंही नागरिकांना आवश्यक नसेल तर घरातून बाहेर न पडण्याचं आणि करोना संक्रमण रोखण्याचं आवाहन केलं आहे. अनेक कंपन्या आणि कॉर्पोरेट हाऊसनंही आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्यास बजावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच प्रयत्नांचं बुधवारी कौतुकही केलं आहे.