ज्येष्ठ गीतकार डॉ. मुरलीधर गोडे यांचे निधन

जनदूत टिम    19-Mar-2020
Total Views |
ठाणे : प्रीतीचं झुळझुळ पाणी... मी कशाला आरशात पाहू गं... या सारख्या लोकप्रिय गीतांचे गीतकार डॉ. मुरलीधर गोडे यांचे गुरूवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी विजया, दोन मुली, दोन जावई, दोन नाती असा परिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाकडे त्यांचा मृतदेह सुपूर्द करण्यात आला.
 
murlidhar goadbole_1 
 
डॉ. गोडे यांचे शालेय शिक्षण ठाण्यातील मो.ह. विद्यालय आणि महाडच्या परांजपे विद्यालयात पुर्ण झाले. रूईया आणि सिध्दार्थ महाविद्यालयातून त्यांनी पूर्ण केले. मुंबई विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षणाचे विभागाचे ते प्रमुख होते. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी प्रौढ शिक्षण या विषयात पीएच. डी प्राप्त केली. 1996 ते 1999 या काळात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा होता. नोकरी करतच त्यांनी प्रौढ शिक्षण आणि समाज शिक्षण विषयावर अनेक पथनाट्यांचे लेखन केले. गीतकार आणि नाटककार म्हणूनही त्यांनी आपल्या वेगळा ठसा उमटवला. प्रीतीचं झुळझुळ पाणी... मी कशाला आरशात पाहू गं... यासारख्या समधुर गीतांबरोबरच बन्या बापू चित्रपटातील त्यांचे ले लो भाई चिवडा लो.... गरम मसालेदार चिवडा लो.... हे त्यांचं गीत तुफान लोकप्रिय झाले. टोळधाडं येतेय... या त्यांच्या नाटकाला युनिसेफने आयोजित केलेल्या जागतिक स्पर्धेत गौरविण्यात आले. कानानं बहिरा मुका परी नाही.... हे त्यांचं गीत दुरदर्शनवरील गीतही लोकप्रिय होते. पसंत आहे मुलगी, लागे बांधे, थांब टकल्या भांग पाडते, या शिवाय अलीकडच्या काळात ठाण्यातील अभिनय कट्ट्याच्या सिंड्रेला तसेच ढोलताशे चित्रपटांसाठीही त्यांनी गीत लेखन केले होते. अनेक लघुपटांचे लेखनही त्यांनी केले. भाषा विषयावर त्यांचे नितांत प्रेम होते.
प्रौढ साक्षरते वरील अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही त्यांनी निबंध लेखनाचे पुस्तक लिहले होते. ठाणे महापालिकेचा नगररत्न, व्यास क्रिएशन्सचा कृतार्थ जीवन, कर्हाडे समाजभूषण, ज्येष्ठ नागरिक पुरस्कार आदि विविध पुरस्कारांने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी गोडे यांच्या नौपाड्यातील घरी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. गोडे आणि जोशी यांची महाविद्यालयीन जीवनापासून मैत्री होती. ठाण्यातील अनेक साहित्यिक कार्यक्रमात जोशी आणि गोडे हे एकाच व्यासपीठावर असत. आमची 55 वर्षांची मैत्री आज तुटली, अशा भावना जोशी यांनी यावेळी व्यक्त केल्या. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी जोशी यांचे अंत्यदर्शन घेतले.